रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरूच ;
निर्णय मिळाल्याशिवाय येथून उठायचे नाही - कोळसे पाटील यांचा आदेश
राजेश भिसे -नागोठणे
विविध प्रलंबित मागण्यांसाठी येथील रिलायन्स (पूर्वीची आयपीसीएल) प्रकल्पग्रस्तांनी लोकशासन आंदोलन संघर्ष संघटनेच्या माध्यमातून शुक्रवारी दुपारी बारा वाजल्यापासून कंपनीच्या समोर आंदोलन चालू केले असून अध्यक्ष बी. जी. कोळसे पाटील यांनी सायंकाळी उशिरा नागोठण्यात येऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. तुम्हाला ३६ वर्षे झुलवत ठेवले असून एकी दाखविल्याशिवाय ते शक्य होणार नव्हते. मात्र, आता येथील प्रकल्पग्रस्त महिला सुद्धा वाघिणीसारख्या बाहेर पडल्या असल्याने विजय जवळ आला असल्याचे कोळसे पाटील यांनी पुढे सांगितले. रिलायन्सने सांगितल्याप्रमाणे आज बैठक घेतलेली नाही. त्यांच्याबद्दल मला अजिबात प्रेम नाही.
आमचा लढा नेहमी अभ्यासपूर्णच असतो. तडजोड करण्यासाठी कधीही कोणाला भेटत नाही. त्यामुळे तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड यांचेसह शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, प्रमोदिनी कुथे, चेतन जाधव, सुरेश कोकाटे, बळीराम बडे आदींसह शेकडो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. दरम्यान, कोळसे पाटील यांनी पुणेकडे परतत असताना आंदोलनाचे ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेले माणगावचे डीवायएसपी रणजित पाटील आणि नागोठणे पोलीसठाण्याचे निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांचेशी दहा मिनिटे चर्चा केली. मात्र, चर्चा एकांतात असल्याने त्याचा तपशील समजू शकला नाही. दुसऱ्या दिवशीच्या दुपारपर्यंत रिलायन्स तसेच एकही सरकारी अधिकाऱ्याने आंदोलनाचे ठिकाणी भेट दिली नसल्याचे स्पष्ट होत आहे.