इंदापूर ते आगरदांडा राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे;
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकार्यांना निर्देश
अमूलकुमार जैन-मुरुड
राष्ट्रीय महामार्ग इंदापूर ते आगरदांडा या राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ चे अद्यावतीकरण व रूंदीकरणामधील वनक्षेत्र वळतीकरणा संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार , वनमंत्री संजय राठोड, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, बांधकाम विभागाचे सचिव अनिल गायकवाड, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये, आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र दळवी आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी इंदापूर ते आगरदांडा राष्ट्रीय महामार्ग अद्ययावतीकरण व रूंदीकरण हे काम मंजूर करण्यात आले आहे. सदर महामार्गा अंतर्गत रेवदंडा - इंदापूर रस्त्यांच्या कामांचे जवळपास ९० टक्के म्हणजे ४२ किमीपैकी ३७ किमी एवढे काम पूर्ण झाले असून, अर्धवट कामामुळे रस्ते अपघात वाढण्याची शक्यता आहे. याने मनुष्यजीवाला हानी पोहोचू शकते. या रस्त्याचे काम गेली अनेक महिने प्रलंबित आहे. हे काम लवकर पूर्ण झाल्यास हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून इतर जिल्ह्यांशी जोडणारा आहे. याच गावातील पर्यटन,व्यवसाय आणि व्यापा-याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित रस्त्यावर वन्यजीवांचा संचार नसल्याचे आढळून आले असून, या गावक-यांना दिलासा मिळावा या दृष्टीने सदर रस्त्याचे प्रलंबित काम पूर्ण करण्याच्या कार्यवाहीस गती देऊन पूर्ण करण्यात यावे.