प्रदूषणमुक्त इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी डॉल्फिनची याहीवर्षी जागृती मोहिम - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 19, 2020

प्रदूषणमुक्त इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी डॉल्फिनची याहीवर्षी जागृती मोहिम

 प्रदूषणमुक्त इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी डॉल्फिनची याहीवर्षी जागृती मोहिम


उमेश पाटील -सांगली


      जरी यावर्षी कोरोनाचे सावट असले तरी परंपरेनुसार थाटामाटामध्ये योग्य ती काळजी घेऊन श्रीगणेशाचे आगमन प्रत्येक घराघरात नक्कीच होणार आहे. दरवर्षीच आपण श्री गणेशाचे आगमन मोठ्या जल्लोषात करतो.श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून मोठ्या भक्तिभावाने पूजा करतो.परंतु बदलत्या काळामध्ये या उत्सवाचे स्वरूपच बदलत चालले आहे. उत्सव काळामध्ये अनेक कारणांमुळे  पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी व त्याबाबत जनजागृतीचे कार्य डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप ही संस्था सन 2000 पासून गेली 21 वर्षे सातत्याने करत आहे.

     घातक ठरणाऱ्या प्लास्टरच्या ऐवजी शाडूची किंवा कागदी लगद्यापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.या मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करावे.निर्माल्य पाण्यात विसर्जित करू नये.त्या ऐवजी आपल्या बागेमध्ये करावे त्यामुळे निर्माल्य चे खतात रूपांतर होऊन निसर्गाला व आपल्यालाही दुहेरी फायदा होईल.    ते शक्य नसल्यास निर्माल्य कुंडामध्ये निर्माल्य दान करावे. आरास करतांना त्यामध्ये थर्माकोल व प्लास्टिक चे घटक वापरू नये.  अशा प्रकारे जागृती करण्याचे काम डॉल्फिन ही संस्था गेली 21 वर्षे करत आहे.


दरवर्षी शाळा,कॉलेज,संस्था या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तसेच माहिती पत्रकाद्वारे संस्थेचे सदस्य जनजागृती करत असतात.केवळ जागृतीच नव्हे तर उत्सव काळात जलप्रदूषण रोखण्यासाठी सांगली व सातारा जिल्ह्यात कृष्णा घाटावर प्रत्यक्ष निर्माल्य संकलनाचे कार्य संस्था गेली 21 वर्षे करत आहे.आपण निर्माल्य पाण्यात विसर्जित करतो.पाण्यामध्ये विसर्जित केलेले निर्माल्य कालांतराने कुजले जाऊन अनेक रोगकारक जंतूंचा प्रादुर्भाव होतो.निर्माल्याबरोबर प्लास्टिकचे अनेक घटक, कॅरिबॅग्स, थर्माकोलही पाण्यात टाकतो. त्यामुळे जलप्रदुषणाचा  मोठा धोका आपणच आपल्या हाताने निर्माण करत आहोत. यासाठी निर्माल्य नदीपर्यंत न आणता घरच्या घरी बागेमध्ये छोट्या खड्ड्यामध्ये विसर्जित केल्यास कालांतराने ते कुजले जाऊन त्याचे नैसर्गिक खतामध्ये रुपांतर होऊन पर्यावरणाला त्याचा दुहेरी फायदा होईल.हा विचार रुजविण्याचे काम डॉल्फीनचे सदस्य गेली 21 वर्षे करत आहेत.या जागृतीमुळे निर्माल्य घरच्या घरी विसर्जित करण्याचे प्रमाण वाढले असून घाटावर गणेशभक्त निर्माल्य वेगळे आणतात व डॉल्फिन नेचरच्या सदस्यांकडे आनंदाने सोपवतात.

   यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे जनजागृतीचे काम अॉनलाईन पध्दतीने तसेच सोशल मेडियाचा वापर करून केले जात आहे. गुगल फॉर्म व्दारे गणेश भक्तांकडून ईको-फ्रेंडली उत्सव साजरा करणार असल्याबद्दल स्वेच्छा वचनपत्र भरून घेण्याची मोहिम ही राबविली जात आहे. त्यास संपूर्ण  महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक शशिकांत ऐनापुरे यांनी दिली.

     या प्रकल्पाचे संयोजन संस्थेचे संस्थापक शशिकांत ऐनापुरे,अदिती कुंभोजकर , रविना सावंत , श्वेता ढगे, अध्यक्ष अरुण कांबळे,सचिव डॉ.पद्मजा पाटील आदी सदस्य करत आहेत.

No comments:

Post a Comment