Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

 रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

  • रायगड किल्ला व परिसर विकासाची कामे गतीने करा
  • यंदाच्या आर्थिक वर्षातील मंजूर नियतव्यय शंभर टक्के वितरित करा
  • रायगड किल्ला व परिसर विकासांच्या कामासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार -उपमुख्यमंत्री अजित पवार 

               अमूलकुमार जैन-अलिबाग


रायगड  किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची कामे गतीने व्हावीत, कामांची गुणवत्ता, दर्जा कायम राखावा, या विकास कामांना गती मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग, पर्यटन विभाग, पुरातत्व विभाग, जिल्हा प्रशासन यांनी समन्वय राखून प्राधिकरणाला कामकाजात सहकार्य करावे, या प्राधिकरणाला मंजूर असलेला यंदाच्या आर्थिक वर्षातील नियतव्यत शंभर टक्के वितरीत करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच या प्राधिकरणाला प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.  
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचा आढावा घेतला. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे,  खासदार संभाजी राजे, खासदार सुनिल तटकरे, सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, कोकणचे विभागीय आयुक्त विलास पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आदि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी घडविलेला इतिहास हा प्रेरणादायी आहे. या इतिहासात रायगड आणि परिसराला मोठे महत्व आहे. त्यामुळे रायगड किल्ल्याचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाला निधी कमी पडू देणार नाही. या प्राधिकरणाच्या कामकाजात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीला निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या निधीचा विनियोग पालकमंत्री, जिल्हा प्रशासन आणि प्राधिकरणाने समन्वयाने करावा. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा, समाधीचे संवर्धन, जतन करण्याचे काम, शिवसृष्टी उभारणी अशी नियोजित सर्व कामे शास्रोक्त पद्धतीने करावीत. ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या वास्तूंचे जतन आणि संवर्धन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना यावेळी दिल्या. 


महाविकास आघाडीचे सरकार रायगड किल्ला आणि परिसर विकासाचे काम पूर्णत्वाला नेणार असून रायगड किल्ला परिसरातील 21 गावांचा विकास व्हावा, स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies