Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

स्वयंघोषित पुढाऱ्यांनी चाकोरी ओलांडल्यास कायद्याचा बडगा दाखवेन

 स्वयंघोषित पुढाऱ्यांनी चाकोरी ओलांडल्यास कायद्याचा बडगा दाखवेन  - तहसीलदार प्रशांत बेडसे

राजेंद्र मर्दाने-चंद्रपूर

 कोरोना महामारीने देशात थैमान घातले असून वरोरा तालुक्यात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.तालुका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने व गंभीरतेने घेऊन युद्धपातळीवर उपाययोजना केल्या आहेत व करीत आहे. परंतु काही नतद्रष्ट मंडळी पुढारीपणाची हौस भागविण्यासाठी व सर्वसामान्य जनतेसमोर प्रभाव पाडण्यासाठी सेवेवर कार्यरत अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांशी अरेरावीच्या भाषेत हुज्जत घालून, प्रशासकीय कामात हस्तक्षेप करीत दबाव टाकून प्रतिमासंवर्धनाचा प्रयत्न करीत आहेत. हे ताबडतोब बंद न झाल्यास कशाचीही तमा न बाळगता स्वयंघोषित पुढाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवेन, असा निर्वाणीचा इशारा तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिला आहे.

        वरोरा तालुक्यासाठी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह येथे १२५ व महाकाली महाविद्यालयात २०० रुग्ण क्षमतेचे कोव्हीड सेंटर सुरू केले आहे. तसेच ट्रामा केयर सेंटर येथे १८ ऑक्सिजन खाटा असलेले ७० रुग्ण क्षमतेचे रुग्णालयदेखील सुरू करण्यात आले आहे. यासोबतच क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात आरटीपीसीआर चाचण्या देखील करण्यात येत आहेत. बिकट परिस्थितीत सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी बाह्य घडामोडींमुळे प्रचंड तणाव झेलून तसेच कोरोनाबाधित होण्याचा धोका पत्करून अविरतपणे सेवा बजावित असतांना काही स्वयंघोषित पुढारी, वागण्या बोलण्यात सेवेचा भाव नसणारे परंतु स्वतःला ' स्वयंसेवक ' म्हणवून घेणाऱ्या काही व्यक्ती उपटसुंभाप्रमाणे प्रकटून छिद्रान्वेषी वृत्ती अंगिकारून त्यांच्याशी सातत्याने असांसदीय  शब्दांचा वापर करीत हुज्जत घालीत आहेत. परिणामतः प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्यांचे मनोधैर्य खालावत आहे. हे असहनीय असल्याने स्वयंघोषित पुढाऱ्यांनी व त्यांना पाठबळ देणाऱ्यांनी वर्तणूक सुधारावी, अन्यथा त्यांना कायद्याचा बडगा दाखवून अद्दल घडवावी लागेल, असा उद्वेगजनक परंतु निर्वाणीचा इशारा तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिला आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना कोणीही त्रास दिल्यास, त्यांचा उपमर्द केल्यास संबंधितांनी तालुका नियंत्रण कक्षास दूरध्वनी क्रमांक ०७१७६-२८२११० वर कळवावे तसेच नागरिकांना काही महत्वाची माहिती द्यायची असल्यास किंवा मदत हवी असल्यास वर नमूद क्रमांकावरच कळवावे तसेच प्रत्येकाने अधिकार व कर्तव्याची जाणीव ठेवून शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करून राष्ट्रीय संकटकाळी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies