Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महसूल कर्मचारी संघटनेच्या दिवाळी भेटीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सुखावले

 महसूल कर्मचारी संघटनेच्या दिवाळी भेटीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सुखावले

राजेंद्र मर्दाने-वरोरा(चंद्रपूर)

 जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी  कुटुंबातील सदस्यांची ऐन दिवाळीत होणारी ससेहोलपट व हेळसांड टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रोख रक्कम व जीवनावश्यक वस्तूंची किट देण्याचा अनोखा व स्तुत्य उपक्रम राबविल्याने आत्महत्याग्रस्त कुटुंब सुखावले असून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात संघटनेबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे.

       वरोरा तालुक्यातील सुर्ला या गावच्या अनंता देसाई या शेतकऱ्याने तीन महिन्यापूर्वी कौटुंबिक गरजा भागविण्यापुरतेही अर्थार्जन शेतीतून होत नसल्याने नैराश्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यावर कुटुंबाची वाताहत होते.अख्खे कुटुंब उघड्यावर येते. कुटुंबात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण होते. देशभरातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची अशीच अवस्था आहे.हल्ली दिव्यांची रोषणाई वाढली मात्र मनातील अंधार अधिकच दृढ होत असल्याचे चित्र स्पष्टपणे जाणवते. एकमेकांना सुखी समाधानी करण्याची वृत्ती मागील तीन चार दशकात कमी होत असताना कोरोनाकाळात माणुसकीही लोप पावल्याचे चित्र विविध घटनांवरून देशवासियांनी अनुभवले आहे. परंतु सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन आपणही समाजाचे काही देणे लागतो, अशी भावना मोजक्याच व्यक्तींच्या मनात येते, ही वस्तुस्थिती आहे.गोरगरीब, पीडित, गरजूंच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी कार्य करणे, हाच खरा मानवतावाद आहे , हे अचूकपणे हेरून महसूल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्व. अनंता देसाई यांचे घर गाठले. वरोरा तहसीलदार मधुकर काळे यांनी महसूल संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजू धांडे, जिल्हा अध्यक्ष शैलेश धात्रक, सचिव आकनूरवार, संघटक अजय मेकलवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे, संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार मोहूर्ले, सचिव सूर्यकांत पाटील, नितीन पाटील, डी. डी. शंकर, देवानंद गावंडे, नंदकुमार पांडे, उल्हास लोखंडे, तलाठी उगलमुगले, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मर्दाने, देसाई कुटुंबीय व गावकऱ्यांच्या उपस्थितीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नी श्रीमती वंदना अनंता देसाई यांना ११  हजार रुपये  रोख, दीपावलीसाठी लागणाऱ्या वस्तूंसह जीवनावश्यक धान्य किट भेट देऊन त्यांचे घर दिवाळीत प्रकाशमान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या उपक्रमाची जिल्हाधिकारी डॉ अजय गुल्हाने यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली असून जिल्ह्यातील सर्व तहसील व उपविभागीय कार्यालयामार्फत राबविला जाणारा हा कार्यक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies