'...रे मला तुझ्या बिगर करमेना !' डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख!! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 25, 2020

'...रे मला तुझ्या बिगर करमेना !' डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख!!

 '...रे मला तुझ्या बिगर करमेना !'


डॉ.भारतकुमार राऊत

(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)

मराठी संगीत रंगभूमाचे पुनरुज्जीवन घडवून आणणारे प्रतिभावंत नाटककार, सडेतोड पत्रकार-संपादक, उर्दू व संस्कृतचे जाणकार व शिवसेनेचे माजी खासदार अशा विविध गुणविशेषांमुळे प्रसिद्ध अशा विद्याधर गोखले यांचा आज तेविसावा स्मृतिदिन.ज्या काळात संगीत रंगभूमीचा सुवर्ण काळ संपून ती मरणप्राय स्थितीला पोहोचली होती, त्या काळात 'पंडितराज जगन्नाथ', 'मदनाची मंजिरी' यासारखी कसदार नाटके लिहून ती जबरदस्त लोकप्रिय करण्याचे काम गोखलेंनी केले.


गोखलेंना पत्रकार व निकटवर्तीय 'अण्णा' या नावाने संबोधत. त्यांची पत्रकारितेतील कारकीर्द 'लोकसत्ता'त बहरली. तिथेच ते आधी सहसंपादक व पुढे संपादक झाले.


दैनिक पत्रकारितेला साहित्यिक-सांस्कृतिक डुब देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वामुळेच लोकसत्तेला 

लोकतंत्र हितार्थाय

विवेका लोकवर्धिनी ।

उद्बोधनाय लोकानाम्

लोकसत्ता प्रतिष्ठिता ।।

हे बोधवचन मिळाले.अण्णांचे संस्कृतबरोबरच उर्दूवर प्रभुत्व होते. त्यामुळेच कालिदासाच्या रचनांबरोबरच मिर्झा गालिबच्या शायरीच्या वापर त्यांच्या साहित्यिक व वृत्तपत्रीय लिखाणात दिसतो.


अण्णा पेशाने पत्रकार असले तरी त्यांचा मूळ पिंड नाटककाराचा होता. त्यांनी अनेक नाटके लिहिली. त्यातली ही नाटके विशेष गाजली.
संगीत अमृत झाले जहराचे (१९६५), संगीत चमकला ध्रुवाचा तारा (१९६९) संगीत जय जय गौरीशंकर (१९६६), संगीत पंडितराज जगन्नाथ (१९६०), बावनखणी (१९८३), संगीत मदनाची मंजिरी (१९६५), संगीत मंदारमाला (१९६३), संगीत मेघमल्हार (१९६७), साक्षीदार (१९६०), सुंदरा मनामध्ये भरली, संगीत सुवर्णतुला (१९६०), संगीत स्वरसम्राज्ञी (१९७३).
अण्णांचे हिंदुत्वावर राजकीय निष्ठा होती. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवली व जिंकली. पण ती लोकसभा अल्पायुषी ठरली. पुढील निवडणुकीत ते पराभूत झाले.


आज अण्णांचे स्मरण करताना 'स्वर सम्राज्ञी' नाटकातील त्यांचे हे अजरामर पद ओठांवर येते.


कशी केलीस माझी दैना
रे मला तुझ्या बिगर करमेना !
घडिभरी माझिया मना, 
चैन पडेना, झोप येईना,
रे मला तुझ्या बिगर करमेना !
तू राघू तुझी मी मैना
माझं रूप बिलोरी ऐना
अंगी इष्काचा आजार, 
करी बेजार, कमति होई ना,
रे चैन पडेना, 
मला तुझ्या बिगर करमेना !
तू हकीम होऊन यावे
एकांती औषध द्यावे
दे चुंबन साखरपाक, 
मिठीचा लेप, मजसि सजणा,
रे मनमोहना, 
मला तुझ्या बिगर करमेना !


No comments:

Post a Comment