नवी मुंबई : महाराष्ट्र मिरर वृत्तसेवा
कोकण विभागातील पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती असलेल्या एकूण 242 गावे व 675 वाडयांना 132 टँकर आणि 4 अधिग्रहीत विहीरींव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, या विभागातील सुमारे 2 लाख 20 हजार 239 बाधित नागरिकांना या पाणीपुरवठयामुळे दिलासा मिळाला आहे.
एप्रिल महिन्यापासूनच कोकण विभागात सर्वत्र उन्हाची दाहकता जाणवू लागली होती. त्यामुळे ज्या गावांमध्ये दरवर्षी पाण्याची टंचाई निर्माण होते त्या गावांमध्ये शासनामार्फत पाणीपुरवठयाची पूर्वतयारी करण्यात आली होती. 25 मे पर्यंत विभागात टँकरव्दारे पुरविण्यात आलेल्या पाण्याची माहिती पुढील प्रमाणे आहे. ठाणे जिल्हयातील 62 गावे 187 वाडयांना 42 खाजगी टँकर्सव्दारे, पालघर जिल्हयातील 34 गावे 107 वाडयांना 37 खाजगी टँकरव्दारे, रायगड जिल्हयातील 83 गावे 253 वाडयांना 37 खाजगी टँकरव्दारे, रत्नागिरी जिल्हयातील 63 गावे 128 वाडयांना 7 शासकीय 9 खाजगी टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.
पाण्याचा पुरवठा करताना संबंधित कंत्राटदारांना कोरोना विषयी सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. टँकरव्दारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या स्वच्छतेबाबत विशेष लक्ष देण्यात येते आहे. अशी माहिती श्री. सिध्दाराम सालीमठ, उप आयुक्त (महसूल) कोकण विभाग यांनी दिली आहे.