कोसबाडच्या टेकडीवरून! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख!! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, September 26, 2020

कोसबाडच्या टेकडीवरून! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख!!

 कोसबाडच्या टेकडीवरून!


डॉ.भारतकुमार राऊत

(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)

महाराष्ट्रातील दुर्गम आदिवासी पाड्यांच्या अंगणांवर शिक्षणाचा सुवास पोहोचविणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा आज स्मृतिदिन.प्रसिद्धीच्या झगमगाटापासून कटाक्षाने दूर राहून समाजातल्या रंजल्या-गांजल्या व शिक्षणापासून दूर ठेवण्यात आलेल्या गरीब आदिवासींच्या मुलांसाठी त्यांच्याच गावांत 'अंगणवाडी' सुरू करण्याची योजना अनुताईंनी राबवली.


हयातीच्या उत्तरार्धात त्यांना अनेक मान-सन्मान लाभले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री बहाल केली. या साऱ्याकडे त्या मात्र 'इदं न मम' अशा त्रयस्थ वृत्तीनेच पाहात. या सन्मानांमुळे माझ्या कामाला मदत होते, असे त्या म्हणत.


सुप्रसिद्ध समाजसेविका ताराबाई मोडक या अनुताईंच्या गुरू व आदर्श. त्यांच्या प्रेरणांवर व मार्गदर्शनाखालीच अनुताईंनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड गावात ग्रामीण शिक्षणासाठी 'अंगणवाडी' सुरू केली. हा प्रयोग यशस्वी झाला व अनुताईंनी अंगणवाडीची चळवळच सुरू केली. गावागावात। अंगणवाड्या सुरू झाल्या व खेडोपाड्यातली हजारो मुले शिकू लागली. आज अंगणवाडीला सरकारी मान्यता व सहाय्य लाभले आहे.


शिक्षण व्यवस्था समाजातील केवळ एका वर्गाची मक्तेदारी न राहता त्याची दारे सर्वांना खुली व्हावीत म्हणून जुन्या-नव्याचा समन्वय साधत अनुताईंनी ताराबाई मोडकांची-आपल्या गुरूची, स्वप्ने सत्यात उतरवली. 

पारंपारिक चौकटीच्या बाहेर जाऊन आधुनिक पद्धतीने शिक्षणाची क्रांती घडवली. त्यांची आपल्या कामावर अत्यंत निष्ठा होती. या शाळेत त्यांनी मुलांना आंघोळीपासून सर्व स्वच्छता शिकवली. अनुताईंनी बोर्डी, डहाणू भागातील वारली आदिवासींच्या मुलींना शिक्षण दिले. 


ग्रामीण व आदिवासी शिक्षणाशी निगडीत विपूल लेखन त्यांनी केले. ‘शिक्षणपत्रिका’ व ‘सावित्री’ ही मासिके, तसेच ‘बालवाडी कशी चालवावी’, ‘विकासाच्या मार्गावर’, ‘कुरणशाळा’, ‘सहज शिक्षण’ ही पुस्तके - यांच्या माध्यमातूनही त्यांनी आपल्या शैक्षणिक विचारांचा प्रसार केला. ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हे त्यांचे आत्मवृत्त प्रसिद्ध आहे.


२७ सप्टेंबर १९९२ रोजी या आदर्श समाजसेविकेचे वयाच्या ८२ व्या वर्षी बोर्डी येथे निधन झाले. शांतपणे तेवत राहून लाखोंचे आयुष्य ज्ञानाच्या प्रकाशात उजळून टाकणारी ज्योत कायमची निमाली.No comments:

Post a Comment