महाडच्या विकासाचा माणिकराव जगताप यांचा वारसा पुढे घेऊन जावू !: नाना पटोले
महाडच्या समस्या कायमस्वरुपी मार्गी लावण्याचा प्रयत्न करु: बाळासाहेब थोरात.
महाड नगरपरिषदेची नुतन प्रशासकीय इमारत व संत शिरोमणी रोहिदास महाराज सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न.
महाराष्ट्र मिरर टीम-महाड
महाड नगरपरिषदेची नवीन वास्तू अत्यंत प्रशस्त व सुंदर असून नगरपालिकेची एवढी दिमाखदार वास्तू दुसरीकडे पहायला मिळणार नाही. महाडचा विकास हा ध्यास घेत स्वर्गिय माणिकराव जगताप हे शेवटपर्यंत कार्यरत राहिले. त्यांच्याच दूरदृष्टीतून ही दिमाखदार वास्तू उभी राहिली आहे. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन होतं, फक्त महाडच नाही तर कोकणचा विकास झाला पाहिजे ही त्यांची धारणा होती. दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले परंतु माणिकराव जगताप यांचा विकासाचा वारसा पुढे घेऊन जाऊ, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
महाड नगरपरिषदेची नुतन प्रशासकीय इमारत व संत शिरोमणी रोहिदास महाराज सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, नगराध्यक्षा स्नेहलताई जगताप, रायगड काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, रत्नागिरी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड आदी उपस्थित होते.
पटोले पुढे म्हणाले की, मागील वर्षभरात दोन चक्रिवादळाने कोकणचे मोठे नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीवेळी केंद्र व राज्य सरकार यांनी मिळून मदत केली पाहिजे परंतु केंद्र सरकारने मदत केली नाही. शेजारच्या गुजरातला तातडीने एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली गेली पण पंतप्रधानांना शेजारचा कोकण दिसला नाही. परंतु राज्य सरकारने मात्र कोकणला मदतीचा हात दिला. माणिकराव जगताप हे सतत महाडच्या विकासाचा काम करत राहिले. येथील क्रांती स्तंभ सुशोभित करण्याची त्यांची इच्छा होती. ती पुर्ण करुयात असेही नाना पटोले म्हणाले.
यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, कोकणाला दोन चक्रिवादळाचा तडाखा बसला, मोठे नुकसान झाले परंतु सगळी यंत्रणा कामाला लागली आणि काही तासातच वाहतुक सुरु केली, वीजेच्या तारा, पडलेले खांब उभे केले. सर्व यंत्रणा व सरकार पाठीशी उभे राहिले. महाडला पुराचा नेहमीच फटका का बसतो याचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भातील एक प्रस्ताव तयार करा, सरकारदरबारी त्याचा पाठपुरावा करु. महाडच्या भूमीला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, देशाचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख अशा महान व्यक्तींची ही भूमी आहे. चवदार तळ्याचं पाणी सर्वांना मिळालं पाहिजे हा ठराव महाड नगरपरिषदेने करुन एक आदर्श घालून दिला.
यावेळी सर्व वक्त्यांनी स्व. माणिकराव जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. तत्पूर्वी महाड येथील चवदार तळ्याला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.