महाविकास आघाडीच्या निर्णयाचा आ.महेश शिंदे यांच्याकडून निषेध; जिल्हाधिकारी कार्यालयावर भजन आंदोलन
ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांच्या सुटकेची व पायी दिंडी वारीस परवानगीची मागणी.
प्रतीक मिसाळ सातारा
कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांनी शुक्रवारी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली . हभप बंडातात्या कराडकर यांच्या सुटकेसाठी पुन्हा भजनं आंदोलन करून वारकऱ्यांनी पोलीस प्रशासनाचा निषेध केला . पंढरपूर येथील पायी वारीत सहभागी होण्यासाठी निघालेल्या ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची पोलिसांच्या स्थानबध्दतेतून सुटका करावी , यासाठी आज कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना बंडातात्या यांची सुटकेची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले . बंडातात्यांची स्थानबध्दतेतून सुटका न केल्यास आगामी काळात वारकऱ्यांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे .
पायी वारीत सहभागी होण्यासाठी निघालेल्या बंडातात्या यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते . यानंतर त्यांना करवडी येथील गो पालन केंद्रात स्थानबध्द करण्यात आले . या गो पालन केंद्राला पोलिसांनी वेढा दिला असून आतमध्ये जाण्यास इतरांना मनाई करण्यात आली आहे . शासनाच्या या कृतीचा निषेध करण्याचे सत्र गेले दोन दिवस जिल्ह्याच्या विविध भागात सुरु आहे . शुक्रवारी शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी कोरेगावचे आमदार महेश शिंदे , ह.भ.प. धनश्याम नांदगावकर यांच्या नेत्तृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला होता . या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी साताऱ्यात येणाऱ्या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता . क - हाड येथून येणाऱ्या वारकऱ्यांना तेथेच पोलिसांनी स्थानबध्द केल्याचे समजल्यानंतर वारकरी महासंघाच्या सदस्यांसह दुपारी बाराच्या सुमारास महेश शिंदे हे वारकऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर झाले . याठिकाणी भजन आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचा निषेध करण्यात आला . आंदोलन सुरु असतानाच बंडातात्या कराडकर यांची स्थानबध्दतेतून सुटका करावी , अशी मागणी करणारे निवेदन आमदार शिंदे , धनश्याम महाराज ,अतुल माने, व इतरांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले .या निवेदनात मागणी मान्य न केल्यास आगामी काळात वारकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे . या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .
आ.महेश शिंदे म्हणाले , बंडातात्या कराडकर यांनी वारी संदर्भात काही निर्णय घेतला होता . कोरोनाच्या महामारीमुळे प्रशासनाने वारीचा निर्णय हाणून पाडण्याचा प्रयत्न केला . सध्या सर्वत्र निवडणुका मोठ्या प्रमाणावर होत आहेत . केवळ वारकरी साप्रदायाच्या प्रमुखांना आषाढी वारीला जावून देण्यास परवानगी दिली पाहिजे , अशी आमची इच्छा आहे . बंडातात्या कराडकर यांना स्थानबध्द केले आहे , त्यातून मुक्त करावे . तसेच काही वारकऱ्यांसोबत बंडातात्या यांना पंढरपूरला वारीला जाण्यास परवानगी द्यावी .*