ध' चा 'मा' झाला तेव्हा...! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, August 29, 2020

ध' चा 'मा' झाला तेव्हा...! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख!

 'ध' चा 'मा' झाला तेव्हा...!


'काका मला वाचवाऽऽऽ!' अशी आर्त किंकाळी पुण्याच्या शनिवार वाड्यात घुमली व काय होतेय ते कळायच्या आतच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या व नारायणराव पेशवे यांच्या शरीराचे छिन्नविच्छन तुकडे सर्वत्र पसरले. मध्यरात्रीच त्यांचे अंत्यविधी आटोपण्यात आले.मराठेशाहीच्या पेशवाईतील हे लाच्छनास्पद हत्याकांड आजच्या दिवशी १७७३ साली घडले. नारायणराव पेशव्यांचे काका रघुनाथराव उर्फ राघोबादादा व त्यांच्या पत्नी आनंदीबाई या दोघांनी सत्तेच्या लोभापोटी वाड्यातील गारद्यांच्या मदतीने ही हत्या घडवून आणली, हे नंतर सिद्ध झाले.


माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली कारण माधवरावांना अपत्य नव्हते. नारायणराव त्यावेळी केवळ १७ वर्षांचे होते.


पेशवेपद आपल्याला मिळायला हवे, असा राघोबादादांचा हट्ट होता. तसे होत नाही, हे ध्यानात येताच राघोबादादा बिथरले. त्यांनी वाड्यातील दोन गारदी (रक्षक) सुमेर सिंग व खमेर सिंग यांना हाताशी धरून कट रचला. असे म्हणतात की, राघोबादादांनी 'नारायणास धरावे' असा हुकुम लिहिला पण महत्वाकांक्षी आनंदीबाईंची 'धरावे'च्या ठिकाणी 'मारावे' असा बदल गुपचूप केला. या 'ध'चा 'मा' केल्यामुळे नारायणराव पेशव्यांना जीव गमावावा लागला.नारायणरावांच्या पत्नी गंगाबाई त्यावेळी गरोदर होत्या. नारायणरावांच्या मृत्यूनंतर राघोबादादांनी स्वत:ला पेशवा घोषित केले खरे, पण पेशव्यांच्या ज्येष्ठ सरदारांनी बंड केले. राघोबादादांविरूद्ध खटला चालवण्यात आला. त्यात राघोबा, आनंदीबाई व गारदी सुमेर सिंग यांना न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी दोषी ठरवले. त्यामुळे राघोबादादांना पद सोडावे लागले.


इथे नाना फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बारा कारभाऱ्यांनी काम पाहायला सुरुवात केली. त्यालाच 'बारभाईंचे कारस्थान' म्हटले जाऊ लागले. 


गंगाबाईंच्या गर्भावस्थेतील बाळालाच पेशवा म्हणून घोषित करण्यात आले. पुढे गंगाबाईंना मुलगा झाला. त्याचे नाव 'माधवराव' असे ठेवण्यात आले. पुढे तेच 'सवाई माधवराव' या नावाने प्रसिद्ध झाले.


असा हा पेशवाईतील काळ्याकुट्ट पर्वाचा इतिहास!


डॉ.भारतकुमार राऊत


(हा सर्व मजकुर मला उपलब्ध माहितीवर आधारित आहे. कुणाचाही अवमान करण्याचा उद्देश नाही.)

No comments:

Post a Comment