पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.-प्रभारी तहसीलदार ए.डी. कोकाटे
उमेश पाटील -सांगली
शिराळा तालुक्यामध्ये शनिवारी दि.५ रोजी झालेल्या वादळी वा-यासह ढगफुटी व पावसामुळे शिराळा आणि शिरसी मंडळातील घरांचे , शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे . यामध्ये शिराळा औद्योगिक वसाहती मधील ११ कारखान्यांचे पत्रे उडून गेल्याने यंत्रे आणि साहित्याचे नुकसान झाले आहे . तर करमाळे , भटवाडी आणि औंढी येथील ३० पेक्षा अधिक घरांचे छत उडून गेले आहे.त्याचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार ए.डी. कोकाटे यांनी दिली.शनिवारी झालेल्या वादळी पावसाने,शिराळा औद्योगिक वसाहतीसह भटवाडी, औंढी, करमाळे, निगडी, घागरेवाडी, प.त. शिराळा, शिरशी या गावांना फटका बसून फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
भटवाडी येथील १४ घरांचे छत उडून गेले आहेत.त्यांचे अन्नधान्य व संसार उपयोगी वस्तुंचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. करमाळे आणि औंढी येथी २०
घरांचे नुकसान झाले आहे.प.त. शिराळा येथे ढगफुटी होवून त्याचे पाणी गांवातील ओढयास पूर येवून ७ घरांमध्ये पाणी शिरलेले होते. पाण्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचे व अन्नधान्याचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे . घागरेवाडी , प.त.शिराळा , शिरसी येथील शेतातील ताली फुटून जमीनीतील माती वाहून गेलेली आहे . वादळी वारा व पावसामुळे पत्रे व भिंत अंगावर पडून ५ महिला जखमी झालेल्या आहेत . त्यांचेवर उपचार सुरु आहेत . तलाठी व मंडल अधिकारी यांचे मार्फत झालेल्या वस्तुस्थितीचे पंचनामे करणेचे काम सुरु आहे . मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने नुकसानीचा अंदाज व त्याची किंमत समजू शकलेली नाही. पंचनामे पुर्ण झाले नसल्याने अंतिम आकडा समजला नसला तरी अंदाजे दहा ते बारा कोटीं रूपयांचे नुकसान झाले आहे.
महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याचबरोबर वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी काल सायंकाळी ६ वाजल्यापासून पंचनामे करण्याकरता आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याकरता घटनास्थळी थांबून आहेत. घटनास्थळी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी भेटी दिल्या. खासदार धैर्यशील माने कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांनी निवास स्थानावरूनच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांशी पंचनामे व इतर मदतीच्या बाबतीत चर्चा केली. शिराळा एमआयडीसी पासून शिरशी पर्यंत अनेक ठिकाणी विद्युत खांब पडल्याने वीज वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याचे देखील पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.सोमवारी संध्याकाळ पर्यंत सर्व विद्यूत पुरवठा पुर्ववत होईल,काम युद्धपातळीवर सुरू आहे.अशी माहिती महावितरणचे उपअभियंता प्रल्हाद बुचडे यांनी दिली.