वर्धा नदीच्या बोरी घाटात अवैध उत्खननाने झालेल्या खड्ड्यात किन्नाके गुराख्याचा बुडून मृत्यू - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 14, 2020

वर्धा नदीच्या बोरी घाटात अवैध उत्खननाने झालेल्या खड्ड्यात किन्नाके गुराख्याचा बुडून मृत्यू

 वर्धा नदीच्या बोरी घाटात अवैध उत्खननाने झालेल्या खड्ड्यात किन्नाके  गुराख्याचा बुडून मृत्यू


दोषींवर ॲट्रॉसिटीसह मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी


                   राजेंद्र मर्दाने-चंद्रपूर
 वरोरा तालुक्यातील वर्धा नदीच्या बारी घाट पात्रात रेती माफियाद्वारे वर्षभरापासून अहोरात्र पोकलेन मशीन व बोटीच्या साह्याने सुरु असलेल्या वाळू उपश्यामुळे नदीपात्रात अनेक ठिकाणी मोठेच मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याचा खोलीचा नीट अंदाज न आल्याने गाईंना पाण्यातून काढताना दिनेश अन्नाजी किन्नाके ( वय ३० वर्षे) या गुराख्याचा बुडून दुदैवी अंत झाल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्ष व नाकर्तेपणामुळे तरुण आदिवासी  दिनेश किन्नाकेचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासनाच्या हलगर्जीपणामुळे दिनेशचा बळी गेल्याने त्याच्या कुटुंबियांना तात्काळ मदत उपलब्ध करुन द्यावी तसेच वाळू तस्करांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष  करुन कर्तव्यात हयगय  करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आदींवर सदोष मनुष्यवधाचा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतकाची पत्नी  शीतल दिनेश किन्नाके हिने निवेदनाद्वारे  केली आहे.        अधिक माहिती नुसार तालुक्यात आमडी -  बोरीच्या वडकेश्वर घाटावर गेल्या अनेक महिन्यांपासून पोकलेन व बोटीद्वारे वाळूचा अवैध व अमाप उपसा सुरु आहे. नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध उपसा केल्याने ठिकठिकाणी मोठेच मोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे नदीतून बोटीद्वारे वाळूचा उपसा संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने सर्रास होत असतो, सध्या  नदीपात्रात पाणी असून भर पावसाळ्यातही  रेतीचा उपसा सुरु आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. १३ सप्टेंबर रविवारला दुपारी ३ वाजताच्या दरम्यान गुराखी दिनेश अन्नाजी किन्नाके, दिलीप किन्नाके, कमलाकर कोरांगे आपल्या गुरांना पाणी पाजण्यासाठी बोरी गावाजवळील वर्धा नदीच्या पात्रात गेले. पाणी पिताना गाय नदीचे पाण्यात उतरली. दिनेशला पाण्याच्या खोलीचा नीट अंदाज आला नाही. नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न लावता आपल्या गायीला बाहेर काढताना दिनेशही नदीत गेला व बूडू लागला. दिनेशला पोहता येत नसल्याने व पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचे केलेले प्रयत्न अपूरे पडले. शेवटी दिनेश खोल पाण्यात बुडाला. हे दृश्य बघून वाळू तस्करांनी आपल्या बोटी आणल्याचे कळते मात्र त्यांना  दिनेश सापडला नाही. अवैध उत्खनाने केलेल्या खड्ड्यांमुळे  दिनेश बुडाला असे निदर्शनास येताच वाळू तस्करांनी वाळू तस्करीत वापरण्यात येणाऱ्या सर्व साहित्याची विल्हेवाट लावली. मात्र त्याठिकाणी असलेल्या अवैध टीपी डायरीत सगळ्या ट्रक चे नंबर व मालकाचे वर्णन पत्रकारांना गावकऱ्यांनी दिले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी असलेले फोटो, व्हिडिओ गावकऱ्यांनी घेऊन ठेवले होते. मागील अनेक महिन्यांपासून हा गोरखधंदा अव्याहतपणे सुरू असताना व महसूल व संबंधित विभागाला वाळू तस्करी संबंधात वारंवार कळवून सुद्धा अपवाद वगळता ठोस स्वरुपाची कारवाई झाली नाही. ट्रॅक्टर ने वाळू वाहतूक करणाऱ्यावर   थातूरमातूर कारवाई करून दंड  वसूल केल्या जातो मात्र मुख्यतः माफिया वर अजूनही गुन्हा दाखल झाला नसल्याने यामागे नेमका कोणाचा आशीर्वाद आहे. हे लपून राहिलेले नाही. वाळू माफिया रात्रीतून लाखों रुपये कमवत आहेत त्यांचा मलिंदा महसूल व पोलीस खात्यातील स़बधित अधिकाऱ्यांकडे न चुकता जात असल्याने वाळू तस्कर निर्ढावले असून वाळूची चोरी  रोखणार कोण? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून होत आहे.  प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच आदिवासी तरुणाचा नाहक बळी गेला. त्यामुळे तरुणांच्या परिवाराला तात्काळ आर्थिक मदत पुरविण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. प्रशासनाने वेळीच वाळू तस्करांवर लगाम लावला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती. यासाठी संबंधित विभागाचे पटवारी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी जबाबदार असून यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा सोबतच ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृतकांची पत्नी शितल किन्नाके हिने निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment