श्रीवर्धन तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल, मागील चार दिवसांपासून एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही.
श्रीवर्धन -विजय गिरी
श्रीवर्धन तालुक्यात मागील चार दिवसांपासून एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे आता श्रीवर्धन तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे असे म्हणावे लागेल. आत्तापर्यंत श्रीवर्धन तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह 404 रुग्ण सापडले होते. त्यापैकी 378 जण पूर्णपणे बरे झालेले आहेत, तर 21 जणांचा मृत्यू झालेला आहे. आज मीतिला फक्त पाच रुग्ण कोरोना वरती उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांनी खासदार सुनील तटकरे ,पालकमंत्री अदिती तटकरे ,आमदार अनिकेत तटकरे तसेच शासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळे कोरोना वरती नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. बऱ्याच नागरिकांना आता चांगल्या सवयी जडल्याचे पाहायला मिळत आहे. बाहेरून कोठुनही आल्यानंतर हात स्वच्छ धुणे, तोंड स्वच्छ धुणे, त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे. कोणत्याही दुकानात जाताना किंवा कार्यालयात जाताना बाहेर सॅनिटायझर ठेवले असेल तर हाताला सॅनिटायझर लावूनच सर्व जण आत मध्ये प्रवेश करतात. कोरोनाचे संकटामुळे थंड पदार्थांच्या विक्रीवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कारण नागरिक सकाळी गरम पाणी पितात, दिवसात वाफेचे वाफारे घेणे इत्यादी प्रकार नेमाने करताना आढळुन येत आहेत. श्रीवर्धन नगर परिषदेकडून देखील घंटा गाड्यांवरती वारंवार कोरोनाच्या बाबतीत सूचना दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे श्रीवर्धन मधील रस्ते देखील नगरपरिषदेकडून निर्जंतुक करण्यात येत आहेत. एकूणच प्रशासनाची मेहनत व नागरिकांकडून नियमांचे काटेकोरपणे केलेले पालन यामुळेच श्रीवर्धन तालुका कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे आता दिसून येत आहे.