Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नरभक्षक बिबट्याची करमाळ्यात दहशत

 नरभक्षक बिबट्याची करमाळ्यात दहशत

धडा वेगळे मुंडके करून दोघांना केलं ठार

महाराष्ट्र मिरर टीम 
सोलापूर



करमाळा तालुक्यात वेगवेगळ्या दोन गावातील दोन शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केल्याने संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असून बिबट्यामुळे कोणी घराबाहेर पडेनासे झाल्याने"बिबट्याच्या दहशतीचा लॉकडाऊन पडल्याने घबराटीचे वातावरण तयार झाले .काल कल्याण फुंदे रा.लिंबेवाडी हे शेतावर काम करत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करून  त्यांचे मुंडके धडावेगळे केलं तर आजच्या घटनेत अंजनडोह येथील जयश्री शिंदे या शेतीवर लिंबे तोडण्यासाठी गेले असता त्यांचे ही बिबट्याने मुंडके धडावेगळे केलं आहे,त्यामुळे संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत पसरली घबराट पसरली आहे.बिबट्या रोज प्राण्यावर त्याच परिसरात हल्ला करून कोणाची गाय वासरू तर कोणाची म्हैस, कोंबडी हल्ला करतोच आहे.करमळ्याच्या आमदार संजय मामा शिंदे यांनी या बिबट्याला शूट ऍट साईटची मागणी केली असून तीही मागणी लवकरच होईल असं आमदार शिंदे यांचे म्हणणं आहे,हा बिबटया गळा घोटून रक्त पीत असल्याने गळ्याला मफलर बांधून  फिरा, एकटे दूकटे शक्यतो घराबाहेर पडू नका,घरासमोरचे दिवे रात्रभर चालू ठेवा अस वन विभाग या परिसरात जनजागृती करत आहे. पोलिसांनी नागरिकांना सूचना केल्या आहेत.

बिबट्याच्या संदर्भात सर्व नागरिकांना महत्त्वाच्या सूचना

आपणा सर्वांना माहीत आहे की, लिंबेवाडी, तालुका करमाळा या कर्जत तालुक्याच्या बॉर्डरवरील गावात बॉर्डर पासून अर्धा किलोमीटर आतमध्ये बिबट्याने एका शेतकऱ्यावर काल संध्याकाळी हल्ला करून त्यास ठार केले आहे. घटनास्थळी मी, सपोनि भुजबळ, पोलीस नाईक निंबाळकर, पर्वते, पोलीस कॉन्स्टेबल पवार, जगताप, दाभाडे व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पोलीस नाईक निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल पवार व जगताप यांनी गावकऱ्यांच्या मदतीने हल्ला झालेल्या शेतकऱ्यांची डेड बॉडी शोधून काढली आणि पुढील सोपस्कार करून घेतले. रात्री उशिरा बीड जिल्ह्याची वनविभागाची टीम, सोलापूर जिल्ह्याची टीम व आज सकाळी अहमदनगर जिल्ह्याची वनखात्याची टीम देखील हजर झाली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी करावयाची कार्यवाही चालू असून करमाळा पोलीस त्यांची मदत करत आहेत.

बिबट्याच्या संदर्भामध्ये वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी व काही अनुभवी लोकांशी चर्चा करताना काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्या माहितीतून सर्व नागरिकांनी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत, सर्व नागरिकांनी त्या सूचना अंमलात आणाव्यात.

▪️ लिंबेवाडी शिवारातील घटना घडल्यानंतर काल रात्री व आज पहाटेपर्यंत वन खात्याचे अधिकारी व काही अनुभवी नागरिकांशी चर्चा केली असता काल संध्याकाळी शिकार केलेला बिबट्या हा कडा आष्टी व जामखेड तालुक्यातून लिंबेवाडी गावाकडे आला असण्याची शक्यता आहे, कारण कडा आष्टी व परिसरात या बिबट्याने आतापर्यंत सात आठ लोकांवर हल्ला केला असून लिंबेवाडी येथे हल्ला केलेली व्यक्ती नववी आहे.
▪️ काल रोजी हल्ला केलेला बिबट्या हा नरभक्षक असण्याची जास्त शक्यता आहे. इतर प्राण्यांपेक्षा माणसाचे रक्त वेगळे असते. माणूस हा आहारामध्ये मीठ घेत असल्याने रक्ताची चव थोडीशी खारट असल्यामुळे एखाद्या हिंस्त्र प्राण्याने माणसाचे रक्त पिल्यास त्यांना त्या रक्ताची चटक लागते. त्यातूनच बिबट्या सारखे प्राणी पुन्हा पुन्हा माणसावर हल्ला करून नरभक्षक बनतात. काल रोजी घडलेल्या लिंबेवाडी येथील घटनेतून देखील हे दिसून आले आहे. नरभक्षक बिबट्या शिकार केल्यानंतर मानेपासून डोके वेगळे करतो व शरीरातील रक्त शोषून रक्त पितो. कालच्या घटनेत देखील हे दिसून आले आहे. काल रोजीचा बिबट्या नरभक्षक असण्याची जास्त शक्यता असल्याने सर्व नागरिकांनी अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे.
▪️ सर्वसाधारणपणे बिबट्या रात्री प्रवास करून रात्रीत शिकार करतो व दिवसा झाडाझुडपात लपून राहून आराम करतो, परंतु काल रोजीचा बिबट्या दिवसा प्रवास करत असल्याचे काही लोकांकडून समजले आहे व तो संध्याकाळच्या वेळेस माणसावर हल्ला करून शिकार करत आहे. त्यामुळे 24 तास सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक असले तरी दुपारी चार वाजल्यापासून पुढे जास्त सतर्क राहणे आवश्यक आहे.
▪️नदीकाठी व ओढ्याकाठी साधारणपणे झाडाझुडपांचे व बागायती पिकांचे प्रमाण जास्त असल्याने बिबट्या नदी किंवा ओढ्याच्या काठाने प्रवास करतो, तसेच ज्या भागात बागायती पिके आहेत त्या भागात देखील वास्तव्य करतो. त्यामुळे अशा भागातील लोकांनी अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे.
▪️सध्या ऊसतोडीचा हंगाम चालू असून ऊस तोडणीच्या टोळ्या उघड्यावर झोपड्या टाकून राहतात. बागायती भागातील ऊसतोडीच्या टोळ्यांनी जास्त सतर्क राहणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी टोळी मुक्कामाला आहे, त्या ठिकाणी प्रखर लाईटची सोय करण्यात यावी. तसेच टोळीतील कमीतकमी दोन जणांनी रात्रभर धारदार शस्त्रानिशी व काठ्यांनिशी जागता पहारा ठेवावा.
▪️ काल रोजीच्या बिबट्याचे वास्तव्य आतापर्यंत जिरायती भागात दिसून येते, परंतु उजनी जलाशयाच्या काठच्या बागायती भागात बिबट्या शिरल्यास त्याला शोधणे कठीण होईल म्हणून सर्व नागरिकांनी त्याला पकडण्यासाठी आतापासूनच पोलीस व वन खात्याची मदत करणे आवश्यक आहे.
▪️ एखाद्या व्यक्तीला बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये. पाठलाग केल्यास तो माघारी फिरून हल्ला करू शकतो. परंतु ज्या भागात बिबट्या दिसला आहे त्या भागातील लोकांनी तात्काळ पोलिसांना व वनखात्याला कळवावे.
▪️ लहान मुले व वयस्कर माणसांना एकटे सोडू नये. ते घरी असल्यास घराचा दरवाजा बंद करूनच त्यांनी थांबावे. रात्रीच्यावेळी नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत उघड्यावर झोपू नये.
▪️ कोणीही अंधारात एकटे फिरू नये. रात्रीच्या वेळी जाणे अत्यावश्यक असल्यास कमीत कमी पाच लोकांनी प्रखर बॅटऱ्या, मोठ्या काठ्या, धारदार हत्यारे व टेंभा घेऊनच बाहेर पडावे. अशावेळी आपल्या सोबत असलेल्या मोबाईल हँडसेटवर मोठ्या आवाजात गाणी लावावीत, जेणेकरून आवाजामुळे बिबट्या जवळ येणार नाही जवळ असल्यास दूर निघून जाईल.
▪️ बिबट्याचे आवडते भक्ष म्हणजे कुत्रे, शेळ्या-मेंढ्या किंवा लहान जनावरे असतात. अशा प्राण्यांच्या गळ्यामध्ये काटेरी किंवा खिळ्यांचा पट्टा घालावा, कारण बिबट्याने हल्ला केल्यास प्रथम तो मान पकडतो. नागरिकांनी तारेचा पट्टा वापरणे शक्य नसल्यास बाहेर पडताना गळ्याभोवती मोठा टॉवेल किंवा मफलर गुंडाळावा जेणेकरून हल्ला झाल्यास माणूस त्यातून वाचू शकतो.
▪️ बिबट्याने एखादी शिकार केल्याचे निष्पन्न झाल्यास बिबट्याने शिकारीचा काही भाग खाल्लेला असतो व थोड्या अंतरावर तो आरामासाठी गेलेला असतो. काही तासाने शिकारीचा उर्वरित भाग खाण्यासाठी बिबट्या परत येण्याची शक्यता असल्याने ज्या ठिकाणी बिबट्याने शिकार केलेली आहे, त्या शिकारी जवळ शक्यतो जाऊ नये. जायचे असल्यास जास्तीत जास्त लोकांनी हत्यारांनिशी एकत्र जावे.
▪️ शेतकऱ्यांनी आपली जनावरे बंदिस्त ठिकाणी बांधावीत. बंदिस्त ठिकाण नसल्यास तात्काळ तारेच्या जाळीचे तात्पुरते कंपाउंड करून घ्यावे. जनावरांच्या ठिकाणी प्रखर लाईटचे दिवे लावावेत.
▪️करमाळा पोलिसांतर्फे करमाळा तालुक्यातील सर्व गावांमध्ये आज व उद्या दोन दिवसात ग्रामपंचायतीमध्ये बैठका घेऊन व पोलीस गाडीतील स्पीकर सिस्टिम वरून लोकांना सावध केले जात आहे. पोलिसांनी व वनखात्याने दिलेल्या सूचनांचे सर्व नागरिकांनी तंतोतंत पालन करावे व पोलीस व वनखात्याला बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे.
▪️ ग्रामपंचायतीने गावात व वाड्या-वस्त्यांवर दवंडी देऊन मी वर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्यास नागरिकांना सांगावे.
▪️ करमाळा पोलीस स्टेशनकडील सर्व पोलीस अधिकारी व दूरक्षेत्र / बीट अधिकारी व अंमलदारांचे मोबाईल फोन नंबर खाली दिले आहेत. संबंधितांनी त्यांच्या दूरक्षेत्र / बीट अंमलदारांना व पोलिस अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधावा.
▪️ ही पोस्ट सर्व नागरिकांनी त्यांच्याकडील सर्व व्हाट्सअप ग्रुपवर व वैयक्तिक व्हाट्सअपवर व्हायरल करावी, जेणेकरून करमाळा व आजूबाजूच्या तालुक्यातील नागरिक सतर्क होतील.
▪️करमाळा शहरातील तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील काही पुरुष व महिला वॉकिंग करीता जातात, तसेच काही पोलीस व इतर भरती मध्ये सराव करणारी मुले पहाटे तसेच सायंकाळी वॉकिंग करिता किंवा सरावा करिता बाहेर पडतात तरी जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत नागरिकांनी वॉकिंग करिता अथवा सरावासाठी बाहेर पडू नये.
▪️ करमाळा शहरात तसेच जेऊर, केम अशा ठिकाणी दुकानांमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी तसेच रोजगाराच्या निमित्ताने ग्रामीण भागातून लोक येतात व सायंकाळी उशिराने घरी परत जातात. अशा व्यक्तिंनी देखील सायंकाळी अंधार होण्याच्या आत आपल्या निवासस्थानी परतणे आवश्यक आहे.
▪️ ग्रामीण भागात शेतात काम करतात बिबट्या हा आपल्या उंचीपेक्षा कमी उंचीचे भक्ष शोधून पाठमोर्‍या व्यक्तीला पाठीमागून किंवा बसलेल्या व्यक्तीवर किंवा वाकलेल्या व्यक्तीवर हल्ला करत असल्याने शेतात काम करत असताना देखील सावधानता बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे.
▪️ बिबट्या दिसला म्हणून अनेक जण बघ्यांची गर्दी करतात. अशा वेळेस बिबट्या नजरेस आल्यास गर्दी न करता वनविभागास तसेच पोलीस स्टेशनला तात्काळ संपर्क करून माहिती द्यावी, जेणेकरून वनविभागाच्या मार्फतीने त्याला पकडणे सोयीस्कर होईल.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies