हॅलोने तयार केलेल्या मास्कसाठी विशेष प्रयत्न करणार : जिल्हाधिकारी.
राम जळकोटे-उस्मानाबाद
"समाजातल्या अतिदुर्लक्षित असलेल्या एकल महिला स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कौशल्य निर्माण करून मास्क निर्मिती केंद्र हॅलो संस्थेने सुरू केले या केंद्रातून नवीन तंत्रज्ञान वापरून तयार होणाऱ्या मास्कची पाहणी मी स्वतः केली असून जिल्ह्यात सर्व विभागातील लोकांनी या मास्कचा जरूर वापर करतील याकरिता विशेष प्रयत्न केले जाईल "असे मत उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केले
ते हॅलो मेडिकल फौंडेशन अणदूर संचलित समृद्धी एकल महिला बचत गट अंतर्गत सान्स मास्क निर्मिती केंद्राचे उद्घाटक म्हणून आयोजित कार्यक्रमात बोलत होते याप्रसंगी पर्यावरण तज्ञ व जेष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर, स्विस एड च्या कविता गांधी, सिप्ला फौंडेशन चे डॉ क्रांती रायमाणे, आय आय सी टी चे प्राचार्य डॉ श्रीधर जिल्हा उद्योग अधिकारी प्रकाश हनबर, भारतीय स्टेट बँकेचे मंदार कांबळे, तालुका संरक्षण अधिकारी दिनेश घुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना दिवेगावकर म्हणाले की हा उद्योग कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महत्वाचे ठरणार असून हॅलो संस्थेने निर्माण केलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर एकल महिलांनी फक्त मास्क उद्योगात अडकून न राहता याच उद्योगाशी निगडित महिलांचे आरोग्य, स्वछता संदर्भात अन्य व्यवसायाकडेही लक्ष द्यावे त्याकरिता शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगून याकेंद्रातून तयार झालेल्या मास्क ला शासन स्तरावरूनही मागणी नोंदवली जाईल असेही याप्रसंगी त्यांनी आश्वासीत केले.
याप्रसंगी वरील सर्व मान्यवर समाजमाध्यमाद्वारे उपस्थित राहिले तर प्रत्यक्षात जिल्हा उदयोग अधिकारी प्रकाश हनबर, स्टेट बँकेचे मंदार कांबळे, संरक्षण अधिकारी दिनेश घुगे यांनी प्रत्यक्ष केंद्राची पाहणी करून याकेंद्रा च्या विस्तारीकनास ही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मास्क निर्मिती केंद्र अंतर्गत कार्यक्षेत्रातील एकल महिलांच्या हाताला काम मिळणार असून या मास्क उद्योग निर्मिती केंद्राची उभारणी सिपला फौंडेशन, स्विस एड इंडिया पुणे, जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद, स्टेट बँक ऑफ इंडिया, आय. आय. सी. टी. नवी दिल्ली भारत सरकार यांच्या विशेष सहकार्यातून व पुढाकारातून होत असल्याचे सांगून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक प्रकारचे सुरक्षित मास्क निर्धारित केलेल्या मूल्याने दिले जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ शशिकांत अहंकारी यांनी प्रास्ताविक प्रसंगी सांगितले. या केंद्रांतर्गत अनेक आपत्तीग्रस्त एकल महिलांना हाताला काम मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाचे संकट या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेले मास्क सर्वांनी वापरल्यास यातून ही परिस्थिती सावरण्यास खूप मदत होणार आहे आणि यातून एकल महिलांच्या हाताला काम ही मिळणार आहे म्हणून या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून या उद्योगास जेष्ठ पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर, स्विस एड च्या कविता गांधी, सिप्ला फौंडेशन चे डॉ क्रांती रायमाने यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या तर आय. आय. सी. टी. चे डॉ श्रीधर यांनी या मास्क संदर्भात असलेले तंत्रज्ञान विश्लेषित केले..
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम समाजमाध्यद्वारे ऑनलाईन पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करून या कार्यक्रमाचा संस्थेचे सर्व कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येने समाजमाध्यमावरून ऑनलाईन पध्दतीने लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन डॉ शशिकांत अहंकारी यांनी केले तर सहभागींचे व मान्यवरांचे आभार डॉ शुभांगी अहंकारी यांनी मानले...