Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

देवाक काळजी रे ! माझ्या....

देवाक काळजी रे ! माझ्या......


कोकण नुसते नाव जरी घेतले तर डोळ्यासमोर येतो भव्य असा समुद्रकिनारा, निसर्गाने मुक्त हाताने उधळण केलेले कोकण, खवय्यांसाठी विशेषतः मत्स्यप्रेमींसाठी कोकण म्हणजे एक पर्वणीच. कोकण म्हणजे अनेक नानाविध वैशिष्ट्य असलेला प्रदेश ,तसेच या कोकणाच्या मातीने देशाला अभिमान वाटावा असे अनेक भूमिपुत्र दिले आहेत. 

भारत रत्न प्राप्त झालेले कोकणचे सुपुत्र

धोंडो केशव कर्वे (दापोली)
पांडुरंग वामन काणे (रत्नागिरी)
विनोबा भावे (गागोडे कुलाबा)
बाबासाहेब आंबेडकर (जन्म १८९१ महाव, मध्य प्रदेश, कुटुंब आंबवडे, मंडणगड, रत्नागिरी - कुटुंब मुंबईला १८९७ ला आले)
सचिन तेंडुलकर (मुंबई) 

पद्मविभूषण प्राप्त झालेले कोकणचे सुपुत्र

बाळासाहेब खेर (रत्नागिरी)
जनरल अरुणकुमार वैद्य (अलिबाग कुलाबा)
पांडुरंग शास्त्री आठवले (रोहा रायगड)
चिंतामणराव देशमुख (सी.के) रोहा -रायगड 

कोकणी माणूस हा फणस म्हणा अथवा नारळ म्हणा याप्रमाणेच आहे, बाहेरून जरी कडक वाटत असला तरी आतून गोडच तसेच अतिशय स्वाभिमानी व कणखर, याचेच उदाहरण म्हणजे नुकतेच आलेले चक्रीवादळ, यात कोकणी माणसाचे एवढे मोठे नुकसान होऊन सुद्धा तो स्वतःच्या हिमतीने परत उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. कोकण हे निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारा, खवय्येगिरी याबरोबरच आपल्या आदरतिथ्याकरिता सुद्धा ओळखला जातो. कोकणी माणूस कायमच "येवा कोंकण आपलोच आसा" (अतिथी देवो भव) असे म्हणून स्वागतास तयार च असतो. परंतु आज आपले कोकण एक वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे "कोकणाचा गणेशोत्सव".

मागील अनेक महिन्यांपासून संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे, यासंदर्भात सगळीकडे भीतीदायक वातावरण आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपला गणेशोत्सव येत आहे. कोकणातील अनेक "चाकरमानी" हे गेली अनेक वर्षे कामानिम्मिताने मुंबई व आसपास स्थायिक झाले आहेत. असे असले तरी हे चाकरमानी वर्षानुवर्षे व पिढ्यानपिढ्या गणेशोत्सवात आपल्या कोकणात आवर्जून जातात. कोकणात गणेशोत्सवाचे महत्त्व हे दिवाळी एवढेच आहे व त्यामुळे या दिवसांत आपल्या गावी जाण्याची ओढ या चाकरमान्यांना लागते. परंतु या वर्षी अतिशय अवघड अशी परिस्थिती आहे, अनेक गावकऱ्यांना वाटते की शहरातील येणारे लोक हे कोरोना घेऊन येतील व आपण संकटात येऊ, त्यांच्या भावना या साहजिकच आहेत, परंतु त्यांनी आपल्या शहरातील असलेल्या बांधवांच्या नजरेतून ही विचार करावा. "घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी" याप्रमाणेच आपला कोकणी माणूस हा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला तरी तो मनाने "कोकणी" च असतो, त्यामुळे त्याला ही आपल्या गावकऱ्यांची चिंता आहेच व त्याला आपल्या बाप्पाच्या आगमनाची ही ओढ आहे, याच गणेशोत्सवाची तो वर्षभर वाट पाहत असतो. कारण गणेशोत्सवात बाप्पा च्या आगमना बरोबरच आपल्या गावाची, गावातील लोकांची ओढ त्याच्या मनात असते. आता शासन गणेशोत्सवात कोकणाला जाणारया बसेस चे नियोजन करीत आहे, तसेच आमच्या पक्षाद्वारे ही चाकरमान्यांना जाण्यासाठी बसेस ची सोय कार्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे माझी दोघांना, गावकऱ्यांना व शहरातून गावी जाणाऱ्या ना विनंती आहे की वर्षांनुवर्षे असलेल्या या प्रेमळ संबंधात या कोरोना मुळे अंतर न येऊ देता "सुवर्णमध्य" काढण्याचा प्रयत्न करू यात. याकरिता मी सुध्दा माझ्या परीने प्रयत्नशील आहे, त्याच अनुषंगाने मी २७ तारखेला रायगड च्या निधी चौधरी, रत्नागिरी चे लक्ष्मीनारायण मिश्रा, सिंधुदुर्ग च्या मंजू लक्ष्मी या तिन्ही जिल्हाधिकारी बरोबर फोन द्वारे चर्चा करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा सर्वांचा मानवतेचा दृष्टिकोन आहे परंतु त्यांना जागतिक आरोग्य संघटना (WHO , ICMR) व शासनाने दिलेले निर्देश पालन करणे गरजेचे आहे. तसेच माझ्या वाचण्यात नुकतेच देवली व उंबर्डे या ग्रामपंचायतीचे वेगवेगळे नियमाचे पत्रक आले, त्यात एकाने ७ तर एकाने १४ दिवस विलगिकरण (Quarantine) चे निर्देश दिलेत, असे न करता शासनाने यात लक्ष घालून एकसमान नियमावली च्या अंमलबजावणी चे निर्देश द्यायला हवेत. शासकीय अधिकारी हे मानवीय दृष्टिकोन ठेऊन कार्य करीत आहेत, त्यामुळे शासकीय अधिकारी आडकाठी करीत आहेत असे अजिबात नाही हे मला पटले. तसेच जाणाऱ्या सर्व चाकरमान्यानी स्वतःची कोरोना चाचणी करूनच जावे, जेणेकरून गावकऱ्यांचे देखील समाधान होईल, तसेच बाकीचे पथ्य जसे की पूर्ण वेळ मास्क वापरणे इत्यादि चे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. मित्रांनो परिस्थिती किती विचित्र आहे याकरिता माझ्या मित्राचे उदाहरण देतो, २८ मार्च रोजी माझे मित्र असलेले शाम ठाकूर यांच्या सासूबाई चे अलिबाग तालुक्यातील आंबेपुर इथे निधन झाले, त्यांच्या पत्नी सौ सीमा ठाकूर यांना कोणीही भाऊ नसल्याने त्यांनी अंत्यसंस्कार ला जाण्याचे ठरविले परंतु लॉक डाउन मुळे पोलीस परवानगी मिळणे जिकरीचे होते, तरीही भायखळ्याचे पोलीस अधिकारी दिनेश कदम यांना विनंती करून तशी परवानगी मिळवून व गाडी करून जाण्याची सोय मी स्वतः करून दिली, परंतु अर्ध्या रस्त्यात असतांना त्यांचा तेथील सरपंचांशी संपर्क झाला व त्यांनी गावात प्रवेश देण्यास सपशेल असमर्थता दर्शविली व त्यांना व्हिडीओ कॉल द्वारे दर्शन घ्यावे असे सांगितले. मित्रांनो दोन्ही बाजू आपापल्या जागी बरोबर जरी असल्या तरी स्थानिक गावकरी व चाकरमानी हे समीकरण म्हणजे सख्ख्या भावाच्या प्रेमासारखेच. कोकणावर कोणतेही संकट येऊ घालत असेल तर सर्वात प्रथम हाच "चाकरमानी" जेथे असेल तेथून आपल्या कोकणवासीयांसाठी यथाशक्ती जे जे शक्य असेल ते करतो, कोकणातील येऊ घातलेले एनरॉन, नाणार व निसर्गाला संभाव्य हानी पोचवू शकतील अश्या सर्व प्रकल्पाना तो शहरात राहून ही विरोध करतोच, तसेच कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास यथाशक्ती तो आपल्या कोकणी बांधवांसाठी ठामपणे उभा असतो. गावकरी सुद्धा दरवर्षी आपल्या जिव्हाळ्याच्या चाकरमान्यांची वाट पाहत असतो. त्यामुळे या प्रेमात, या भावनेत अंतर न पडू देता व वर्षानुवर्षे असलेली पवित्र अशी गणेशोत्सवाची परंपरा आपण या वर्षीही चाकरमान्याचे स्वागत करून करू यात. फक्त हे करतांना स्थानिक शासकीय अधिकारी, सरकार हे जी मार्गदर्शक तत्वे आखून देतील त्याचे तंतोतंत पालन करू यात. चाकरमान्यांनी सुद्धा विशेष काळजी घेऊन गावकऱ्यांना साथ दिली पाहिजे. ज्या "चाकरमान्यांना" शक्य असेल त्यांनी यावर्षी गणेशोत्सव शहरातच आपल्या राहत्या ठिकाणी साजरा करावा, मित्रांनो यावर्षी शेकडो वर्षांच्या अनेक परंपरा या खंडित झाल्या आहेत. अनेक मंदिर जे जीवनात कधीच बंद नाही राहिले असे मंदिर अनेक दिवस दर्शनासाठी बंद ठेवावी लागली. चाकरमान्यांनी सर्व निर्देशांचे पालन करावे जेणेकरून एकमेकांच्या विषयी असलेले भीतीचे, संशयाचे मळभ आपोआप दूर होतील. 
या सर्व भावना मांडण्याचा एकच हेतू की मूळचा "कोकणी" मुरुड जंजिरा, रायगड येथील नांदगाव हे माझे गाव व माझी पत्नी सौ लीना ही कणकवली येथील असल्याने कोकणाशी माझी नाळ अजूनही घट्ट आहे. माझ्या आजवरील जडणघडणीत आपल्या कोकणाचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या कोकणातील गणेशोत्सवाचे चाकरमान्यांच्या जीवनातले महत्त्व जाणून आहे, तसेच चाकरमानी व गावकरी यातील जिव्हाळा स्वतः अनुभवला आहे. त्यामुळे या जिव्हाळ्यात व प्रेमात कोणत्याही प्रकारे कमी येऊ नये हीच एकमेव ईच्छा. परंतु हा गणेशोत्सव साजरा करतांना स्थानिक गावकरी व चाकरमानी ह्या सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहावे ही मनातील ईच्छा.
शेवटी हा विषय गणेशोत्सवानिम्मित आला त्यामुळे आपल्या "बाप्पा" वर विश्वास ठेवून एकमेकांवरील वर्षानुवर्षे असलेले प्रेम वृद्धिंगत करून माणुसकीचे एक नवीन उदाहरण जगासमोर ठेवू यात. शेवटी एकच सांगेल
 देवाक काळजी रे! माझ्या देवाक काळजी......
"गणपती बाप्पा मोरया"

आपला नम्र

बाळा नांदगावकर
आपला कोकणी बंधू

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies