मृत्युंजय'! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 18, 2020

मृत्युंजय'! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख

 मृत्युंजय'!महाभारतातील एक ओजस्वी व्यक्तिमत्व ठरलेल्या महारथी कर्ण यांच्या जीवनावरील तितक्याच भावस्पर्शी भाषेत 'मृत्युंजय' ही कादंबरी लिहिणारे साहित्यिक शिवाजी सावंत यांचा आज १८ वा स्मृतिदिन.
इतिहास व पुराणांच्या पानांतील विलक्षण व्यक्तिरेखांवर सखोल अभ्यास करून त्यांचे वेगळेच व्यक्तिचित्र वाचकांसमोर आणण्याचे काम ज्यांनी केले, अशा भारतीय साहित्यसृष्टीतील निवडक कादंबरीकारांमध्ये सावंत यांची गणना होते.महारथी कर्ण यांच्याविषयी प्रचलित समजुतींना उभा छेद देण्याचे धाडस सावंतांनी दाखवले व त्यात ते यशस्वीही झाले. 'मृत्युंजय'ची अनेक भारतीय भाषांत भाषांतरे झाली व त्यांनी खपाचे उच्चांक गाठले. 'मृत्युंजय'ची जुळवाजुळव व संशोधन-लिखाण करण्यासाठी सावंत कुरुक्षेत्र गावात जाऊन राहिले होते.


केवळ एक पौराणिक कादंबरी लिहून सावंत थांबले नाहीत. महाभारतातील आणखी एक व्यक्तिरेखा भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनातील अदृश्य कंगोरे विशद करणारी 'युगंधर' कादंबरी त्यांनी लिहिली.


नंतर गैरसमजाच्या गर्तेत साडे तीनशे वर्षे जखडलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरील त्यांची 'छावा' ही कादंबरीही गाजली. या कादंबरीचे पुढे नाट्य रुपांतरही झाले.


अत्यंत सामान्य परिस्थितीतून सावंत पुढे आले. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात झाला. सावंत उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले आणि मग वाणिज्य शाखेतील पदविका (GCD) घेतली. टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली, आणि नंतर ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत १९६२ ते १९७४ या काळात शिक्षक होते.पुण्यात स्थायिक झाल्यावर १९७४ ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ’लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक, व नंतर संपादक म्हणून काम केले. १९८३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुढील आयुष्यात फक्त लेखनावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले.


डोक्यावर सैनिकी टोपी, तलवार कट मिशा व सदैव हसरा चेहरा लाभलेले सावंत गप्पांचे फड बघता बघता जमवायचे. मी 'महाराष्ट्र टाइम्स'चा संपादक असताना अनेकदा ते संध्याकाळी अचानक येत व मग मध्यरात्र उलटेपर्यंत विविध विषयांवर मनसोक्त गप्पा मारीत.


२००२च्या कराडच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या लढतीत ते उतरले गावागावात साहित्यिकांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी भटकत राहिले. याच मोहिमेवर ते गोव्यात गेले. तिथे अति परिश्रमांमुळे ह्रदय विकाराने त्यांचे आकस्मिक निधन झाले.


'मृत्युंजय'कार मृत्यूला शरण गेला.


No comments:

Post a Comment