कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती करावी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती करावीकोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती करावी

      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अमृता कदम-अलिबाग


 कोरोनाचे प्रमाण  नियंत्रित ठेवण्यासाठी स्वयंशिस्त, सामाजिक अंतर,मास्कचा वापर, हात धुणे, स्वच्छता राखणे यासारखे उपायच कोरोनावर सध्याचे औषध असल्याचे सांगून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्हा यंत्रणेने  करोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती मोहीम राबवावी, असे आवाहन आज येथे केले. 

       मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे आणि डोंबिवली जिमखाना येथील कोविड सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

       यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे, उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्हयाच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार माणिकराव जगताप, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, प्रांताधिकारी शारदा पोवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे  हे उपस्थित होते.

      मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुढे म्हणाले, आज 80 टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत. पण ते या आजाराचे संक्रमण करू शकतात. त्यांच्या माध्यमातून होणारा प्रसार गंभीर बाब असल्याने अशा रुग्णांचे विलगीकरण करणे, त्यांना क्वारंटाईन करणे आवश्यक असून या रुग्णांकडे दुर्लक्ष करू नये. कोरोनाच्या विषाणूला जोपर्यंत हरवत नाही तोपर्यंत अहोरात्र, अविश्रांत मेहनत सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह जिल्हा यंत्रणा व नागरिकांना केले.

     उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कोरोनाला दूर ठेवूनच हरविणे शक्य आहे. कोरोना झाल्यानंतर उपचार करून घेण्यापेक्षा तो होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. शेवटी सध्याच्या अर्थव्यवस्थेबाबत बोलताना सध्याची  अर्थव्यवस्था काहीशी कमकुवत झाली असली तरी सर्वजण मिळून या परिस्थितीवर निश्चित मात करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच गणेशोत्सव साधेपणाने, सुरक्षितपणे साजरा करूया,  असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले.

      महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र शासन पारदर्शकतेने काम करीत असल्याने जास्तीत जास्त करोना चाचण्या केल्या जात आहेत आणि त्यातून करोना रुग्णांचा जास्तीत जास्त तपास लागतोय. यामुळे सर्व यंत्रणा योग्य दिशेने काम करीत असून रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.

     यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, सर्वांनी आरोग्याची काळजी घ्याच मात्र जास्तीत जास्त कोरोना चाचण्या होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट चांगला आहे, ही बाब समाधानकारक आहे. गरजूंना अधिक चांगली रुग्ण सेवा देण्यासाठी  शासन कटिबद्ध आहे तसेच येणारा गणेशोत्सव शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करीतच साजरा करावा, असे आवाहन करीत त्यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.  राज्यात सध्या 285 शासकीय तर 84 हजार 369 खाजगी कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

       सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासन सर्व स्तरावरून गरजू रुग्णांना अधिकाधिक उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असून सध्या निर्माण केली जाणारी आरोग्य यंत्रणा पुढील काळातही कोविड व्यतिरिक्त आजारांसाठीही उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

       उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे रायगड जिल्ह्यासाठी आरटीपीसीआर लॅब सुरु करण्यासाठी तसेच स्पीड बोट ॲम्ब्युलन्स सेवा सुरु करण्यासाठी  केलेल्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दल विशेष आभार मानले. एक कोटी सात लाख रुपये खर्च करून अलिबाग जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या या आरटीपीसीआर लॅबमुळे रायगडकरांना याचा निश्चितच लाभ होईल. कमीत कमी वेळेत करोना चाचणी अहवाल प्राप्त होईल आणि त्यातून पुढील उपाययोजना करण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करून करोनाशी लढताना सर्व यंत्रणांनी, जनतेने आणि प्रसारमाध्यमांनी दिलेल्या योगदानाबद्दल आवर्जून उल्लेख केला. या लॅबमुळे दिवसाला किमान 94 तर कमाल 376 करून चाचण्या पार पाडू शकणार असल्याने जास्तीत जास्त करोना चाचण्या करण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

      अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे आणि डोंबिवली जिमखाना येथील कोविड सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर या आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे आणि डोंबिवली जिमखाना येथील कोविड सेंटरबाबतची लघुचित्रफित दाखविण्यात आली.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरदीप ठोंबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण पवार यांनी केले.

       या कार्यक्रमासाठी तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, प्रविण बोने, शार्दूल भोईर, डॉ.गजानन गुंजकर, डॉ.शितल जोशी-घुगे, डॉ.फरहाना अत्तार, डॉ.मानसी ठाकूर, डॉ. दिपक गोसावी,डॉ.योगेश पाटील तसेच जिल्हा रुग्णालयातील इतर अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment