Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अहमदनगर व पुण्याच्या आत्मनिर्भर युवा शेतकऱ्यांचं 'शेतातून दारी' 'किसान कनेक्ट'

 अहमदनगर व पुण्याच्या आत्मनिर्भर युवा शेतकऱ्यांचं  'शेतातून दारी' 'किसान कनेक्ट'


थेट शेतातून 'किसान कनेक्ट लाईव्ह'च्या माध्यमातून सांगत आहेत ताज्या फळभाज्यांची सिक्रेटस्


महाराष्ट्र मिरर टीम

श्रीरामपूर  अहमदनगर



"रोजच्या आहारातील ताजी फळे, भाज्या नेमक्या कोणत्या शेतातून येतात?, पपई व ड्रॅगनफ्रुटसारख्या फळांची झाडे असतात तरी कशी?, त्या फळांची पोषणमूल्ये काय?, झाडावरून काढल्यानंतर ग्राहकांपर्यंत कमीतकमी हाताळणीतून व सुयोग्य पॅकिंगमधून ही फळे चक्क चोवीस तासाच्याही आत  ग्राहकांच्या घरातील टेबलावर कशी पोहोचतात? लाॅकडाऊनच्या काळातही केवळ लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व त्यांना ताज्या फळभाज्या त्वरित मिळण्यासाठी दूर खेड्यांतून आजचा तरूण, माॅडर्न व प्रगतीशील शेतकरी आपल्या शेतात कसा राबत आहे?".... ग्राहकांच्या मनातील या व अशा अनेक प्रश्नांची मनसोक्त उत्तरे श्रीरामपूरी व जुन्नरमधील आजचे आत्मनिर्भर होऊ पाहणारे शेतकरीबंधू थेट आपल्या शेतातून मुंबई- पुण्याच्या व अन्य शहरांतून  शेकडो ग्राहकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 'नेट' भेट करुन देत आहेत. निमित्त आहे ते अहमदनगर व पुणे जिल्ह्यांतून शेकडो शेतकऱ्यांनी  स्थापन केलेल्या 'किसान कनेक्ट' ह्या ऑनलाईन ताज्या व पोषक फळभाज्या पुरवठा करणाऱ्या मंचाद्वारे आयोजित केल्या जात असलेल्या देशातील पहिल्यावहिल्या 'किसान कनेक्ट लाईव्ह' या  'शेतकरी- ग्राहक' संवाद कार्यक्रमाचे.           



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सकस व पोषक आहाराचे महत्त्व अधोरेखित होत असताना निरोगी जीवनासाठी आहारासाठी ताज्या, स्वच्छ व कमीतकमी हाताळणीतून मिळणारा भाजीपाला व फळे हे अत्यावश्यक बनले आहे. लाॅकडाऊनच्या काळात अनेक फळभाजी पुरवठादार व विक्रेते, उद्यमशील व्यक्ती व नवउद्योगांनीही ऑनलाईन व घरपोच भाजीपाला व फळे विक्रीचा उद्योग आरंभिला आहे. घरातून बाहेर पडू न शकणार्या लोकांसाठी ही सोय असली तरीही याप्रकारच्या भाजीपाला व फळे पुरवठ्यात काही त्रुटी आहेत. यातील अनेकजण शेतकर्यांकडून घाऊक खरेदी करून, भाजीपाला व फळांचा साठा करून मागणीप्रमाणे पुरवठा करीत आहेत. यात ग्राहकांना आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक असलेला ताजा, पोषणमूल्ये टिकून असलेला व स्वच्छ भाजीपाला मिळत नसून आजही ग्राहक त्यापासून वंचित आहेत. यादृष्टीने, ग्राहकांना ताजा शेतमाल कसा असतो व कमीतकमी वेळेत थेट शेतातून तो दारी कसा पोहोचू शकतो, हे या कार्यक्रमातून शेतकरी बंधूंनी दाखवून दिले. आधी केलेल्या साठ्यांतून नाही तर मागणीप्रमाणे झाडावरून नुकतीच काढलेली उत्तम दर्जाची फळे व भाज्या ग्राहकांचे स्वास्थ्य टिकविण्यासाठी कशी मदत करतील, हे प्रत्यक्ष दाखविण्यात येत आहे. त्याचबरोबर फळे व भाज्या कशा वाढतात, त्यांची निगा कशी राखली जाते, त्या कशा हाताळाव्यात इत्यादी गोष्टींवरही शेतकरी बंधू प्रकाश टाकत आहेत..        


अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून सुमारे पाचशे शेतकर्यांनी एकत्र येऊन 'किसान कनेक्ट' या 'शेतकरी उत्पादक कंपनी'ची अलिकडेच स्थापना केली असून कमीतकमी वेळेत ताजा शेतमाल घरपोच  पोहोंचविण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन असा प्रगतीशील व तंत्रज्ञानावर आधारित मंच उभा करण्याचा अहमदनगर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयत्न असून मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर या शहरांतून या संस्थेच्या शेतमालाला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.        

                      

या उपक्रमामध्ये अनेक तरूण, सुशिक्षित, प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी एकत्र आले असून, त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करीत भाजीपाला व फळांचे वितरण करण्याची व्यवस्था केली आहे. यांत आधुनिक मशागत, पीक काढणी प्रक्रियेबरोबर मालाचे वर्गीकरण, बास्केट पॅकिंग व ग्राहक केंद्राच्या मदतीने  लाॅकडाऊनमध्येही विनाविलंब चोवीस  तासात ग्राहकांच्यादारी भाजीपाला पोहोचविण्यासाठी शेतकरी भर देत आहेत. 



गेल्या तीन महिन्यांत 'किसान कनेक्ट'ने सुमारे ऐंशी हजार फळभाज्यांच्या बास्केटस् मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी वितरित केल्या आहेत. फळभाज्या ताज्या, शुद्ध व स्वच्छ राहून त्यांची हाताळणी होऊ नये यासाठी प्रथमच 'किसान कनेक्ट' खास बनविलेल्या बास्केटसमधून ग्राहकांना पुरवठा करीत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies