Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

शहीद जवान संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात निगवे खालसा येथे अंत्यसंस्कार

 हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून पोलीस आणि लष्कराची मानवंदना

शहीद जवान संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात निगवे खालसा येथे अंत्यसंस्कार

 निरंजन पाटील/मिलिंद लोहार
महाराष्ट्र मिरर टीम कोल्हापूर

 शहीद जवान संग्राम पाटील  यांच्या पार्थिवावर आज निगवे खालसा येथे पोलीसांच्या आणि लष्कराच्या आठ जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत 3 फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलीक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

शहीद जवान संग्राम पाटील  यांचे पार्थिव आज सकाळी 6.30 च्या सुमारास कोल्हापूरहून निगवे खालसाकडे नेण्यात येत असताना, या मार्गावरील गावांकडून रस्त्याच्या दुर्तफा रांगोळी काढण्यात आली होती.  ठिक-ठिकाणी श्रध्दांजलीचे फलक लावण्यात आले होते. ग्रामस्थांकडून पुष्प वाहून आदरांजली वाहण्यात येत होती.  निगवे खालसा येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव काही काळ अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. याठिकाणी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी दर्शन घेतले. यानंतर या ठिकाणाहून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. चौका- चौकात फलक लावून आदरांजली वाहिली होती. ग्रामस्थ, विद्यार्थी - विद्यार्थिनी पुष्पहार आणि फूले वाहून आदरांजली वाहत होते. "अमर रहे अमर रहे संग्राम पाटील  अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद" अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आली.

याठिकाणी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलीक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार पी. एन. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सरपंच पांडुरंग महाडेश्वर, माजी आमदार के. पी. पाटील, अमल महाडिक यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

 सैन्य दलाच्यावतीने सुभेदार मेजर भाऊ तांबे, शहीद जवानाचे वडील शिवाजी पाटील, बंधू संदीप, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रदीप ढोले,  कर्नल शिवाजी बाबर, शिवाजी पवार, कर्नल विजय गायकवाड, सुभेदार संतोष कोकणे, सुभेदार अनिल देसाई, सुभेदार जयसिंग देशमुख, सुभेदार सीताराम दळवी, सुभेदार नारायण नरवडे, कर्नल डी. एस. नागेश आणि आजी माजी सैनिक संघटच्यावतीनेही  पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. 

 खासदार श्री. मंडलीक, पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी शोकसंदेश व्यक्त करुन आदरांजली वाहिली. राज्य शासन निश्चितपणे शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आधार देण्यासाठी उभे आहे. तरुणांना प्रेरणा देण्यासाठी  शहीद जवान संग्राम पाटील यांचा स्मृती स्तंभ उभा करावा, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  

 पोलीस आणि लष्कराच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या 3 फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर शहीद जवान संग्राम पाटील  यांचा मुलगा शौर्य याच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अधिकारी, पदाधिकरी त्याचबरोबर लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies