शांतताप्रिय, परोपकारीवृत्तीच्या वरोरावासियांचे हृदयात विशेष स्थान
-तहसीलदार सचिन गोसावी
राजेंद्र मर्दाने
महाराष्ट्र मिरर टीम वरोरा चंद्रपूर
मी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात व तालुक्यात काम केले आहे पण येथील शांतताप्रिय आणि परोपकारी नागरिकांमुळे ही कारकीर्द संस्मरणीय ठरली असून त्यांनी दिलेले प्रेम आजन्म लक्षात राहणारे असल्याने वरोरावासियांबद्दल माझ्या हृदयात विशेष स्थान निर्माण झाले आहे " असे भावोत्कट उद्गार मावळते तहसीलदार सचिन गोसावी यांनी काढले. सचिन गोसावी यांची बदली झाल्याने वरोऱ्याच्या आनंदवन मित्र मंडळ व ओशनिक बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद सभागृहात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अहेतेशाम अली होते.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गोवर्धन दुधे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा वसंतराव माणूसमारे, कार्याध्यक्ष बाळूभाऊ भोयर, ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा आनंदवन मित्र मंडळाचे सचिव राजेंद्र मर्दाने प्रभृती उपस्थित होते.
तहसीलदार गोसावी पुढे म्हणाले की, मी वरोऱ्यात रूजू झालो तेव्हा कार्यालयातील स्थिती विचित्र होती, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव होता, बरीचशी कामे प्रलंबित असल्याने कार्यालयीन घडी पूर्णपणे विस्कटलेली होती, ती व्यवस्थित केली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्यासाठी व तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी " व्हीजन डॉक्युमेंट " तयार करून अंमलबजावणी सुरू केली. आकसापोटी कोणाचेही नुकसान केले नाही. कर्मचाऱ्यांत सकारात्मक दृष्टिकोन बिंबविल्याने व त्यांनीही मनापासून साथ दिल्याने कार्याची गती वाढून अपेक्षित यश गाठता आले. जीवनात घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटनांच्या आढावा घेत केलेल्या कार्याची दखल घेऊन बदलीनंतर नामांकित सामाजिक संस्थांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम मला नेहमीच सत्कार्य करण्याची प्रेरणा देत राहील,असे ही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात अहेतेशाम अली यांनी तहसीलदार सचिन गोसावी यांचा शिस्त व शांतताप्रिय अधिकारी असा उल्लेख करीत कोव्हीड संकटातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची टीम परिपूर्ण होती पण त्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे पोकळी निर्माण झाल्याचे नमूद केले.
मर्दाने म्हणाले की, तहसीलदार गोसावी हे तळागाळातील समाजातून स्वकष्टाने व स्वकर्तृत्वाने मोठे झालेले व्यक्तिमत्त्व होय. पदाचा कधींही अहंकार न बाळगता सामाजिक बांधीलकी जपत सर्वच अभ्यागतांना एकसारखी व आपुलकीची वागणूक देत समस्यांचे निराकरण करण्याच्या कार्यशैलीने त्यांनी एक आगळावेगळा ठसा उमटवला. कोरोनाला हद्दपार करण्यासाठीचे त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले, असे नमूद करीत भविष्यातही ते सचोटीने कर्तव्य निभावतील, असा विश्वास व्यक्त केला.
डॉ दुधे यांनी तहसीलदार गोसावी यांच्या प्रशासकीय कौशल्याचे विविध पैलू उलगडून त्यांच्या सहकार्यामुळेच कोव्हीडवर नियंत्रण मिळविणे सोपे झाले, आता त्यांची निश्चित उणीव भासेल, असे सांगितले.
बाळू भोयर म्हणाले की, गोसावी हे संवेदनशील व तळागाळातील जनतेच्या समस्यांची जाण असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी असून अशाच अधिकाऱ्यांची तालुक्याला गरज आहे.
तत्पूर्वी आनंदवन मित्र मंडळ व ओशनिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे पुष्पगुच्छ, शाल, सन्मान चिन्ह, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा वरोरा तर्फे पुष्पगुच्छ व शाल , नगराध्यक्ष अहेतेशाम अली तर्फे पुष्पगुच्छ व भेटवस्तू तथा उपस्थित मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन तहसीलदार सचिन गोसावी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव प्रवीण गंधारे, ज्येष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी, शाहीद अख्तर, चेतन लुतडे, राकेश सोनानी, विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी विनोद बिरीया, प्रमोद बिरिया, धनराज बहादे, विठ्ठल लेडे, अँड. शास्त्री, कादर शेख, आनंदवन मित्र मंडळाचे पदाधिकारी प्रा.बळवंत शेलवटकर, बंडूभाऊ देऊळकर, राहुल देवडे, ओंकेश्वर टिपले व शहरातील नागरिक निरोप समारंभाकरीता उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विशाल जुमडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ प्रवीण मुधोळकर यांनी केले तर आभार राजेंद्र मर्दाने यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद नन्नावरे, संजय गांधी, सूनिल वरखडे, डॉ.वाय. एस. जाधव, वरोरा न.प. चे कार्यालय अधीक्षक गजानन आत्राम व कर्मचारीगण आदींनी सहकार्य केले.