भोरमाळ आदिवासी वाडीतील मुलास विषबाधा, सायन हॉस्पिटल मुंबई येथे उपचार सुरू - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 18, 2020

भोरमाळ आदिवासी वाडीतील मुलास विषबाधा, सायन हॉस्पिटल मुंबई येथे उपचार सुरू

 भोरमाळ आदिवासी वाडीतील मुलास विषबाधा, 
सायन हॉस्पिटल मुंबई येथे उपचार सुरू


सामाजिक कार्यकर्ते राजू पिचिका यांचा मदतीचा हात


देवा पेरवी-पेण


   आपल्या वडिलांच्या सोबत शेतावर गवत मारायला गेलेल्या पाच वर्षाच्या मुलाला गवत मारण्याच्याच विषारी औषधातून विषबाधा झाल्याची घटना पेण तालुक्यातील कामार्ली भोरमाळ आदिवासी वाडी येथे घडली आहे.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की, तुकाराम कडू हे रविवार दि.16 रोजी सायंकाळी 4 वाजता आपल्या शेतावर गवत मारण्याचे औषध फवारणीसाठी गेले असता सोबत आपल्या अथर्व कडू या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन गेले होते. मात्र घरी आल्यानंतर रात्री उशिरा मुलाच्या पोटात व छातीत जोरात दुखू लागले. मात्र पेण तालुक्यातील भोरमाळ आदिवासी वाडी ही अत्यंत दुर्गम भागात असल्याने सदर मुलास दुसऱ्या दिवशी सकाळी पेण येथील महाजन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. तब्बल दहा तास होऊनही मुलगा शुद्धीवर येत नसल्याने डॉक्टर शशांक महाजन यांनी सदर मुलास पुढील उपचारासाठी तात्काळ पनवेल किंवा मुंबई येथे हलविण्याचा सल्ला दिला. 


   मात्र सदर परिवाराची परिस्थिती गरिबीची व कोवीड 19 संसर्गामुळे रुग्णवाहिका मिळत नसल्याने सदर मुलाच्या वडिलांनी अपघातग्रस्तांचेवाली कल्पेश ठाकूर व पत्रकार सुनील पाटील यांना संपर्क केला. यावेळी पेण मधील समाजसेवक राजू पिचिका यांना सर्व हकीकत सांगितली असता त्यांनी सदर मुलास मोफत रुग्णवाहिका देऊन व रुग्णालयाच्या होणाऱ्या खर्चाची आर्थिक मदत देऊन मुंबई येथे उपचारासाठी पाठविले. कोविड 19 संसर्गामुळे कोणत्याही प्रायव्हेट व सरकारी हॉस्पिटलने सदर पेशंट न घेतल्यामुळे अथर्व यास एमजीएम रुग्णालय पनवेल येथून पुढील उपचारासाठी सायन हॉस्पिटल मुंबई येथे दाखल करण्यात आले. सध्या अथर्ववर सायन हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात अधिक उपचार सुरू आहेत. सदर घटनेची चर्चा पेण मध्ये सुरू असून समाजसेवक राजू पिचिका, देवदूत कल्पेश ठाकूर व पत्रकार सुनिल पाटील यांनी अथर्वला केलेल्या मदतीबद्दल कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment