जिल्ह्यात 12 हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण
उर्वरित पंचनामे चार दिवसात होणार
उमेश पाटील -सांगली
जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अठरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. 29 हजार 404 शेतकऱ्यांचे 11 हजार 976 हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले. त्यामध्ये सर्वाधिक तासगाव तालुक्यातील 2 हजार 133 हेक्टरवरील पंचनाम्यांचा समावेश आहे. अद्याप सात हजार हेक्टरवरील पंचनामे अपूर्ण असून चार दिवसांत पूर्ण केले जाणार असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक बसवराज मास्तोळी यांनी सांगितले.
परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. चार-पाच दिवस सर्वत्र तुफान पाऊस पडला. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यात परतीच्या पावसाने कहरच केला. त्यामुळे शेतीला फटका बसला आहे. डाळींब, द्राक्ष, भूईमुग, ऊस, तुर, भाजीपाला कोटयवधीचे नुकसान झाले आहे. चार ते पाच फुट इतके सध्या शेतात पाणी साचून राहिले आहे. नदीकाठची शेती, वाहुन गेली अनेक ठिकाणी बांध फुटल्याने शेतीचे नुकसान झाले असून प्रशासनाकडून पंचनामे केले जात आहेत. नजरअंदाजे 19 हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. मागील सहा महिने कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटात शेती आणि शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. कोरोनाची महामारी कमी होत असताना आता परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे.
जिल्ह्यातील 29 हजार 404 शेतकऱ्यांचे 11 हजार 976 हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मिरज तालुक्यातील 2826 शेतकऱ्यांचे 1624 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले. वाळवा तालुक्यातील 3,613 शेतकऱ्यांचे 945 हेक्टर, शिराळा 4,147 शेतकऱ्यांचे 647 शेतकरी, पलूस तालुक्यातील 1,235 शेतकऱ्यांचे 291 हेक्टर, कडेगाव 1,087 शेतकरी 273 हेक्टर, खानापूर 3,030 शेतकरी 1,363 हेक्टर, तासगाव 3,876 शेतकरी 2,133 हेक्टर, आटपाडी 3,631 शेतकरी 1,887 हेक्टर, कवठेमहांकाळ 3,457 शेतकरी 1,599 हेक्टर आणि जत तालुक्यातील 2,502 शेतकऱ्यांचे 1,310 हेक्टरवरील पिकांचे पूर्ण झाले. अद्याप सात हजार हेक्टरवरील पंचनामे अपूर्ण आहेत. शासनाने दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुर्ळ उर्वरित पंचनामे चार दिवसात पूर्ण होतील, असे कृषी अधिक्षक मास्तोळी यांनी सांगितले.