सिव्हील मधील मृत अर्भक प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा आ. शिवेंद्रसिंहराजे; - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, August 9, 2020

सिव्हील मधील मृत अर्भक प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा आ. शिवेंद्रसिंहराजे;सिव्हील मधील मृत अर्भक प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा
आ. शिवेंद्रसिंहराजे; 


पालकमंत्र्यांनी लक्ष घालून संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

मिलिंद लोहार -सातारा

सिव्हील हॉस्पिटल अर्थात जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्याची आरोग्यवाहिनी आहे. गोर- गरीब रुग्णांचा आधारस्तंभ असलेल्या या रुग्णालयात मात्र अनागोंदी माजली आहे. नुकत्याच घडलेल्या मृत अर्भक प्रकारामुळे तर रुग्णांमध्ये भितीचे वातावरण असून घडल्या प्रकारामुळे रुग्णालयाची विश्‍वासाहर्ता धोक्यात आली आहे. घडलेला प्रकार गंभीर असून याची स्थानिक नव्हे तर, पोलीस यंत्रणेच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांमार्फत चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. दरम्यान, पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनीही या प्रकरणात लक्ष घालून रुग्णालयाची विश्‍वासाहर्ता टिकण्यासाठी या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढावीत, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनागोंदी आणि मनमानी कारभाराचे अनेक प्रकार उजेडात येत असतानाच संपुर्ण जिल्हा हादरवून टाकणारी घटना उघड झाली. जिल्हा रुग्णालयात ड्रेनेजमध्ये मृत अर्भक सापडले असून जिल्हा रुग्णालयात कशाप्रकारे अंगाचा थरकाप उडवणारे कामकाज चालते याची प्रचिती जिल्हावासियांना आली आहे. रुग्णालय प्रशासनाने थातूरमातूर कारणे सांगून आणि स्थानिक चौकशी समिती नेमून या गंभीर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे प्रकरण फार गंभीर असून रुग्णांच्या जीवाशी व भावनांशी खेळण्याचे प्रकार सुरु आहेत. स्थानिक समिती मार्फत अथवा आरोग्य विभागामार्फत चौकशी करुन काहीही कारवाई होणार नाही. उलट पाठीशी घालण्याचे प्रकार होणार आहेत. त्यामुळे या गंभीर आणि संवेदनशील प्रकाराची चौकशी पोलीस यंत्रणेतील उच्चस्तरीय समितीमार्फत झाली पाहिजे. या प्रकरणाची संपुर्ण पाळेमुळे खोदून काढुन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे तरच जिल्हा रुग्णालयातील मनमानी आणि रामभरोशे असणारा कारभार थांबणार आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून रुग्णालयातील काही डॉक्टर्स गैरहजर असतात पण त्यांचा पगार मात्र चालू असतो. काहींना रुग्णांना तपासण्यासाठी वेळ नसतो. असे अनेक डॉक्टर्स असून अशा कुचकामी आणि रुग्णसेवा न देणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांची शासनाने तातडीने बदली करावी आणि त्यांच्या जागी ज्यांना रुग्णसेवेची आवड आणि नोकरीची गरज आहे, अशा डॉक्टर्सना नेमावे, अशी मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. काही डॉक्टर्सकडून तर आपणच मालक आहोत अशा अविर्भावात मिरवून रुग्णसेवेला तिलांजली देण्याचे प्रकारही रुग्णालयात सुरु आहेत. रुग्णालयातील कारभाराबात प्रसारामध्यमातून अनेक वृत्त प्रसिध्द झाली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अशा डॉक्टर्सची तातडीने बदली करुन रुग्णांना चांगली सेवा मिळण्यासाठी काम करणार्‍या डॉक्टर्सची नियुक्ती करावी.

घडल्या प्रकारामुळे सिव्हील हॉस्पिटलमधील वास्तव समोर आले असून रुग्णांमध्ये भितीचे वातावरण आहे. खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नसल्याने जिल्ह्यातील हजारो गोर- गरीब रुग्णच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. मात्र अशा प्रकारांमुळे रुग्णालयाची विश्‍वासाहर्ता कमी झाली असून रुग्णांमध्ये उपचार घेण्याचे धारिष्ट्‌य राहणार नाही. मग अशा गरजू रुग्णांनी उपचारासाठी जायचे कुठे? असा गंभीर प्रश्‍न उपस्थित झाला आहे. जिल्हा रुग्णालयाची विश्‍वासहर्ता टिकून राहण्यासाठी घडल्या प्रकाराची सखोल चौकशी होवून दोषींवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकारात पालकमंत्री ना. पाटील यांनी स्वत: लक्ष घालावे. उच्चस्तरीय पोलीस अधिकार्‍यांमार्फतच या प्रकरणाची चौकशी करावी आणि सत्य जनतेसमोर आणावे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment