73व्या निरंकारी समागमाचा शुभारंभ
भौतिकतेच्या मागे धावण्याऐवजी मानवी मूल्यें धारण करा
सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
‘‘मनुष्य भौतिकेच्या मागे लागण्यापेक्षा मानवी मूल्यांचा अंगीकार करेल तर जीवन सुंदर होईल’’. असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी 73 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या विधिवत उद्गाटन प्रसंगी ‘मानवतेच्या नावे संदेश’ देताना व्यक्त केले. व्हर्चुअल रुपात आयोजित या संत समागमाचा आनंद जगभर पसरलेल्या लक्षावधी निरंकारी भक्तांनी व इतर प्रभुप्रेमी सज्जनांनी मिशनची वेबसाईट तसेच संस्कार टी. व्ही. चॅनेलद्वारे प्राप्त केला.
सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की यावर्षी विश्वामध्ये पसरलेल्या कोरोना महामारीने आपल्याला कित्येक धडे शिकविले आहेत. समस्त मानवमात्राचे दैनंदिन जीवन अस्ताव्यस्त करुन टाकले. याचा प्रभाव कोणी सकारात्मक तर कोणी नकारात्मक ग्रहण केला. भौतिक दृष्टीने विचार केला तर कित्येक लोकांकडे आलीशान घरे, महागड्या गाडया, भरपुर साधन-संपत्ती होती. परंतु लॉकडाउनचे निर्देश आले आणि सर्वकाही जागेवरच राहीले, त्यामुळे या साधनांचा लाभ घेता आला नाही. पुरातन काळापासुन संतांनी हेच समजावले, की आपण भौतिक मायेला इतके अधिक महत्व देउ नये की तेच सर्वस्व आहे. खरंतर ही माया केवळ भ्रम आहे. मायेचा सदुपयोग करुन आपण आपल्या कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. या व्यतिरिक्त याचे आणखी काही महत्व दिसुन येत नाही.
सदगुरु माताजींनी पुढे सांगितले, की संतांनी नेहमी प्रेम, नम्रता, करुणा, दया यांसारख्या मानवी मुल्यांना महत्व दिले. लाॅकडाउनच्या दरम्यान जेंव्हा आपण सर्व आपापल्या घरात कैद होतो तेव्हा ज्या घरांमध्ये अगोदरपासुन प्रेमाचे वातावरण होते तिथे या परिस्थितीचा नकारात्मक प्रभाव घेतला गेला नाही. उलट हेच मानले, की नेहमीच्या कामाच्या व्यापात आपण कुटुंबाला वेळ देउ शकत नव्हतो, पण या परिस्थितीमध्ये एकमेकांना वेळ देता आला आणि आधीची प्रेमळ नाती आणखी घट्ट झाली व त्यामध्ये दिव्य मानवी गुणच कामी आले.
सदगुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी असे प्रतिपादन केले, की ज्यांनी आपल्या परिवारात प्रेम दिले त्यांच्या सेवा भावनेने जगातील अन्य पीडितांमध्येही जागृतता निर्माण झाली आणि त्यांना जेव्हा समजले, की कोणीतरी संकटात आहे तेव्हा त्याला व्यक्तिगत रुपात असो अथवा अनेक संस्थांच्या माध्यमांतुन मदतीचा हात दिला गेला ज्यामध्ये निरंकारी मिशनचे योगदानही बहुमुल्य होते. मर्यादीत परिघामध्ये केवळ स्वतःपुरते सीमीत न राहता त्यांनी अवघ्या जगाला आपले मानले. ‘विश्वबंधुत्व’ आणि ‘भिंतीरहित जग’ हा भाव मनामध्ये बाळगुन गरजुंना त्या सर्व गोष्टी मागणी करण्यापूर्वीच पोहचविण्याचा प्रयत्न केला ज्यांची त्यांना गरज होती. या परिस्थितीने हे सिध्द केले की मानवता हाच खरा धर्म आहे. जर आम्ही मनुष्य आहोत तर आपल्याला मानवता धर्माचे पालन करायाला हवे. लाॅकडाउनने आमच्या मनाला ही प्रेरणा दिली, की आपण एकजुटीने सर्वांना प्रेमच द्यायचे आहे. एकमेकाला आपले मानण्यासाठी यापुढे अशा प्रेरणेची गरज पडू नये. कारण आपण मनुष्य आहोत आणि कोणत्याही भेदभावाविना सर्वांशी मनापासून प्रेम करण्याची आपली वृत्ती असायला हवी.
शेवटी, सदगुरु माताजींनी निरंकारी भक्तगणांना आवाहन केले, की अनासक्त भावनेने आपण साधनांना साधनच समजावे आणि या सत्याकडे आकर्षित व्हावे. सत्याचा आधार घेऊन जीवनात स्थिरता प्राप्त करावी. परमात्म्याबरोबर एकत्वाचा भाव आणखी दृढ करावा, ज्यायोगे हृदयांतरीचे प्रेम वाढीस लागेल आणि त्याच प्रेमाने आपण जगाशी एकत्वाची भावना प्रस्थापित करावी. आपण खऱ्या अर्थाने मनुष्य आहोत तर मानवेतच्या दिव्य गुणांचा अंगिकार करुन प्रेमच करत जावे. कारण पुढे हाच एकमेव मार्ग आहे.