महानायक : दोन आठवणी, डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख!! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, October 10, 2020

महानायक : दोन आठवणी, डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख!!

 महानायक : दोन आठवणी

डॉ.भारतकुमार राऊत

(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)


भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७८वा वाढदिवस. त्यांचे अभीष्टचिंतन !'सात हिंदुस्थानी'पासून सुरू झालेली त्यांची चंदेरी दुनियेची सफर पाच दशके उलटून गेली तरी त्याच वेगाने व उत्साहाने चालू आहे.


या त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल इतक्या ठिकाणी इतके बोलले, लिहिले गेले आहे की, आज काहीही लिहिले तरी ती दुरुक्तीच ठरेल. म्हणून या महानायकाच्या केवळ दोन आठवणी इथे नमूद करत आहे.

....

मी 'महाराष्ट्र टाइम्स'चा संपादक होतो, तेव्हाची गोष्ट.अभिषेक व ऐश्वर्या राय यांच्या विवाहाची धामधूम नुकतीच संपली होती, मात्र त्याचे माध्यमातील कवित्व चालूच होते. विवाहाच्या सोहळ्यात प्रेस फोटोग्राफर्स व कॅमेरामेनना मारहाण झाल्याने त्यांच्या संघटनेने बच्चन परिवारावर पूर्ण बहिष्कार घातला होता.काही आठवडे गेले. काहीच मार्ग निघत नव्हता. प्रसिद्धीच्या वर्तुळात सतत राहणाऱ्यांची घुसमट होतीच, शिवाय त्याचे व्यावसायीक परिणामही आता दिसू लागले. बहिष्कारात टाइम्स गट अर्थातच आघाडीवर होता.एक दिवस दुपारच्या सुमारास केबिनच्या बाहेर कोलाहल ऐकू आला व काय होतेय ते कळायच्या आतच ताड-माड उंचीचा अमिताभ बच्चन आत आला. मागोमाग त्याचे सुरक्षा रक्षक आत शिरू लागले. त्यांना हातानेच मागे ढकलून त्याने नमस्कार केला. 


'नमस्ते. मैं अमिताभ बच्चन', भारतात सर्वाधिक लोकांना ठाऊक असलेल्या   अमिताभला स्वत:ची ओळख सांगायची काय आवश्यकता होती? 'कसे आहात?' असे म्हणत त्यांनी मोडक्या मराठीत बोलायला सुरुवात केली.


मी 'बसा' म्हणेपर्यंत हा नायक उभाच होता. ही शालिनता, सभ्यता की आदब ते कळले नाही, पण इतके नक्की की हा माणूस 'वेगळा' होता.


पुढे अर्धा तास मनमुराद गप्पा झाल्या. पत्रकारिता, सिनेमा, वाचन, कौटुंबिक जीवन, बंगाल, मुंबई, असे सारे काही. या माणसाचे अफाट वाचन आहे. सिनेमापेक्षा त्याला नाटके व काव्यगायनाचे कार्यक्रम अधिक आवडतात. वडिल हरिवंशराय बच्चन यांच्या कविता मुखोद्गत आहेतच, शिवाय रामधारी सिंह दिनकर, द्वारकाप्रसाद द्विवेदी अशा अनेकांच्या कवितांच्या पंक्ती त्याच्या बोलण्यातून पाझरत होत्या.या ऊंच माणसाच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे वेगळेच पैलू समोर येत होते. संपूर्ण काळात आपण इथे का आलो आहोत याचा ओझरता उल्लेखही त्यांनी केला नाही.


केबिनच्या बाहेर एव्हाना पत्रकार व अन्य कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. कोणतेही आढेवेढे न घेता हा महानायक सर्वांना भेटला. त्या काळात 'सेल्फी' रुळलेली नव्हती व फोटोग्राफर्सचा बहिष्कार होता. त्यामुळे फोटो निघाले नाहीत. पण साऱ्यांनी त्याचे रुप डोळ्यात साठवले.


नंतर माझ्याच पुढाकाराने टाइम्समधील सर्व संपादकांशी एकत्र भेट झाली. त्याने स्पष्ट व नि:संदिग्धपणे साऱ्यांची माफी मागितली व तो आला तस्साच लांब लांब टांगा टाकत निघूनही गेला.


चक्रे फिरली व टाइम्सने बहिष्कार मागे घेतला. दोनच दिवसांत साऱ्यांनी तेच केले.

संसद सदस्य असताना

आता मी संसद सदस्य झालो होतो. अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन समाजवादी पार्टीच्या खासदार आहेत. त्यांची बसण्याची जागा माझ्या शेजारच्याच ब्लाॅकमध्ये. त्यामुळे येतां जाता त्यांच्याशी परिचय होताच.


याच काळात मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातर्फे स्वातंत्र्यवीरांनी रचलेल्या उर्दु गझला व हिंदी गीते यांची डीव्हीडी काढण्याचे ठरले. इतक्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी निवेदनाचा आवाजही तितकाच मजबूत हवा. 


अनेक नावांवर चर्चा झाली व एकमताने अमिताभ बच्चन यांचे नाव ठरले. त्यांच्याकडे विचारणा करण्याची जबाबदारी माझ्याकडेच आली.


जया बच्चन यांच्याकडे शब्द टाकला खरा, पण बच्चन यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे व सततच्या दौऱ्यांमुळे शक्यच होत नव्हते. अखेर मुहुर्त मिळाला. जयाबाई म्हणाल्या, स्क्रीप्ट पाठवून द्या. ताबडतोब सर्व गाण्यांच्या संहिता, निवेदन, सावरकरांची पुस्तके सारे गोळा केले.


योगायोगाने बच्चन दिल्लीत होते. त्यांना प्रत्यक्षच भेटलो. वीर सावरकर या नावाबद्दल त्यांना अतीव आत्मियता असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. त्यांनी स्क्रीप्ट वाचली. त्यावर काही खुणा केल्या. मग स्वत:शीच ते वाचले.


पुढच्या मिनिटाला त्यांनी रेकाॅर्डिंगला होकार दिला. माझी सेक्रेटरी तारीख कळवेल, असे सांगून ते गेले. होकार तर मिळाला पण अमिताभच्या आवाजात रेकाॅर्डिंग करायचे, तर स्टडिओही तसाच हवा. अशा अद्ययावत स्टुडिओचे भाडे किती असेल, ते परवडेल का? अशा शेकडो शंकांनी ग्रासले.


अखेर सेक्रेटरीचा फोन आला. दुसऱ्याच दिवशी सकाळी नऊची वेळ दिली होती. जुहूच्या त्यांच्याच मित्राच्या स्टुडिओत रेकाॅर्डिंग करायचे ठरले. साधारणपणे दिलेल्या वेळेनंतर चार तासांनी सेलेब्रिटी मंडळी उगवतात, असा अनुभव असतो.


पण आमचे लोक स्टुडिओत पोहोचले, तेव्हा त्यांच्या स्वागतालाच अमिताभ दरवाज्यात उभे होते. त्यांनी तातडीने कामाला सुरुवातही केली. दोन वेळा तालिम करून रेकाॅर्डिंग पुरे झाले. 


सावरकरांचे तेजस्वी विचार आणि अमिताभचा गडगडाटासारखा धीरगंभीर आवाज. सारे वातावरण भारून गेले. त्याच रात्री दोन वाजता त्यांनी वीर सावरकरांच्या रचनांबद्दल ट्वीटही केले.


दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन खणाणला, 'अमिताभ बोलतोय. कसं काय चाललंय?' ते आठवणीने मराठीतच बोलले. 'माझी काॅमेंटरी कशी वाटली?' इतकेच विचारण्यासाठी हा फोन होता.


इतका साधा माणूस!


Happy Birthday! Amit ji!No comments:

Post a Comment