दिघी जेट्टीवर सोयी-सुविधांचा अभाव
श्रीवर्धनहुन मुरुड जाणारा जलमार्ग बनला गैरसोयीचा
अमोल चांदोरकर -श्रीवर्धन
दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर तर मुरुड, जंजीरा किल्ला, काशीद ही ठिकाणे दोन्ही तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. दिवाळी हंगाम नुकताच ओसरत आहे. त्यातून ही लाखो पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. त्याचप्रमाणे अलिबाग या जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय कामासाठी व वैद्यकीय कामासाठी जाण्यासाठी या मार्गावरून जनतेची वर्दळ सुरूच असते.
मुरुड व श्रीवर्धन या दोन्ही तालुक्यांच्या मध्ये राजपुरी खाडी असल्याने या खाडीमध्ये दिघी व अगरदांडा येथील जलवाहतुकीसाठी महाराष्ट्र् मेरिटाईम बोर्डाकडून मागील 5 वर्ष पूर्वी प्रवासी जेट्टी उभारण्यात आल्या आहेत. याठिकाणी बांधलेल्या प्रशस्त इमारती म्हणजे नुसत्या देखावा बनल्या आहेत. रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधार असून शौचालयाची व्यवस्था नसल्याने अनेक प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आगरदांडा येथे असलेली प्रशस्त इमारत बंद अवस्थेत आहे. तर दिघी येथे असलेल्या इमारतीचा फायदा कोणत्याही प्रकारे येथुन प्रवास करण्याऱ्या पर्यटक किंवा नागरिकांना होताना दिसत नाही. तर दोन्ही ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने विशेषतः महिलांची यामध्ये गैरसोय होत आहे. आगरदांडा जेट्टीवर बाथरूम व शौचालय बनले आहेत परंतु ते बंद असून त्याचा कोणताही लाभ प्रवाशांना होत नाही. त्याचप्रमाणे दिघी जेट्टी मार्गात खड्डे असून पथदिवे बंद अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी याठिकाणी काळोख पसरलेला असतो. मेरिटाईम बोर्डाने दोन्ही जेट्टीच्या बाबतीत असणाऱ्या गैरसोई दूर करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
रात्रीच्या वेळी अंधार -
दिघी येथील जेट्टीवर विजेचे खांब बसवण्यात आले. मात्र, दिवे बंद आहेत. त्यामुळे जेट्टीवर अंधार असून उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अंधारातून चाचपत यावे लागते. तर आजूबाजूला समुद्राच्या अजस्र लाटा व रस्त्यावरील अंधार पाहून वाहन चालकांना व पादचाऱ्यांना अचानक समुद्रात पडण्याची भीती कायम असते.
शौचालय नसल्याने महिलांची होतेय गैरसोय -
आगरदांडा जेट्टीवर प्रवाशांसाठी असणारे शौचालय मोडकळीस आले असून बंद आहे. स्वच्छतागृहांअभावी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. असे विदारक वास्तव असून लोकांची विशेषत: महिलांची कुचंबणा होते.
जेट्टीवर जाणारा मार्ग खड्डेमय -
या मार्गाने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये - जा सुरू असते. मात्र, दिघी येथून जेट्टीमार्गावर पूर्ण रस्त्याला खड्डे असून, अंधारासोबतच या खड्डेमय रस्त्यानी प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
शौचालयात घाणीचे साम्राज्य -
दिघी येथे शौचालयात पाणी नसल्याने तिथे दुर्गंधी व अस्वच्छता दिसते. प्रवाशी जनतेला विनाकारण दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये - जा सुरू असते.