वरवठणे ग्रामपंचायतीच्या इतिहासात एका दांपत्याची निवड - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 20, 2021

वरवठणे ग्रामपंचायतीच्या इतिहासात एका दांपत्याची निवड

 वरवठणे ग्रामपंचायतीच्या इतिहासात एका दांपत्याची निवड

राजेश भिसे-नागोठणेविभागातील वरवठणे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सत्ता पालटण्यात किंगमेकर ठरलेले शिवसेनेचे रोहे उप तालुकाप्रमुख गणपत ल. म्हात्रे हे सलग दुसऱ्यांदा सदस्य म्हणून निवडून आले असून सोबत त्यांनी आपली पत्नी, ऋतुजा म्हात्रे यांनी सुद्धा निवडून आणले असल्याने यानिमित्ताने  वरवठणे ग्रामपंचायतीच्या इतिहासात एक दांपत्य निवडून येण्याचा योग जुळून आला आहे. 

           वरवठणे हे गाव पूर्वी वांगणी ग्रामपंचायत अंतर्गत होते. १९९३ साली विभागणी करण्यात येवून वरवठणे ग्रामपंचायत अस्तित्वात आली. काही काळ वगळता या ग्रामपंचायतीवर शेकापची निर्विवाद सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत गणपत ल. म्हात्रे यांनी शिवसेना, भाजप (आ. रविशेठ पाटील यांचे हितचिंतक) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी करून नऊपैकी सहा जागा जिंकत शेकापला धोबीपछाड केले. या निवडणुकीत भाजपचे श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर म्हात्रे आणि संतोष म्हात्रे, प्रशांत म्हात्रे यांचे मोलाचे सहकार्य मिळल्यानेच सत्ता पालट करण्यात यशस्वी ठरलो, असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. ऋतुजा म्हात्रे यांना निवडणुकीत सर्व उमेदवारांमध्ये सर्वात जास्त  मतदान झाले असल्याचे सांगण्यात आले. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण उद्या गुरुवारी जाहीर होत आहे. सरपंचपदाचे आरक्षण कसे असेल याबाबत सर्वानाच उत्सुकता आहे. गणपत म्हात्रे नागरिकांचा मागास प्रवर्गातून निवडून आले असून त्यांच्या पत्नी, ऋतुजा म्हात्रे सर्वसाधारण महिला गटातून निवडून आल्या असल्याने या दोघांनाही सरपंचपदाची लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सरपंच होणार का असे विचारले असता, राजकारण न करता सरपंचपदापेक्षा वरवठणे गावाचा विकास करणे हे ध्येय सध्या डोळयासमोर ठेवले असल्याचे या म्हात्रे दांपत्याने स्पष्ट केले. 


No comments:

Post a Comment