Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न करणार

 नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न करणार-राज्यमंत्री शंभूराज देसाई

मिलिंद लोहार- पुणे  परंपरागत व्यवसाय प्रशिक्षणात सुधारणा करुन उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही गृह (ग्रामीण), कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.


      शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध या संस्थेला राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट देऊन येथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच विभागाच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण पुणे विभागाचे सहसंचालक अनिल गावित, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे उपायुक्त शरद आंगणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध चे प्राचार्य प्रकाश सायगावकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बी.आर.शिंपले,  जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी(सातारा)सचिन धुमाळ, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त (सातारा) सचिन जाधव, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार आदी उपस्थित होते.  उद्योग आस्थापनांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याबरोबरच औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना देऊन राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, तरुणांना लवकरात लवकर रोजगार मिळवून देण्यासाठी शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी नवनवीन अभ्यासक्रम व प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीतून व्यवसाय निहाय अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे उपलब्ध होण्यासाठी संस्था स्तरावर प्रयत्न करावेत, असे सांगून इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, सीएनसी लॅब, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स अशा प्रगत अभ्यासक्रमांच्या  कार्यशाळा  पुण्यातील औंध औद्योगिक  प्रशिक्षण संस्थेत असल्याबद्दल  राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी समाधान व्यक्त केले.  तसेच अशा अभ्यासक्रमांचे शिक्षण व प्रशिक्षणाचा उपयोग करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.      सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या नामांकित कंपन्यांच्या कार्यशाळांना राज्यमंत्री देसाई यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. परंपरागत व अत्याधुनिक अभ्यासक्रमाच्या कार्यशाळांना भेट देऊन पाहणी केली.सहसंचालक अनिल गावीत यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत सादरीकरण केले.संस्थेचे प्राचार्य प्रकाश सायगावकर यांनी संस्थेमधून देण्यात येत असलेल्या विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies