Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पाणी पुरवठा तातडीने सुरू न केल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

             बोर्डा पाणी पुरवठा योजना पांढरा हत्ती

 

             ४ दिवसांपासून तहान भागवण्यासाठी                 नागरिकांची ससेहोलपट


पाणी पुरवठा तातडीने सुरू न केल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा


                 राजेंद्र मर्दाने-चंद्रपूर




 वरोरा तालुक्यातील बोर्डा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे शुद्ध मिळावे, प्रत्येकाच्या घरात पुरेसे पाणी पोहोचावे, या उदात्त हेतूने जागतिक बँक पुरस्कृत जलस्वराज्य टप्प्या - २ अंतर्गत   बोर्डा पाणी पुरवठा योजनेला सन २०१७ मध्ये मान्यता प्रदान करण्यात आल्यावर प्रायोगिक तत्त्वावर पाणी पुरवठा सुरू होता. परंतु सदर योजना ग्राम पंचायतला हस्तांतरण करतेवेळी ग्राम पंचायत व  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील संबंधित अधिकारी व कर्मचा-यांत मतभेद निर्माण झाल्यावर जीवन प्राधिकरण विभागाने दि २ सप्टेंबरपासून चक्क पाणी पुरवठा बंद करण्याचा उद्दामपणा केल्याने  परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी ससेहाेलपट होत आहे. स्वत:चा  अहंकार जपण्यासाठी व श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी नागरिकांना पाण्याच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेऊन त्यांनां वेठीस धरणाऱ्या बेजबाबदार अधिकारी व कर्मचा-यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाही करून पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे आदेश त्वरित द्यावेत, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

   


 

बोर्डा  ग्रामपंचायत अंर्तगत येणाऱ्या सूर्ला, द्वारका नगरी, यशोधा नगर, अपूर्वा नगर, पांचांली नगर, अशोक वाटीका, चैतन्य नगर, बजरंग नगर,  शांतीनगर, बोर्डा आदी परिसरात नागरिकांसाठी  जलस्वराज्य टप्पा - २ अंतर्गत बोर्डा पाणीपुरवठा योजनेसाठी जवळपास १० कोटी अंदाजपत्रकीय किंमत ठरविण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चंद्रपूर मार्फत याचे कंत्राट पी. डी. राणे बुलढाणा यांना देण्यात आले. ३ मे २०१८ पासून कामाची सुरुवात झाली. फिल्टर टाकीचे बांधकाम करून नळ योजना घरोघरी जोडण्याचे काम  झाले. यात परिसरातील जवळपास ४५० नागरिकांनी १५०० रुपये अनामत  रक्कम सुद्धा भरली असल्याचे कळते. योजना कार्यान्वित करताना  वापरण्यात आलेले साहित्य  निम्न दर्जाचे, कामचलाऊ असल्याचे निदर्शनास आल्यावर अनेक जागरूक व्यक्तींनी तीव्र आक्षेप नोंदविल्याचे कळते. तदनंतर  काही बदल करण्यात आला आहे, असे सांगितले जाते. परंतु सदर योजना ग्राम पंचायतला हस्तांतरित करतेवेळी जवळपास ३० त्रुटी निदर्शनास आणल्या गेल्याचेही बोलले जाते.  या त्रुट्यांची दुरुस्ती केल्यानंतरही ग्रामपंचायत ने योजना ताब्यात न घेतल्याने संबंधित यंत्रणेकडून पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे या त्र्यूट्या पूर्णच न झाल्याचे ग्रामपंचायत व काही सदस्यांचे  म्हणणे आहे. परंतु यावर ग्रामपंचायत ने काहीही तोडगा न काढल्याने भर पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. ४ दिवसांपासून पिण्यासाठी बोअरवेलचेही पाणी मिळत नसल्याने शनिवारी बोर्डा परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतवर  मोर्चा नेला. परंतु शनिवारी कार्यालय बंद असल्यामुळे अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा व ग्रामस्थांना तात्काळ  पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी  मोहन परचाके, प्रवीण मुधोळकर, गीता आसुटकर, रुबीना शेख, उषा घुमे, ललीता माहुरे, इंदिरा जगताप, रेखा शिंदे, राणी कामतवार, उषाताई लांडगे, आशा हजारे, शोभा मितपल्लीवार, पूजा परचाके,  बदकी,  विलास परचाके आदींच्या वतीने करण्यात आली आहे. एक दोन दिवसात यावर निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

_______________________________

 

प्रतिक्रिया

बोर्डा पाणी पुरवठा योजनेला वर्धा नदीवरून पाणी पुरवठा होतो व तो फिल्टर होऊन त्याचा पुरवठा परिसरातील नागरिकांना केला जातो. परंतु या योजनेचे बरेच काम बाकी आहे. याबाबतच्या त्रुटया संदर्भात ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांनी वारंवार संबंधित विभागाला कळविल्यानंतरही त्र्युट्यांची पूर्तता बाकी आहे. मागच्या महिन्याच्या २८ तारखेला झालेल्या सभेत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काम पूर्ण न झाल्याने पाणी पुरवठा योजनेचे हस्तांतरण ग्रामपंचायतीला झाले नाही. यातच  संबंधित यंत्रणेकडून ४ दिवसांपूर्वी पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.  

                        मोहन परचाके

              ग्राम पंचायत सदस्य, वार्ड क्रमांक  - ४ , बोर्डा

------------------------------------------------


 मागील अनेक दिवसांपासून ग्राम पंचायत बोर्डाच्या नळाला पाणी नाही, बोअरवेल्स बंद स्थितीत आहे. या संदर्भात सरपंच, पंचायत समिती सभापती, गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून समस्या कळविली. पाणीपुरवठा संदर्भात आश्र्वासन देऊनही  किमान बोअरवेल्सचे सुद्धा पाणी मिळाले नाही. कोरोना काळात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती योग्य नाही. शासनाने नियोजन करून तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा ग्रामस्थ परवानगी घेऊन पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करतील.  



                    विलास नामदेव परचाके

                    ग्रामस्थ, बोर्डा

-----------------------------------------------


 बोर्डा पाणी पुरवठा योजनेचा कॉन्ट्रॅक्ट ३० जून २०२० रोजी संपुष्टात आला.आम्ही बोर्डा ग्राम पंचायतीला विनंती करीत होतो की ही योजना आपल्या ताब्यात घ्यावी. संबंधित कंत्राटदाराने मुदत संपूनही २ महिने सेवा दिली.  मागच्या सभेत ग्राम पंचायत तर्फे ३० किरकोळ दुरुस्त्या सांगण्यात आलेल्या होत्या. त्या पूर्ण करुन देण्यात आल्या नंतरही  ग्राम पंचायतने हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न केल्याने शेवटी २ सप्टेंबर ला पाणीपुरवठा बंद करण्यात आला. ग्राम पंचायतला वर्षभर पाणी पुरवठा केला तेव्हा कोणतीच तक्रार नव्हती, परंतु  ताब्यात घेण्याबाबत कळविल्याने  तक्रार सुरु झाली. आता बंद करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना पुनश्च सुरू करण्याचे अधिकार माझ्याकडे नसून वरिष्ठ  अधिकाऱ्यांकडे आहे.


                     प्रदीप बारहाते

                 शाखा अभियंता, चंद्रपूर

                  

_______________________________

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies