महाड मधील आर्किटेक्चर, आणि सिव्हील इंजिनिअरची पालिकेकडून पुनर्पडताळणी
पुनर्पडताळणी होईपर्यंत ब्लॅकलिस्ट समावेश
निलेश पवार-महाड
महाड मधील तारिक गार्डन इमारत कोसळल्यानंतर इमारत बांधकाम बाबत अनेक प्रश्न समोर आले आहेत. यापैकी शहरातील पालिकेकडे नोंदणीकृत आर्किटेक्चर, सिव्हील इंजिनिअर, स्ट्रक्चरल डिझायनर यांच्या नोंदणी रद्द केल्या असून जोपर्यंत मूळ दाखले, कागदपत्र जमा होत नाहीत तोपर्यंत या सर्वांचा समावेश ब्लॅकलिस्ट मध्ये करण्यात आला आहे. यामुळे इमारत बांधकाम क्षेत्रात खळबळ माजली आहे.
महाड मधील तारिक गार्डन हि इमारत कोसळल्यानंतर व्यावसाईक बांधकाम क्षेत्रात खळबळ माजली आहे. इमारत बांधकाम करताना होत असलेल्या चालढकलीमुळे इमारत बांधकामाबाबत आता संशयित दृष्टीने पहिले जात आहे. तारिक गार्डन दुर्घटनेची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नसून महाड नगर पालिकेने मात्र आता बांधकाम क्षेत्रावर करडी नजर टाकण्यास सुरवात केली आहे. महाड नगर पालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या सिव्हील इंजिनिअर, आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल डिझायनर यांना त्यांचे सर्व कागदपत्र पुन्हा सादर करण्यास सांगितले आहे. मूळ कागदपत्र जोपर्यंत सादर केली जात नाहीत तोपर्यंत सिव्हील इंजिनिअर, आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल डिझायनर यांची नोंदणी रद्द केली आहे. यामुळे सिव्हील इंजिनिअर, आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल डिझायनर यांच्यासह बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. महाड नगर पालिकेकडे जवळपास ७१ सिव्हील इंजिनिअर, आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल डिझायनर यांची नोंदणी आहे. या सर्वाना महाड नगर पालिकेच्या बांधकाम विभागाकडून मूळ कागदपत्र सादर करण्यास कळवले आहे. महाड नगर पालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाड मधील ७१ सिव्हील इंजिनिअर, आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल डिझायनर यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यापैकी चार जणांची नोंदणी सक्रीय यादीत करण्यात आली आहे.
इमारत बांधकाम होत असताना सिव्हील इंजिनिअर, आर्किटेक्चर यांची प्रमुख जबाबदारी असते. मात्र महाड नगर पालिकेकडून एकदा का इमारत बांधकाम परवाना मिळाला कि अवघ्या कांही दिवसातच इमारत उभी राहते. याठिकाणी सर्वच नियम धाब्यावर बसवले जातात. पालिकेच्या हि बाब लक्षात आल्याने हि नोंदणी पुनर्पडताळणी केली जात आहे. या पुनर्पडताळणी मुळे सर्वांचे धाबे दणाणले आहेत. ज्यांचे ज्यांचे कागदपत्र सादर होतील त्या कागदपत्रांची, मूळ दाखल्यांची तपासणी करून त्यांना सक्रीय यादीत समावेश करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती महाड नगर पालिकेचे बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांनी दिली.