Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महाबळेश्वर पाचगणीचे नंदनवन होणार ब वर्ग पर्यटन स्तराचा दर्जा

 


महाबळेश्वर पाचगणीचे नंदनवन होणार  ब वर्ग पर्यटन स्तराचा दर्जा

गिरीस्थळ_आता_अधिक_बहरणार...

  मिलिंद लोहार -
महाराष्ट्र मिरर टीम पुणे



महाबळेश्वर आणि पाचगणी म्हटलं कि चटकन आठवतं ते म्हणजे थंड हवेच ठिकाण ...  पण एवढ्यावर महाबळेश्वरची ओळख थांबत नाही...  इथे पाच नद्या उगम पावल्या असल्यामुळे हे मोठं तीर्थस्थळ आहे... छञपती शिवरायांनी अफझलखानाचा वध ज्या किल्याच्या पायथ्याशी केला तो प्रतापगड इथल्या पंचक्रोशीत येत असल्यामुळे मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची पान इथे आहेत...  अशा या गिरिस्थानाला शासनाने आता ' ब ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. आजूबाजूला जावळीच्या खोऱ्यातील जंगल आणि मध्ये टुमदार असं महाबळेश्वर गिरिस्थान म्हणून अधिक लक्षवेधी आहे. आता या दर्जामुळे उत्तम सुविधा मिळतील... लॉक डाऊन पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महाबळेश्वर दौरा झाला होता, त्यावेळी पर्यटन म्हणून इथे काय काय विकास होऊ शकतो. याचे सादरीकरण झाले होते, त्या दिशेनी हे पहिले पाऊल आहे... त्या निमित्तानी घेतलेला हा भूतकाळ ते वर्तमान घेतलेला आढावा...  !! 



महाबळेश्वर गिरीस्थळ झाले कसे

देश, विदेशातील लोकांना खुणावणारे पर्यटकांचे शहर ... इथे आलेला माणूस इथल्या पर्यावरणावर  फिदाच होतो.  हे भौगोलिक वातावरण पाहूनच ब्रिटीशांनी ब्रिटीश प्रेसिडेन्सीच्या काळात या गिरीस्थळाला  जगाच्या नकाशावर प्रस्थापित केले. इथले हवामान युरोप मधील हवामानाशी मेळ खाणारे होते. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्व उच्च पदस्थ अधिकारी इथे राह्यला येतं असत. त्यातून अनेक पाश्चिमात्य गोष्टी इथे रुजू लागल्या. त्यातील स्ट्रॉबेरी हे अतिशय लाडक फळ त्याच संस्कृतीतून इथे आलं. आज देशातल्या एकूण उत्पन्नापैकी ८० टक्के उत्पन्न एकट्या महाबळेश्वर तालुक्यात होतं हे आरोग्याला पाचक आणि दिसता क्षणी तोंडाला पाणी आणणारे फळ स्ट्रॉबेरी जगात पहिल्यांदा फ्रांस मधील पाचवा चार्ल्स याच्या रॉयल गार्डन मध्ये  १३४० मध्ये  जंगलातून आणून या स्ट्रॉबेरीचे १२०० रोपटी लावले गेली. हे प्रायोगिक तत्वावरील लावलेल्या रोपट्याला आलेली फळं कोणी चाखली की नाहीत याचा उल्लेख कुठेही नाही, मात्र फ्रान्स मधील ब्रिटानी या शहरात १७५० मध्ये याची लागवड झाली आणि बघता बघता या फळाने युरोपातील लोकांच्या जीभेवर राज्य करायला सुरुवात  केली.

            महाबळेश्वर आणि स्ट्रॉबेरी

            महाबळेश्वरला गेलेला पर्यटक स्ट्रॉबेरी चाखला नाही हे अपवादानीच सापडेल. वाई चा घाट ओलांडून पाचगणीच्या जवळपास आल्यास जुन जुलै मध्ये  ढगांच्या करामती आणि हिरवाईने भरुन गेलेल्या दऱ्या,  झिंगलेल्या माणसाची झोप उडविणाऱ्या आणि नव चैतन्य पेरणाऱ्या ठरतात. मोठ मोठी पॉली हाउस लक्ष वेधून घेतात. गेल्या पाच एक वर्षापासून शासनाच्या मदतीने स्ट्रॉबेरीच्या रोपांसाठी हे पॉली हाउस शेतकऱ्यांनी उभी केली आहेत. एका पॉली हाउससाठी कृषी विभागाकडून २ लाख दहा हजार एवढे अनुदान  प्राप्त झाले असून, आता पणन मंडळाच्या मदतीने  परदेशातून रोपांची निर्यात केली जाते. 

                     महाबळेश्वर



महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देश पातळीवर लौकिकास आले आहे. तर जुने क्षेत्र महाबळेश्वर हे धार्मिक स्थळ आणि पंचनद्यांचा उगम म्हणून सर्वपरिचित आहे. महाबळेश्वर येथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो. या ठिकाणी ऐतिहासिक पंचगंगा मंदिर तसेच स्वयंभू शिवलिंगाचे महाबळेश्वर मंदिर आहे. परिसरातील अनेक पॉईंटस हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहेत. सनराईज किंवा विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, केट्स पॉईंट व त्यालाच जोडून असलेला नीडल होल पॉईंट किंवा हत्तीचा माथा, विल्सन पॉईंट, मंकी पॉईंट, लॉडविक पॉईंट, टायगर्स स्प्रिंग, कार्नेक पॉईंट, हेलेन्स पॉईंट, एलफिन्स्टन पॉईंट, बॅबींग्टन पॉईंट, बॉम्बे पॉईंट, फॉकलंड पॉईंट, बगदाद पॉईंट आदी वैशिष्ट्यपूर्ण पॉईंट महाबळेश्वर परिसरात आहेत. पावसाळ्यामध्ये महाबळेश्वर येथील लिंगमाळा धबधबा, चिनामन्स धबधबा, धोबी धबधबा नयनरम्य आनंद देतात. संपूर्ण महाबळेश्वर आणि आसपासच्या गावांना वेण्णा तलावातून पाणी पुरवठा करण्यात येतो. सौंदर्याने नटलेल्या महाबळेश्वरच्या पसिरातील पर्यटकांचे हे एक महत्वाचे जलविहाराचे ठिकाण आहे. याशिवाय महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, मध, जॅम, क्रशेस, चिक्की पर्यटकात प्रसिद्ध आहे. येथील माल्कमपेठ या नावाने प्रसिद्ध असलेली बाजारपेठ पर्यटकांचे आणखी एक आकर्षण आहे. महाबळेश्वर येथे   पर्यटकांची बारमाही गर्दी असते. 

                       पाचगणी

पाचगणी हेही थंड हवेचे ठिकाण असून तेथील टेबल लँड या ठिकाणास भेट दिल्याशिवाय पर्यटक परतत नाहीत. सिडनी पॉईंट, पारसी पॉईंट, डेव्हील्स किचन, मॅप्रो गार्डन याशिवाय मॉरल रिआर्मामेट सेंटरही येथे आहे. पाचगणी हे निवासी शाळांसाठी प्रसिद्ध असून देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी या ठिकाणी येत असतात. पाचगणी पासून जवळच असलेलं स्ट्रॉबेरीचं गाव म्हणून ओळख असलेलं आणि मागच्या काही वर्षात पुस्तकाचे गाव म्हणून नावा रुपाला आलेले भिलार आणि बाजूची गावंही आता पर्यटकांनी बहरत आहेत.या दर्जामुळे याही गावांच्या अर्थकारणावर परिणाम होईल हे निश्चित. 

'

' पर्यावरणाचे आणि निसर्ग संपन्न भोवताल याचे जतन करुन शाश्वत अशा पर्यटन विकासाचे प्रारूप  महाबळेश्वर आणि पाचगणीसाठी तयार करत आहोत. यात सर्वंकश पर्यटन विकास समोर ठेवून  योजना आखत आहोत. यासाठी  शासनाने 100 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. हे सगळं करताना निसर्गाचं संवर्धन आणि त्याला अधिक बळकटी देणारं पर्यावरण कसं निर्माण  होईल यासाठी आमचे प्रयत्न राहतील.  देशातले एक सर्वांगसुंदर असं आदर्श पर्यटन स्थळ कसे होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.''

       शेखर सिंह
        जिल्हाधिकारी, सातारा


                     बामणोली



महाबळेश्वर पासून जवळ असलेला  निसर्गाची देणगी लाभलेला बामणोली याला दक्षिण काश्मीरही संबोधले जाते. बामणोलीवरून पुढे कोयना धरणाच्या जलाशयाला भेट देण्यासाठी जाता येते. यासाठी बोटींगची व्यवस्था इथे आहे.  या ठिकाणी असलेले शांत वातावरण मनाला खूप भावते. संपूर्ण जंगलाचा परिसर, तिन्ही बाजूला पाणी आणि एका बाजूला जमीन असा निसर्गसौंदर्याचा उत्तम नमुना अनुभवता येतो. बामणोली परिसरात अनेक हिंदी, मराठी चित्रपटांचे चित्रीकरणही झाले आहे. महाबळेश्वरला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला असल्यामुळे या पंचक्रोशीची आणखी झपाट्याने कायापालट होईल. नवे अर्थचक्र अधिक गतिशील होईल.नव्या कल्पना उदयाला येतील, पाश्चिमात्य देश पाण्या  च्या कडेला असलेल्या भूभागावर पर्यटनाच्या नव्या नव्या संकल्पना निर्माण करून जगभरचे पर्यटक आकर्षित करत आहेत.त्या स्पर्धेत उतरण्यासाठीच हे पहिलं पाऊल शासनाने उचलले आहे... आता यात तुम्हाला आम्हाला अधिक गतीने पर्यावरण सांभाळून विकास करायचा आहे...  ते करूया...  !!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies