भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी सुर्यकांत साळुंखे यांनी निवड
संगमेश्वर तालुक्यातील राजीवली येथील भाजप नेते सुर्यकांत साळुंखे यांची दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. ही निवड माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व दक्षिण जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले सुर्यकांत साळुंखे यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. तसेच गडनदी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. प्रसंगी प्रकल्पग्रस्तांसमवेत उपोषण व आंदोलन छेडून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर काही वर्षांपूर्वी चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात मनसेतर्फे निवडणूक लढवून बलाढ्य राजकीय पक्षांचे लक्ष वेधले होते. नंतर भाजपात प्रवेश करून पक्ष वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, चिपळुणातील दहीहंडी उत्सवासाठी त्यांचे मोठे योगदान असते. गेल्या वेळी जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेविरोधात चुरशीची लढत दिली. मात्र, थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र, ते खचले नाहीत. उलट भाजप पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत राहिले. याची दखल घेऊन वरिष्ठांनी सुर्यकांत साळुंखे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. याबद्दल ते म्हणाले की, भाजप पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली आहे. या निवडीबद्दल सुर्यकांत साळुंखे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.