Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

09 ते 12 जुन 2021 या कालावधीमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता,नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांचे आवाहन

 अतिवृष्टीची शक्यता,नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांचे आवाहन

      महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत



 दिनांक 09 ते 12 जुन 2021 या कालावधीमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे. या कालावधीमध्ये कर्जत उपविभागातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व शासकीय व स्थानिक प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने काम करण्याच्या दृष्टीकोनातून काल सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांची ऑनलाईन बैठक उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी -ठाकूर कर्जत यांनी आयोजित केली होती. सदर बैठकीस उपविभागातील सर्व जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष कर्जत,खोपोली,माथेरान नगरपरिषद, सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत,खालापूर, तहसीलदार कर्जत,खालापूर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत,खालापूर, मुख्याधिकारी कर्जत,खोपोली,माथेरान नगरपरिषद,खालापूर नगरपंचायत, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक आदींना सहभागी करुन घेण्यात आले होते. 


        सदर बैठकीमध्ये दरडग्रस्त भागातील, पुरप्रवण भागातील व धोकादायक इमारतीमधील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी आवश्यकतेनुसार स्थलांतर करणेबाबत सुचना देण्यात आल्या. त्या दृष्टिकोनातून जवळच्या सुरक्षित निवारा केंद्राचे नियोजन करुन त्या ठिकाणी पाणी, मुलभुत सुविधा व स्वच्छतागृहाची सुविधा असेल याची दक्षता घेवून अन्नधान्य, खाद्यपदार्थांची उपलब्धता होईल याचे नियोजन स्थानिक प्रशासनामार्फत केले जाईल. तरी पूरप्रवण, दरडग्रस्त भागातील व अतिधोकादायक इमारतीतील नागरिकांनी प्रशासनाचे आवाहनास प्रतिसाद देवून आपात्कालीन  परिस्थितीत नजीकच्या निवारा केंद्रात वा आपले नातेवाईकांकडे दि.9 जून पुर्वी तात्पुरत्या स्वरुपात सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. याबाबत सर्व नगरपरिषदा, सर्व नगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी स्पीकर द्वारे सर्व नागरिकांना अतिवृष्टीबाबत सूचना प्रसारित करणेच्या आहेत. सदर कालावधीत तालुक्याचे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यन्वित करण्यात आलेले असून सर्व स्थानिक यंत्रणांनी/नागरिकांनी  आपात्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाच्या संपर्कात रहावे. जेणेकरुन मदतकार्य वेळेत सुरु करणे शक्य होईल. नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक तहसील कार्यालय कर्जत 02148-222037 तहसील कार्यालय खालापूर 02192-275048 व मा.जिल्हाधिकारी  कार्यालय रायगड अलिबाग 02141-222118 असे आहेत. 

       तसेच जिल्हा मार्ग, अंतर्गत रस्त्यावर झाडे, दरड पडून वाहतूक विस्कळित होणार नाही याबाबत उपाययोजना करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. कर्जत उपविभागातील धोकादायक,उंच होर्डिंग,जाहिरातींचे बोर्ड काढून टाकण्यात यावेत. मॅनहोल उघडे राहणार नाहीत, त्यांना झाकण टाकणे वा बॅरीकेटींग करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व नागरिकांनी अतिवृष्टीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे काळजी घेणेची आहे. 

घराच्या अवती भोवती वादळामुळे,अतिवृष्टीमुळे कोणत्या वस्तू, विजेचे खांब किंवा तारा, झाडे, होर्डींग्ज,बोर्ड इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासून लांब रहावे. तसेच सदरची बाब वेळेतच स्थानिक प्रशासनाच्या निर्दशनास आणून द्यावी.आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना आगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे.

        आपले जवळ दैनंदिन लागणारी औषधे, केरोसीनवर चालणारे बंधिस्त दिवे (कंदिल), बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी इत्यादी वस्तू ठेवाव्यात.अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये किमान 3 दिवस पुरतील असे सुखा मेवा/खाद्यपदार्थ जवळ ठेवावेत, सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी औषधे जवळ ठेवावीत. पिण्याचे पाणी शुद्धीकरण करुन वापरावे. उदा.पाणी उकळून प्यावे तसेच पाण्यात मेडीक्लोर मिसळावे.अतिवृष्टी फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील व अतिधोकादायक इमारतीतील तसेच नदीकिनारी राहणाऱ्या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी. तसेच प्रशासनामार्फत केलेल्या निवारा गृहामध्ये स्थलांतरीत व्हावे.

आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्त्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य द्यावे. तसेच सदर कालावधीमध्ये नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये. 

        दि.11जून ते दि.13 जून, या कालावधीत अत्यावश्य सेवा सोडून इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार असल्याने आपल्याला आवश्यक अन्नधान्य, भाजीपाला, औषधे इत्यादीचा साठा जवळ बाळगावा. आपत्कालीन परिस्थितीत अनावश्यक घराबाहेर न पडता घरी राहूनच आपत्तीवर मात करण्यासाठी शासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली परदेशी-ठाकूर यांनी केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies