मुरूडच्या समुद्रकिनारी आढळले दुर्मिळ लॉगहेड जातीचे मृत कासव
महाराष्ट्र मिरर वृत्तसेवा - मुरुड
मुरूडच्या समुद्र किनारी आज सकाळच्या वेळेत एक मृत महाकाय कासव आढळून आले. हे कासव दुर्मिळ लाॅगहेड प्रजातीतील असुन याची लांबी सुमारे ३.५ फुट आहे तर या कासवाचे वजन ४५ किलो होते. सदर कासव ८ दिवसांपूर्वी मृत झाले असावे. असे सर्पमित्र संदीप घरत यांनी सांगितले. हे कासव खुप कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.
आज सकाळी नेहमीप्रमाणे मुरुडच्या समुद्र किनारी घोडागाडी चालक विनोद अंबुकर आपला व्यवसाय करण्यासाठी गेले होते. त्यावेळी समुद्रकिनारी पाण्यात हे कासव वाहून आलेले दिसले. सदर कासव कासव खुप कुजलेल्या अवस्थेत असल्याने दुर्गंधी येत होती. त्यावेळी सर्प मित्र संदिप घरत यांना ही वार्ता कळविण्यात आली. संदिप घरत यांनी तातडीने वनखात्याला बोलावून या कासवाला वनखात्याने समुद्र किनारी पुरून टाकले.
गेल्याच महिन्यात १० एप्रिल रोजी याच ठिकाणी ३० ते ३५ किलो वजनाचे याच जातीचे कासव मृत अवस्थेत आढळून आले होते. त्या नंतर याच महिन्यात २ मे रोजी खोरा बंदरात लाॅगहेड जातील मादी कासव जिवंत स्वरुपात आढळून आले होते. आणि आज पुन्हा मृत कासव आढळल्याने प्राणी मित्रांकडून हळहळ व्यक्त होत आहे.