Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

             महाराष्ट्र मिरर टीम


रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

      यावेळी महामहिम राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे,  खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, आमदार सर्वश्री भरत गोगावले, अनिकेत तटकरे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी,जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, राष्ट्रपती महोदयांची कन्या स्वाती कोविंद,  युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती,युवराज शहाजीराजे छत्रपती, तसेच महसूल व पोलिस विभाग तसेच इतर विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

   


   राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, रायगड किल्ल्याला भेट देणे, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या रायगड भेटीला आपण एक प्रकारची तीर्थयात्राच मानतो. या भेटीसाठी निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांचे विशेष आभार  मानले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेले हिंदवी स्वराज्य हे सर्व जगाला प्रेरित करणारे होते. 

       राष्ट्रपती महोदयांनी आपल्या भाषणात गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक एकता, सांस्कृतिक गौरव व देशप्रेम वाढीच्या परंपरेची सुरुवात केल्याचा विशेष उल्लेख केला.

     राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध कार्यकुशल वैशिष्टयांबद्दल आपल्या भाषणातून आदर व्यक्त केला. 

     भारतातील युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ओळख होण्यासाठी "शिवराजविजया" या संस्कृत भाषेतील पुस्तकाचा भारतीय इतर भाषांमधून अनुवाद व्हावा, अशी अपेक्षा यावेळी राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.

     यावेळी 19 व्या शतकात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय सामाजिक उत्थानासाठी केलेल्या विशेष कार्याप्रति राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणातून आदरभाव व्यक्त केला.

     "मराठा लाईट इन्फंट्री" या भारतीय सैन्याच्या युनिटच्या "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या युद्ध घोषणेचा त्यांनी आवर्जून उल्लेख करताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान व्यक्त केला.

     पश्चिम घाट आणि कोकण अशा या निसर्गसंपन्न क्षेत्रात पर्यटन आणि आधुनिकीकरणास अधिक वाव असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना आपण आजच्या 21 व्या शतकात साकारू शकतो, असे त्यांनी शेवटी अधोरेखित केले.

      राष्ट्रपती श्री.कोविंद हे "रोप वे" ने रायगड किल्ल्यावर आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी व मुलीसह होळीच्या माळावरील शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. याशिवाय त्यांनी राजसदर येथील सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचेही दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. 

     या भेटीदरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगड किल्ल्याचे संवर्धन आणि जतन कशा प्रकारे केले जात आहे, याबाबतचे संगणकीय सादरीकरण पाहिले. त्याचबरोबर यावेळी रायगड विकास प्राधिकरणाकडून राष्ट्रपती महोदयांना छत्रपती संभाजीराजे यांनी "रायगड सिग्निफिकंट मोन्यूमेंन्ट्स" आणि "रायगड फोर्ट:-प्रोग्रेस ऑफ वर्क " ही पुस्तके तर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रायगड किल्ल्याची सचित्र माहिती देणारे "दि ग्रेट कॅपिटल:- रायगड" हे कॉफीटेबल स्वरूपातील पुस्तक दिले.

 तत्पूर्वी किल्ले रायगडावर पोहोचल्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी,आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी राष्ट्रपती महोदयांचे स्वागत केले. 

      राजसदर येथील आयोजित स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजी राजे यांनी राष्ट्रपती महोदय व त्यांच्या कुटुंबियांना दांडपट्टा, होन, महाराजांच्या आज्ञापत्राची प्रतिकृती या भेटवस्तू दिल्या.

     यावेळी प्रस्तावना करताना छत्रपती संभाजीराजे यांनी महामहीम राष्ट्रपती यांची आजची रायगड किल्ल्याला भेट, ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अतिशय महत्वपूर्ण बाब असल्याची भावना व्यक्त केली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies