Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा मार्ग झाला मोकळा

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा मार्ग झाला मोकळा

  • सर्व विभागांची जबाबदारी केली निश्चित
  • महामार्ग प्राधिकरण, मनपा, पीडब्ल्यूडी, विज वितरण कंपनी, सुधार समितीची संयुक्त बैठक

                  तोहीद मुल्ला-सांगली


छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विज वितरण कंपनी एकमेकांवर जबाबदारी ढकलणे ही अत्यंत खेदजनक आहे. प्रत्येकांनी जबाबदारीने काम केले तर,छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासह अन्य विकास कामांना गती येण्यास वेळ लागणार नाही, असे खडेबोल आमदार सुरेश खाडे यांनी सुनावले. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासह भाजी मंडई, मिरज-मालगांव रस्ता रूंदीकरणासह शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्थेबाबत मिरज शहर सुधार समितीने प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्याची मागणी आ. खाडे यांच्याकडे केली होती. त्याअनुशंगाने महापालिका मुख्यालयात आयुक्त नितीन कापडणीस यांच्या दालनात आ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. चारही विभागाचे अधिकाऱ्यांसह मिरजेतील नगरसेवक आणि मिरज शहर सुधार समितीचे सदस्य उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणातील कायदेशीर अडचणी प्राधिकरण व महापालिका एकत्रितपणे पाठपुरावा करण्याबाबत निर्णय झाला. रस्त्यातील विद्युत खांब स्थलांतरित करण्याचा खर्चाचे दोन दिवसांत अंदाजपत्रक देण्याची सुचना आ. खाडे यांनी विज वितरण कंपनी अधिकाऱ्यांना दिली. अतिक्रमण हटविणे, झाडे तोडणे, ड्रेनेज किंवा पाण्याच्या पाईपलाईन बदलणे आदी कामांसाठी प्राधिकरण व महापालिकेचे संयुक्त पथक तयार करण्याचे ठरले. रस्ता करण्यापूर्वी या मार्गावरील ड्रेनेज किंवा पाण्याच्या पाईपलाईनचे काम पुर्ण करण्याची सुचना मिरज शहर सुधार समितीने केली.

अनेक दिवसांपासून भाजी मंडई काम रखडल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आ. खाडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. शनिवारपासून मंडईचे काम सुरू करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बालगंधर्व नाट्यगृहावर झालेले खर्चाचे मुल्यांकन करणे, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात सुरू असलेल्या कामांची पाहणी आमदार खाडेंसह महापालिका अधिकारी करून यातील त्रुटी दूर केल्या जाणार आहेत. मिरज-मालगांव रस्ता रुंदीकरणाबाबत आ. खाडेंनी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने हद्दीबाबत लेखी माहिती देण्याची सुचना केली.

कोट्यावधी रूपये खर्चूनही शहरातील रस्त्यांची झालेल्या दुरावस्थेबाबत आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने पाण्याचा निचरा होत असल्याने रस्ते लवकर खराब होत आहेत. यानंतर मिरजेतील रस्ते गटारीयुक्त करण्यासाठी प्राधान्य राहणार आहे.

बैठकीत मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, आनंदा देवमाने, संजय मेंढे, संगीता खोत, प्रा. मोहन व्हनखंडे, सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, मुस्तफा बुजरूक यांनी सुचना मांडल्या. यावेळी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे, विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आप्पासाहेब खांडेकर, बी. एस. तिळवे, मिरज शहर सुधार समिती अध्यक्ष शंकर परदेशी, संतोष माने, नगरसेवक योगेंद्र थोरात, विवेक कांबळे, गजेंद्र कुल्लोळी, दिगंबर जाधव, विठ्ठल खोत यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, विज वितरण कंपनी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies