प्रलंबित प्रश्नांसंदर्भात विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर लवकरच नागोठणे दौऱ्यावर
राजेश भिसे-नागोठणे
नागोठणे शहर भाजप तथा रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन मोदी यांनी अलीकडेच पेणमध्ये भाजपचे युवा नेते वैकुंठ पाटील, ज्येष्ठ नेते मारूती देवरे यांचे समवेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेऊन नागोठणे शहर तसेच विभागात भेडसावणाऱ्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात त्यांचे लक्ष वेधले होते. कोरोनाच्या महामारीनंतर मध्यंतरीच्या काळात भरमसाठ रकमेची वीज बिले येऊ लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यासंदर्भात वेळोवेळी आंदोलन करूनही प्रश्न मार्गी लागला नसल्याबाबत मोदी यांनी ना. दरेकर यांचे लक्ष वेधताना या वीज बिलांसंदर्भात काही तक्रार करावयाची असल्यास नागरिकांना पाली येथील कार्यालय गाठावे लागते व त्यासाठी नाहक वेळ आणि पैसा खर्च करावा लागत असतो. ही सुविधा नागोठण्यातील विद्युत मंडळाचे कार्यालयात उपलब्ध झाली तर नागरिकांचा त्रास वाचेल.यासाठी आपण आपल्या पातळीवरून प्रयत्न करावेत अशी सूचना मोदी तसेच मारुती देवरे यांनी यावेळी केली. नागोठणे शहरासह विभागातील तरुण फळी आपल्या तसेच स्थानिक आमदार रविशेठ पाटील आणि वैकुंठ पाटील यांचे पाठीशी ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट करताना मोदी यांनी नागोठणे शहराची शुद्ध पाणी पुरवठा योजना अनेक वर्षे रखडली असली तरी, या योजनेसाठी आतापर्यंत करोडो रुपयांचा निधी खर्ची पडला आहे असे सूचित केले. येथे अनेक कंपन्या असल्यातरी शहरासह विभागात अनेक बेरोजगार तरुण नोकरीसाठी वणवण फिरत आहेत. स्थानिक कंपन्यांमध्ये नोकरीत परप्रांतीयांना प्राधान्य दिले जात असल्याने स्थानिक तरुण नोकरीवाचून वंचितच राहिला आहे. यासह अनेक प्रश्न प्रलंबितच राहिले असल्याने याला वाचा फोडण्यासाठी व ते मार्गी लावण्यासाठी आपण एकदा नागोठण्याला भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी विनंती वजा सूचना मोदी यांनी ना. दरेकर यांना केली असता, लवकरच नागोठणे दौरा घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेदरम्यान वैकुंठ पाटील यांनी आ. रविशेठ पाटील यांचे मतदारसंघातील अनेक गावे अद्यापही विकासापासून वंचित असून आपण यात लक्ष देऊन न्याय द्यावा याबाबत ना. दरेकर यांचे लक्ष वेधले.