शेतीशाळेत सहभागी होऊन शेतकऱ्यांनी निर्णयक्षम व तज्ज्ञ व्हावे - विजय काळे - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, October 12, 2020

शेतीशाळेत सहभागी होऊन शेतकऱ्यांनी निर्णयक्षम व तज्ज्ञ व्हावे - विजय काळे

 शेतीशाळेत सहभागी होऊन शेतकऱ्यांनी निर्णयक्षम व तज्ज्ञ व्हावे  - विजय काळे


                  राजेंद्र मर्दाने-वरोरा सद्यस्थितीत  शेती करताना बहुतेक शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची, रोग व किडींबाबतच्या उपाययोजनांची तसेच पिकांसाठी लागणाऱ्या खत व पाण्याच्या व्यवस्थापनाची नीट माहिती नसते, त्यामुळे एकूणच नियोजन ढेपाळून उत्पादनात घट येते व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावते. यासाठी शेतकऱ्यांनी शेतीशाळेत सहभागी झाल्यास ते निर्णयक्षम व तज्ज्ञ होऊन हमखास उत्पन्न वाढवू शकतील,असे प्रतिपादन शेगाव(बु.)चे मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी केले. तालुक्यातील मौजा - अर्जूनी येथे आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांची शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.     कार्यक्रमात आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल गाडी, शेतकरी प्रमोद कुंभारे, सुधीर नन्नावरे, निखिल जुंबाडे, घनश्याम बोंडे इ. प्रामुख्याने उपस्थित होते.

        काळे पुढे म्हणाले की, तालुक्यातील शेगाव मंडळ कार्यक्षेत्रात मागील दोन वर्षात आयोजित करण्यात आलेल्या २० शेतीशाळा व ५० शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक लागवडीचे नवतंत्रज्ञान, सुधारित बियाणे, खतांचा संतुलित वापर,पिकांवर येणाऱ्या विविध कीड-रोगांवर किफायतशीर उपाययोजना इ. ची परिपूर्ण माहिती देण्यात येत आहे. शेतीशाळेत सहभागी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात शेतावर नेऊन पिकावर येणाऱ्या विविध कीड व रोगाची ओळख करून देऊन किडींचा जीवनक्रम, मित्र किडींची माहिती कृषी विभागातील अधिकारी समजावून सांगत आहेत.पिकावर आढळणाऱ्या किडींचे पतंग, अळ्या, मित्र किडी इ. पकडून शेतकरी त्याचे संग्रहालय तयार करतात. शेतकऱ्यांचे छोटे छोटे गट तयार केले असून ते झाडांचे मोजमाप घेतात, रोगाची तीव्रता मोजतात, रस शोषण करणाऱ्या व इतर किडींची तसेच मित्र किडींची संख्या मोजून व त्याची नोंद घेऊन स्वतः ड्रॉईंग शीटवर स्केचपेनच्या साहाय्याने चित्रे काढतात, त्यानंतर त्यांनी रेखाटलेल्या चार्टचे सादरीकरण केले जाते. यावेळी गुलाबी बोंडअळी व कापूस पिकाबाबतची इत्यंभूत माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. कार्यक्रमाला प्रगतशील शेतकरी सुभाष वाढई, वामन ढोणे, मारोती कुळमेथे व अन्य जिज्ञासू शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment