Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

दैव देतं पण...! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख

 दैव देतं पण...!


दैव कुठल्या तरी जन्माच्या पुण्याईवर बरेच काही देते, पण मिळालेल्या संधीचा उपयोग करण्याची इच्छा नसेल तर काळाच्या ओघात सारे काही नष्टसुद्धा होते. पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल याह्या खान याच्या बाबतीत नेमके हेच घडले. पाकिस्तानचा सर्वोच्च हुकुमशहा बनलेल्या याह्या खानच्या हातून सर्व सत्ता गेली व अखेर एकाकी जीवनात आजच्या दिवशी रावळपिंडीमध्ये १९८० ला त्याचा मृत्यू झाला

.


भारतावर १९७१चे युद्ध लादणाऱ्या व बांगलादेशच्या निर्मितीला कारणीभूत ठरलेल्या याह्याने केवळ दोन वर्षांच्या हुकूमतीत  पाकिस्तानची दोन शकले करण्याचे पाप त्याने केलेच, शिवाय पाकिस्तानची अर्थव्यवस्था त्यांच्याच काळात कायमची खिळखिळी झाली.


दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या वतीने सहभागी झालेला याह्या खान वरवर चढत अयुब खान यांच्या काळात लष्कर प्रमुख बनला. अयुब खानच्या राजवटीविरुद्ध जेव्हा सार्वत्रिक असंतोषाचा आगडोंब उसळला, तेव्हा अयुब खान यांनीच याह्याकडे सत्तेच्या चाव्या दिल्या.


२६ जून १९६९ रोजी जनरल याह्या खानने सत्तेची सूत्रे घेतली व रात्रीच रेडिओवर भाषण करून देशात 'लष्करी कायदा' (मार्शल लाॅ) जारी केला. सर्व महत्त्वाच्या पदांवर त्याने लष्करी अधिकारी आणले व अयुब खाननाच नजरकैदेत टाकले.


राष्ट्रीय राजकारण व नागरी प्रशासन यांचा बिल्कुल अनुभव व अक्कल नसलेल्या याह्याचे प्रत्येक पाऊल चुकीच्या दिशेनेच पडत गेले. त्यमुळेच १९७०च्या सार्वत्रिक निवडणुकांत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शेख मुजिबूर रेहमान यांच्या आवामी लिगला सरकार बनवण्याची संधी त्याने नाकारली.


त्यामुळे चिडलेल्या मुजिबूर यांनी पाकिस्तानपासून विभक्त होण्याची मागणी केली. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली. याह्या खानने त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला. त्यात न्यायालयाने मुजिबूरना दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली.


त्यामुळे बांगला मुक्तिबाहिनी नावाची संघटना स्थापन झाली व पाकिस्तानी सैन्याच्या दमनचक्रामुळे हजारो निर्वासितांचे जत्थे सीमा पार करून भारतात येऊ लागले. 


अखेर याच प्रश्नावरून भारत व पाकिस्तान यांच्यात ३ डिसेंबर १९७१ रोजी पूर्व व पश्चिम सीमांवर युद्ध सुरू झाले. त्यात १५ दिवसांत पाकिस्तानचा निर्णायक पराभव होऊन पाकिस्तानचे पूर्व विभागाचे प्रमुख जनरल नियाझी यांना शरणागती पत्करावी लागली व बांगलादेशची निर्मिती झाली.


यामुळे पाकिस्तानात निर्माण झालेल्या व दररोज वाढणाऱ्या असंतोषाला तोंड दणे याह्या खानला शक्य नव्हते. त्यांनी सत्ता पाकिस्तान पिपल्स पार्टीचे प्रमुख झुल्फिकार अली भुट्टो यांच्याकडे २० डिसेंबर १९७१ रोजी हवाली केली.


त्यानंतरची १० वर्षे याह्या खान नजरकैदेत होता. त्यातच दारूच्या अतिसेवनामुळे १० ॲागस्ट १९८० रोजी तो मरण पावला.


केवळ काळाची गरज म्हणून दैववशात मिळालेली लष्करी हुकुमशाही त्याला लाभली नाही व धडपणे राबवताही आली नाही, हेच खरे!


डॉ.भारतकुमार राऊत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies