Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही!



महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही!


कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

शिवसेनेचा वाघ का थंडावलाय?

-



शीतल करदेकर

(लेखिका या एन्यूजे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत त्यांचा मोबाईल नंबर 7021616644)



कोण आला रे कोण आला?ऽऽ

शिवसेनेचा वाघ आला!

अशा घोषणा मा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांत आणि इतरत्र व्हायच्या!

जय भवानी,जय शिवाजीचा नारा  जोशपूर्ण तो आजही आहे!

पण जोश हरवलाय, वाघ का थंडावला, हा एकच सवाल!

तळागाळातील लोकांपर्यंत पोहचलेली, गोरगरीबांच्या रोजच्या जगण्यातील प्रश्न सोडवणारी! गल्लोगल्ली छोटे रोजगार उभे करण्यास मदत करणारी! लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अमराठींचं लाँबिंग असणाऱ्या क्षेत्रात मराठी तरुणांना नोकऱ्या मिळवून देणारी महाराष्ट्राची शिवसेना! आज सत्तेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस बरोबर!

 शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ,सावधपणही महत्त्वाचेच,पण आपला ओरिजिनल बाणा सोडून चालत नाही,नाहीतर  जंगलचा राजा असलेल्या वाघावर कोल्हे कुत्रीही हल्ले करतात !हे वास्तव आहे!

भाजपाने महाराष्ट्रात हातपाय पसरले ते बाळासाहेबांची साथ मिळाल्याने! बाळासाहेब असताना या नेत्यांची काय बिशाद होती जादा शब्द बोलण्याची!

गोड बोलत बोलत आता कमळ धष्टपुष्ट बनलेय!

मराठा, ब्राम्हण नेतृत्व शर्यतीत आपला मोहरा म्हणून देवेंद्र फडणवीसांना  बाँसनी मुख्यमंत्रीपदी बसवलं!

युतीच्या राज्यात सेनेला दाबून ठेवण्यात भाजपा यशस्वी झाले.

सत्तेसाठी काहीपण हा अजेंडा भाजपाची संघटन कमान अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे हाती गेली तेव्हापासून जास्त आक्रमक रुप धरताना दिसला.

 दिल्ली,बंगाल,महाराष्ट्र हे पक्षाच्या सत्ता परिवर्तन अजेंड्यावर ऐरणीवरचे विषय!

देशाला सर्वात जास्त कर देणारे शहर महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे तर दिल्लीश्वरांचे नेहमीच लक्ष्य राहिले.

भाषावार प्रांतरचनेने महाराष्ट्र हा मराठी माणसांचा!

बेळगाव सीमावर्ती भागही महाराष्ट्राचा!

त्यावेळी मोरारजी देसाईंनी मुंबईसाठी आकाशपाताळ एक केले! मुंबईसह महाराष्ट्रासाठी १०५जणांनी बलिदान दिले!

संयुक्तमहाराष्ट्रातून मुंबई बाहेर काढणं हा अजेंडा किंवा मुंबईचं महत्व कमी करण्याचे अनेक उपाय होत आहेत.

काहीही करुन मुंबईवर कब्जा मिळवणे हे एकच लक्ष्य असल्याचे आणि महाराष्ट्रात सत्तांतर घडवून पुन्हा सत्तेत येण्याचे दिल्लीश्वरांचे मिशन आहे!

राजकारणात असे स्वप्न बाळगणे,प्रयत्न करणे चूक नाही!

पण राजकारण आणि सत्तेची लालसा पाशवी रुप घेते तेव्हा मग  त्याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागतात. 

अशा मिशनमधे साथ असते ती मोठ्या दर्जाचे प्रशासकीय अधिकारींची!

दुर्दैवाने ७०टक्के अमराठी आय एएस लाँबी आहे.

सरकार कोणतही येवो ,मर्जी यांची चालते!सत्ताकारणात इथे कंमांडची गरज आहे!

मागील फडणवीस सरकारचे खास अधिकारी सरकारात महत्त्वाचे पदावर,खास नागपुरातून आयात केलेले लोक होते! एल ई डी गँग म्हणजे लष्करे देवेंद्र फडणवीस अशी विशेष मिडिया गँग तेव्हा पोसली गेली.आपलेच पक्षातील नेत्यांचे पंख छाटले.इतर पक्षातील नेते साम दाम, दंड भेद अस्त्र वापरुन आयात केले.भाजपातील कडवे भाजपाई फडणवीसांवर नाराज,शिवसेनेला सतत दाबून ठेवून सत्तेतील वाटाही न देण्याचं धोरण अवलंबलं,त्यात मंत्रीमंडळ विस्तार, महामंडळ नियुक्तया चार वर्षे टाळल्या! प्रचंड नाराजी निर्माण झाली! आणि युती तुटली!

पुन्हा आपणच सत्तेत येणार हा अतिआत्मविश्वास त्यांना होता.

स्वकेंद्रीत सत्ताकारण करणारे देवेंद्र फडणवीस हे सर्वात वाईट प्रभावी मुख्यमंत्री ठरले.

त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाला फडणवीस वगळून शिवसेनेशी युती होऊ शकते असे वातावरण होते व आहे!

पण दिल्लीश्वर शहांच्या कृपेने आपण काहीही करु शकतो ही कार्यशैली महाराष्ट्रात चालणार नाही हे फडणवीसांना कळेपर्यंत उशीर झालाय!

आणि आता लोकशाहीआघाडी सत्तेत आल्यानंतरही केवळ सत्तकारणाने पछाडलेले फडणवीस  स्वतःची पत कमी करताना दिसताहेत! 

याचा सगळ्याचा  परिणाम  प्रभावी,शांत, संयत असे मा उद्धव ठाकरे यांचेसाठी सहानुभूती देणारा ठरला आहे!

शिवसेना सत्तेत आली,युवासेना ही जास्त अपडेट काम करणारी टिम! पण ही रस्त्यावर उतरणारी नाही.

त्यांचे नेते आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांची लाँबिंग सुरु होती!

जुने जाणते नेते सत्तेत आल्यानंतर काही महत्त्वाचे पद मिळणार ही अपेक्षा करुन मोर्चेबांधणी करत होते.

मैदानात उतरून काम करणारी, अन्यायाविरोधात डरकाळी फोडून जनतेची काम करणारी शिवसेना!त्यात  नवनवे उच्चशिक्षित चेहऱ्याचे वर्चस्व दिसू लागले.खरे लढाऊ सैनिक मागे राहिले! युवासेना आपल्या नेत्याच्या इमेजवर वारंवार आक्रमण होताना गप्प आहे!

सत्ता आली की स्पर्धा येते!

संघटन नेत्याने पैशाबरोबर  माणसं अनमोल म्हणून जपणे आवश्यक! बाळासाहेबांनी माणसं जोडली व जपली आपुलकीने..

पण आता शिवसेनेत कमतरता आहे ती संघटन कमांडची!

मागच्या सरकारात शिवसेनेत आपले काही बलदंड नेते काही आमदारांना घेऊन भाजपात जातील ही अस्वस्थता होती,तर शिवसैनिकात आपली काम होत नाही,नेत्यांना महत्त्व व महत्त्वाची खाती नाहीत म्हणून चाललेली खदखद वाढत होती.

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले .मनसेने पहिली मराठीअस्मितेचा आणि आता त्यासह हिंदुत्वाचा अंजेंडा हाती घेतला होता!

बाळासाहेबांचे नेतृत्वाखाली तयार झालेले बहुजन नेते छगन भुजबळ,मराठा नेता नारायण राणे!

मनसेत गेलेले बाळा नांदगावकर!

ही सगळी मंडळी शिवसेनेत असताना जातीय नेतेम्हणून ओळख घेऊन मिरवत नव्हते तर मुंबई व महाराष्ट्रात तळागाळातील लोकांसाठी काम करणारे,मराठी माणसांची ती सेना होती!

महाराष्ट्रात आवाज या वाघाचा होता!

पण आता सत्तेत येण्याआधीपासून ही शिवसेना खूपच सहनशील व लांब पल्ल्याचे लक्ष घेऊन वाटचाल करताना दिसतेय.

भाजपासोबत युती करताना मराठी अस्मिता बाजुला सारून व्यापक हिंदुत्ववादी भूमिकेत शिरली ती आजही आहे!.भाजपा नेते शिवसेनेच्या हिंदूत्वावर चिखलफेक करतात!तर शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते! 

शिवसेनेने जेव्हा राष्ट्रवादी व काँग्रेस यांचेसोबत मिळून सत्ता स्थापनेची सुरुवात केली तेव्हापासून शिवसेना हिंदुत्वासोबत आपण सत्ताधारी आहोत म्हणून आस्तेकदम भूमिकेत आहे!

आता हिंदुत्ववादी अंजेड्यांची जागा मनसेने घेण्याचे काम केले.

जुने लढाऊ सैनिक थकलेत,नवे सैनिक आपले उद्योगात व्यस्त!

पुर्वी सेनेच्या शाखा तिच्या संघटनेचे बळ होत्या. त्या शाखा उपशाखा आता नव्या दिशेला वळल्या! सत्ताकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे या गणितिची उजळणी हेडमास्तर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करुन घेण्याची नितांत गरज आहे! 

सत्तेत असल्याचे मूळ आक्रमक पिंडाचे नुकसान आणि प्रतिमा बदलाचा धक्का यातुन अजून शिवसेना सावरत नाहीय! याचा परिणाम आता मोठ्या प्रमाणावर दिसतोय! 

सेनेला गुंड व फॅसिस्ट म्हणणार्‍यांच्या राज्यातही पोसलेले गुंड आणि दमनशाही आहेच. पण अनेक सुपारी माध्यमांनी व होईल मिडियावरील  आयटी गँग, ट्रोलकरांनी प्रचंड धुरळा फक्त शिवसेनेवर उडवला!

चुकीच्या लोकांशी शाब्दिक मारामारी करण्यापेक्षा वेळीच आवर घालण्याची गरज होती, ते काम झालं नाही! केवळ संजय राऊत बोलून चालतं का?

इतर सेनानेते कुठे आहेत असा सवाल जुने सैनिक विचारत आहेत!

 एक गंभीर बाब आहे ही की  गदारोळ करणाऱ्यांचे एकमेव लक्ष्य आहे ती मुंबई!

 महाराष्ट्राने सर्वांना सामावून घेतले, मुंबई  देशभरातून येणार्‍यांची कर्मभूमी बनली!

विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांवर , आँफिसांवर तेव्हा सेनेकडून हल्लेही झाले.त्यावेळी कुणाची तमा सेनेच्या नेतृत्वाने बाळगली नाही.

साहेबांचा एक आदेश,मग सैनिक आक्रमक नि काम फत्ते!

महाराष्ट्रात शिवसेनेचा आधार किती महत्त्वाचा आहे हे बाबरी मश्जिद विध्वंसांनंतर  झालेल्या विस्फोटानंतर जाणवले.

राम मंदिरासाठी रथयात्रा काढणारे आणि कडवे हिंदुत्ववादी म्हणवणा-यांनी ;बाबरीपतनाची जबाबदारी घेतली नाही, तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले,'जर मस्जिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे! गर्व सह कहो हम हिंदू है!"(हा खरा वाघ!)

त्यानंतर मुंबईत राधाबाईचाळीची भयंकर घटना घडली.  मुंबईत दंगे पेटले,पण तिथे प्रत्येक हिंदुंना व मुंबईतील मराठी माणसांना आधार वाटत होता बाळासाहेबांचा!

मराठी माणूस व शिवसेना ,हिंदुत्व नि शिवसेना या गणितात हक्कासाठी कडवटपणा असला तरी अन्याय झाला तर न्याय मिळवून देणे ही सेनेची भूमिका स्थानिकांसाठी महत्वाची होती.

तोच कडवटपणा आपल्याला दाक्षिणात्य राज्यात दिसतो!

मात्र मागच्या काळात म्हणजे उध्दव ठाकरे यांनी पक्ष कमान सांभाळल्यानंतर शिवसेनेत आवक वाढली तरी तो कडवेपणा आणि भिडण्याची ताकद कमी झालेली दिसते.

(शिवसेनेतून बाहेर पडून शिवसेनेवर तोंडसुख घेणारे नेते बाहेर जाऊन किती मोठे बनले हा संशोधनाचा विषय!)

सध्याच्या कोविड संकटकाळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर तर ती जास्तच थंडावली.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा  पवार चाणक्य शरद पवार यांचे मार्गदर्शनखाली काम करत आहेत.

भूमिका आस्तेकदम आहे!समोर सतत खुर्ची खेचू पहाणारा विरोधीपक्ष आहे!

अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचे भाजपाला केवळ सत्तालक्षी राजकारण प्रिय आहे हे देशभरातील तोड जोड वरून दिसून आलंय!

मुंबईकडे पूर्वीपासून केंद्रातील सत्ताधारी लक्ष ठेवून असतात हा इतिहास आहे, तो आता जास्त प्रखर बनलाय!

सत्तापरिवर्तन नाट्यावेळी ज्याप्रकारचे पटावरची प्यादी हलवून राष्ट्रपती राजवट आणण्यापर्यत परिस्थिती भाजपाने आणली होती तोच प्रकार आताही दिसून येतंय!

खरं तर कंगना राणावत ही  छोटी नटी!

आपल्या वादग्रस्त संबंध, बोलण्याने तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. मनिकर्णिका सिनेमात तिने झाशीच्या राणीची काम केलं! ती स्वतःला तेच समजू लागली!

त्याआधी ती अनेक अनुभवातून तावून सुलाखून निघालीय!

सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणात ज्या प्रकारे तिने वंशवाद,ड्रग्ज बद्दल बोलायला सुरुवात केली.खरं तर तेव्हाच तिच्याकडून मुंबई पोलिसांनी माहिती काढणं अपेक्षित होते!  कंगना हे बोलत होती तोवर ठिक होतं पण, "मी माहिती देते मला संरक्षण द्या ' असं ती सांगत असताना तिच्याकडे दुर्लक्ष का केलं गेलं हे मुंबई पोलीस जाणोत! 

मग मात्र तिची जीभ घसरली तिने मुंबईची तुलना पिओकेशी केली!आणि इथे ठिणगी पेटली!

कुणीही संतप्त व्हावं असं हे विधान होतं,त्यावर खा संजय राऊत यांचं वक्तव्य तसं जहाल होतं! आणि आग पेटली!

राजकारणात चारीबाजूला लक्ष व अखंड सावधान असावे लागते!शिवसेना आक्रमक झाली तरी नावं ठेवणार  आणि शिवसेना शांत राहिली तरी  तिला चेपणार! हे गणित पक्क मनात ठेवून विरोधक राजकारण खेळत आहेत! 


महाराष्ट्रात तेही मुंबईत इतका सगळा मालमसाला आणि आयती फाटक्या तोंडाची ग्लॅमरस मुलगी नजरेत आल्यावर तिचा उपयोग होऊ शकतो हे लक्षात ठेवून या डाँलला बाँसने उभ केलंय!तिचा उपयोग विद्वान संजय राऊत यांचेशी रोखठोक सामना करणेसाठी असला तरी लक्ष्य सत्ता आहे!

 बाळासाहेबांची एक गर्जना, एक आदेश शिवसैनिकांसाठी पेटून उठण्याचं अस्त्र होतं!

महाराष्ट्रात सत्ता कोणाचीही असो  बाळासाहेब आणि त्यांच्या शिवसेनेचा दबदबा होता!

आपल्या पोरीबाळी रात्री अपरात्री सुरक्षीत घरी परत येऊ शकतात ते सेनेच्या दबदब्यामुळेच हा विश्वास होता!डान्सबारमधे काम करुन उशीरा घरी परतणार्‍या मुलीही सुरक्षित होत्या!

सुरक्षेचे, मदतीचे नाव शिवसेना! 

अनेक संकटात सापडणारे बाळासाहेबांच्या दरबारी यायचे!अनेकांना सरंक्षण देण्याचं काम शिवसेनेनं केलं! ते कशाला भाजपाचे अनेक दिग्गज नेते मातोश्रीवर भेटीला येत!

एक वचक व आदर होता!

सगळे उपकार, मदत सगळेच विसरले असंच म्हणावं लागेल!

आज ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घराला टारगेट केलं जातंय!

मुख्यमंत्री उद्धवजीसोबत सतत असणारे आणि मंत्रीपदी विराजमान असलेले त्यांचे सुपुत्र मंत्री आदित्य यांचेवर निशाणा लावलेला आहे!

सुशांत प्रकरणात रोज नवे विडियो व मेसेज यांचे आक्रमण होतेय!मुंबई पोलिसांवर आरोप झालेत!

कंगना तर थैमान घालत सुटली!

मुख्यमंत्रीपदाची इज्जत न राखता एकेरी भाषेत आव्हान देऊ लागलीय!(पूर्वीच्या सेनेच्या रणरागिणी असत्या तर निकाल लावला असता वेळेतच)

खा संजय राऊतांचे बोलण्यावर राष्ट्रीय महिला आयोगअध्यक्षांनी  तिच्या बाजूने आवाज उठवला!

मुंबईला पिओके म्हणाणा-या कंगणाडाँल ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वाय प्लस सुरक्षा दिली!

उत्तरप्रदेश व अन्य राज्यात मुलींवर अत्याचार होत असताना हे लोक डोळे मिटून अत्याचार मिशन पूर्ण होईपर्यंत गप्प का होते,हा सवाल सर्वत्र विचारला जातोय! इतका महाराष्ट्र द्वेष कशासाठी?

अर्णब गोस्वामीने तर कहर केलाय.चँनल हाती आहे म्हणून काहीही बोलायच?

देशात इतके प्रश्न आहेत,आरोग्य समस्या,लाखोंच्या नोकऱ्या गेल्यात,आर्थिक संकट आहे. उत्तरप्रदेशात ७०वर्षाच्या महिलेवर बलात्कार झालाय,हरियाणात ,शेतकर्‍यांवर लाठीचार्ज झालाय,कर्नाटकात भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गांजासह पकडले,उत्तरप्रदेशात भाजपा आमदार कुलदीप सेंगरने  ज्या तरुणीचा बलात्कार केला त्या मुलीने वारंवार याचना करुन संरक्षण नाही मिळालं . या तरुणीच्या कुटुंबाची एकेकेकाला टिपून मारले गेले,यावेळी अर्णबचा भारत काहीच विचारत नाही का? प बंगाल, हरियाणा मध्यप्रदेश, या राज्यातील सुरक्षा व अन्य विषयातील वाईट अवस्था महान अर्णबला दिसत नाही का?

"मुंबई बसून मी पत्रकारिता करतोय, माझं काही बिघडवू शकत नाही" ,म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख वारंवार करत सुटलाय, ना शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचेबद्दल कसंही बोलतोय!  

अशी पत्रकारिता असते का?पत्रकारितेला काही नीतिमूल्ये असतात की नाही? हा सवाल महत्वाचा आहे!

त्यातही या कोरोना संकटकाळात हजारो पत्रकारांना मिडिया कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं जातंय,मारलं जातं,खोटे गुन्हे दाखल करून अटक होतेय!  मिडिया संकटात आहे!पण यावर , महनीय अर्णब गोस्वामी आपल्या चँनलवर एक बातमी दाखवत नाही की आवाज उठवत नाही! का?

याचा अजेंडा कुणालातरी टारगेट करून सतत ठणाणा करायचा!

पुरावे नसताना खुन झालाय म्हणून ठणाणा करायच...यावर न्यायालयानेही समज दिलीय,(सुनंदा पुष्कर प्रकरणात)

कंगना,अर्णब आणि महाराष्ट्रातील विरोधासाठी  विरोधी राजकारण यात चारी बाजूने आपला नेता घेरला  गेल्यावरही शिवसेना सैनिक थंड आहेत!

कमावणारे कमवत आहेत,पदं उपभोगत आहेत! पूर्वीचे मदत करणारे हात थंडावलेत!स्पर्धा वाढलीय!

सत्तेत येऊन सेनेची संघटनेवरची पकड ढिली झालीय आणि आवाज कुणाचा म्हणण्याची वाघाची छाती सध्याच्या सैनिकाचा नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते.

मनसे प्रमुख राज ठाकरे या सगळ्यावर  लक्ष ठेवून आहेत ! पण ते अचूक वेळेची वाट पाहात असं दिसतंय!पुढील काळातील त्यांचे पक्षाची जागा ते तयार करताहेत हे नक्की!

ना शरद पवार ,या अशा विषयांना महत्व देऊ नका म्हणतायत!

काँग्रेसला सक्षम नेतृत्व नाही,आणि त्यांचे लक्षही बिहार निवडणुकीकडे आहे.

बाळासाहेबांचे नातेवाईक आणि दोपहरका सामनाचे माजी  कार्यकारी संपादक संजय निरुपम काँग्रेसमधे राहून शिवसेनेवर हल्ले करताहेत! तेही बहुधा भाजपाकडून गालिचा अंथरण्याची वाट पाहाताहेत!

अनेक वर्षे सेनेसोबत असणारी भाजपा हरप्रकारे सेना परत आपलेसोबत यावी आणि महाराष्ट्र आपला व्हावा या प्रयत्नात जंगजंग पछाडतेय!

एकतर महाराष्ट्र मिळवा किंवा मुंबईचं खच्चीकरण करा...असेच निर्देश बाँसनी जणू  आपल्या मिशन कमळाच्या सर्व शूरवीरांना दिलेले दिसतात.

 एक आहे की सेनेला न मानणारा वर्गही आता सेनेच्या या केविलवाण्या परिस्थितीने चुकचुकतोय!

सर्व बाजूने शाब्दिक लचके तोडणारे, कधी काळी सेनेचे असणारेही सगळी मजा पाहात आहेत,आगित तेल ओतत आहेत!

 भाजपाची इथे सत्ता पुन्हा आली तर आपल्यासाठी मोठ्या संधीची तयारी करत आहेत!तर केंद्राला आपला खुटा बळकट करण्यासाठी काहीजण विदुषी चाळे करत आहेत!

पण ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेने भरभरुन देऊन मोठं केले ते सगळे नेते कार्यकर्ते शिवबंधनाने थंड झालेत की शिवसैनिकांच्या आतला वाघ पार लेचापेचा झालाय हा सवाल आहे!

खरं तर शिवसेनेचा आणि सैनिकांचा तोच बुलंद आवाज आता महाराष्ट्रात उमटण्याची निकड आहे!

तर आणि तरच ही रोज गरळ ओकणाऱ्यांची तोंड बंद होतील!

महाराष्ट्रात कुणाची सत्ता असो पण मराठी असून मराठी माणसांविरोधात षडयंत्र रचणारे कोरोना काळात राजकारण करणारे, अनेक हीन दर्जाचे आरोप करणारे हे लोक कुठेतरी थांबायला हवेत!

निडरपणे सर्व प्रकरणात विषय भिजत न ठेवता निर्णय घेऊन जशास तसे उत्तर आणि जनहितार्थ कृती  मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंकडून होणे आवश्यक आहे! आपणास सल्ले देणारेंची अचुकतेची चाचपणी करणेही त्यात आवश्यक आहे!

जर पक्ष कार्यकर्त्यांची फळी आज सरकारच्या मदतीला असती तर कोरोना संकटाचा मुकाबला करताना कोणाचीच दमछाक झाली नसती!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना सैनिक मुख्यमंत्री झालेला पहायचा होता पण सेनेचा मुख्यमंत्री असो,मंत्री असो की संघटनेतला कार्यकर्ता भुसभुशीत,पुचाट नको होता!

वयाची ५०/५५वर्षे ओलांडलेले शिवसैनिक सध्याचे शिवसेनेला टारगेट करण्याचे प्रकरणात संतप्त आहेत, पण थकलेले असल्याने आपण आता मैदानात उतरू शकत नाही ही खंत व्यक्त करत आहेत! सध्याची शिवसेनेचे नेते उपनेते,आणि संघटनेतील पदाधिकारी कशाने थंडावले की यांच्यातला वाघ डरपोक झालाय अशी खंत ही जुनी मंडळी व्यक्त करत आहेत!

जर हररोज नवे धिंगाणे व जगण्याचे प्रश्नांपेक्षा घाणेरडी राजकारणं महाराष्ट्रातील जनतेला पाहावी लागणार असतील तर  त्यापेक्षा निधड्या वाघांची ती शिवसेना आम्हाला विरोधी पक्षात असेल तरी चालेल! 

किमान महाराष्ट्राची घुसमट आणि   सहनशीलतेचा अंत तरी पहावा लागणार नाही!

आपण काय करतोय आणि किती  खालचे पातळीवर उतरुन देशातल्या महान राज्याचा , महाराष्ट्राचा कडेलोट करतोय याचं भान देशाचे विश्वस्त म्हणवणा-यांना यायला हवेच अन्यथा महाराष्ट्र अशा कूटनीतीला कधीही माफ करणार नाही!



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies