युनोस्कोत माथेरानच्या मिनी ट्रेनचा प्रवास
चंद्रकांत सुतार-माथेरान
माथेरानच्या पर्यटनाला चालना देणारी आणि अबालवृद्धांची आवडती महाराष्ट्रातील एकमेव नॅरोगेज ‘माथेरानची राणी’ म्हणजेच मिनीट्रेन ही पुन्हा युनेस्कोच्या हेरिटेजसाठी सज्ज झाली आहे. याबाबत नुकतेच रेल्वेचे अधिकारी यांनी माथेरानला भेट दिली असून यात काही माथेरानचा सांस्कृतिक वारसा जपणारी माहिती मध्य रेल्वेला हवी असल्याने माथेरान नगरपालिकेत अर्ज दाखल केला आहे.
१९०१ मध्ये येथील उद्योगपती सर आदमजी पिरभाय यांनी स्वतःचे १६ लाख रुपये खर्चून ही रेल्वे बनविण्याचा निर्णय घेतला. मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पिरभाय यांनी १९०७ मध्ये या रेल्वेचे काम पूर्ण केले आणि ही मिनीट्रेन जोमाने सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर ही मिनीट्रेन भारत सरकारच्या अखत्यारित आली. त्यावेळी वाफेच्या इंजिनवर ही मिनीट्रेन धावत होती. १९८३ मध्ये वाफेचे इंजिन बंद करून डिझेलवर धावणारी इंजिन वापरली जाऊ लागली. ११४ वर्षे उलटूनही ही मिनीट्रेन आजही डौलात धावत आहे. २००२ च्या दरम्यान ही मिनीट्रेन युनेस्कोच्या हेरिटेज दर्जासाठी नामनिर्देशित करण्यात आली होती. याबाबत युनेस्कोच्या टीम सुद्धा माथेरानमध्ये येऊन गेली.
माथेरानची मिनीट्रेन ही पुन्हा युनेस्कोच्या हेरिटेज दर्जासाठी नामनिर्देशित करण्यात आली आहे. ही माथेरानकरांसाठी अभिमानाची बाब आहे. माथेरान नगरपरिषदे कडून जी काही माहिती रेल्वेला हवी असेल ती आम्ही देण्यास तयार आहोत. लवकरच त्यांनी मागितलेली माहिती त्यांना दिली जाईल. - प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा
मात्र काही तांत्रिक बाबींमुळे भारतीय रेल्वे आणि माथेरानकरांचे स्वप्न भंगले. मात्र आता पुन्हा मध्य रेल्वेने युनेस्कोकडे अर्ज दाखल केला आहे व युनेस्कोकडून या अर्जाचा स्वीकार करण्यात आला असून याबाबत उप मुख्य पर्यावरण एवं गृहव्यवस्था प्रबंधक शिवाजी कदम यांनी माथेरान नगरपालिकेस पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये माथेरानमधील सांस्कृतिक वारसा जपणारी माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर मागविण्यात आली आहे. यावेळी सिनियर सेक्शन इंजिनियर सुशिल सोनावणे तसेच रेल्वे कामगार सेनाचे सचिव दगडू आव्हाड यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र युनेस्कोने माथेरान मिनीट्रेनला हेरिटेज दर्जा दिला तर भारतीय रेल्वे याना मोठी रक्कम असलेल बक्षीस मिळेल. तर या हेरिटेज दर्जामुळे माथेरानमध्ये मनाचा तुरा रोवला जाईल.
२००२ च्या दरम्यान मी लोकप्रतिनिधी असताना युनेस्कोकडून माथेरान मिनीट्रेन हेरिटेज दर्जा देण्यासाठीचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. मात्र मिनीट्रेनबाबत युनेस्कोने अर्ज स्वीकारल्यामुळे जर मिनीट्रेनला हेरिटेज दर्जा मिळाला तर माथेरान हे जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसेल. - अजय सावंत, माजी नगराध्यक्ष
माथेरानमधील सांस्कृतिक वारसाबाबत हवी असलेली माहिती
- माथेरान मधील सांस्कृतिक उपक्रमाचे फोटो
- वन्यजीव आणि दुर्मिळ प्रजातींचे फोटो
- वनस्पती आणि विशिष्ट प्रदेशातील किंवा
- कालखंडातील प्राणिजात याविषयी माहिती पिके आणि अन्न
- मिनिट्रेनचा माथेरान मधील लोकांच्या तसेच आदीवासी भागावर होणारा परिणाम
- कचर्याची विल्हेवाट लावण्याची पद्धती
- ऊर्जा आणि वनसंवर्धनाची पद्धती
- व्यवसाय आणि दैनंदिन उपजीविका
- स्थानिक परंपरा आणि सण याबाबत माहिती
माथेरानच्या मिनीं ट्रेनचा युनोस्कोने अर्ज स्वीकारल्यामुळे ह्या राणीला हेरिटेज दर्जा मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत,मागील अपयश विसरून नव्या उमेदीने माथेरानची राणी यशस्वीपणे ही परीक्षा पास होऊन नक्कीच माथेरानच्या राणीला हेरिटेज दर्जा मिळेल ही खात्री आहे,
मनोज खेडकर. माजी नगराध्यक्ष