जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज रहावे - जिल्हाधिकारी शेखर सिंह
प्रतीक मिसाळ सातारा
जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी तिच्या व्यवस्थापनासाठी सर्वच यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवत सज्ज रहावे . तसेच संबंधित विभागानी आपत्ती नियंत्रण कक्ष 1 जून पासून कार्यान्वीत करावा , अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या . नैसर्गिक आपत्ती बाबत मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज संपन्न झाली . यावेळी ते बोलत होते . या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा , पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल , अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे , निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते . सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजवून घ्यावे तसेच पावसाळ्यात दूषीत पाण्याचा पुरवठा होणार नाही याची खबरदारी घ्यावी . प्रत्येक विभागाने नोडल ऑफीसरची नियुक्ती करुन त्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी . ज्या गावांचा संपर्क पावसाळयात तुटतो अशा गावांसाठी पुरेशा जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा अधिच करावा . अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक , नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांकांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच अन्य यंत्रणांना द्यावीत , नगरपालिका , ग्रामपंचायत हद्दीतील नालासफाई , गटारी यांची साफसफाई करुन घ्यावी . आरोग्य विभागाने आवश्यक तो औषध साठा , रुग्णवाहिका यंत्रणा सज्ज ठेवावी त्याचबरोबर वीजवाहक तारांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात . नदी काटी अतिक्रमण केलेल्या कुटुंबाला मान्सूनपूर्वी नोटीस देवून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे . तसेच तालुका व गावपातळीवर 20 मेपर्यंत मान्सूनपूर्वतयारीबाबत आढावा बैठक घ्यावी , अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शेवटी केल्या . गावागावातील सर्व नाल्यांची साफसफाई करावी , पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्यांची दुरस्ती करावी , अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी बैठकीत केल्या .