Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोरोनाच्या दहशतीत मी अनुभवलेले दोन मृत्युंजय प्रकाशशेठ जसराज ओसवाल आणि किशोरशेठ वल्लभदास विठ्लानी.

कोरोनाच्या दहशतीत मी अनुभवलेले दोन मृत्युंजय 
प्रकाशशेठ जसराज ओसवाल आणि किशोरशेठ वल्लभदास विठ्लानी.


आम्ही तिघेहीजण श्री पार्वती हॉस्पिटलच्या आय सी यु विभागात होतो. माझ्या शेजारच्या बेडवर होते प्रकाशशेठ जसराज ओसवाल  आणि दोन तीन बेड सोडून होते ते किशोरशेठ वल्लभदास विठ्लानी. आमचे बेड पहायला गेले तर सर्वसामान्य आय सी यु चे मात्र त्यांना " डेथ बेड"  म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. ओसवाल शेठ आणि विठ्लानी काका डॉ रणजित मोहिते सरांनी कोव्हीड हॉस्पिटल सुरु केलेल्या दिवशीच ऍडमिट झाले होते. विठ्लानी काका म्हणजे एकदम सरळसोट माणूस "मला कोरोना झालाय, पण मला काही त्रास होत नाहीये, बद्धो सारो छे" असं वारंवार सांगायचे. ओसवाल काका म्हणजे थोडे नव्हे तर खूप हट्टी.  "मला कोरोनाची भीती दाखवून इंजेक्शन आणि ऑक्सिजन लावू नका" असा  हेका ओसवाल काकानी कायम लावलेला असायचा. विठ्लानी काका म्हणजे हॉस्पिटल स्टाफसाठी जणू काही आदर्श पेशंट तर ओसवाल काका म्हणजे थोडी आदरयुक्त दहशत. त्या दोघांनी वयाची सत्तरी पार केलेली आणि मी पंचावन्नच्या दरम्यानचा. का कुणास ठाऊक? उगाचच माझं कम्पॅरिझन मी त्यांच्याशी करून बघत असे. 

सुरवातीला एक दोन दिवसांत "मी बरा होईन" हा माझा भ्रम, भुर्रकन हवा होऊन गेला. कारण  माझी ऑक्सिजन लेव्हल हळू हळू कमी व्हायला लागली होती, अंगात ताप घर करून होता, श्वास जड होत होता  आणि छातीत अनामिक घरघर सुरु झाली होती. अगदी मनापासून सांगायचं झालं तर एकदोन दिवसांत घरी जाईन अशी अपेक्षा असतांना आपला तीन  बाय सहा आकाराच्या बेडवरचा मुक्काम वाढणार अशी मनोमन खात्री वाटू लागली आणि एक अनामिक भीती मनांत वलय करू लागली.  ऑक्सिजनसाठी वेगवेगळे मास्क लावताना "माझे मरण मी माझ्या डोळ्यांनी पहायचो". सहनशिलतेची हद्द काय असते त्याची परिसीमा मी पाहिली. आमची जगण्यासाठी चाललेली आणि हॉस्पिटलच्या स्टाफची आम्हाला जगविण्यासाठी चाललेली धडपड अविश्रांत सुरु होती. तीच तीच दृश्य वारंवार पाहण्यापेक्षा गप्प गुमान डोळे मिटून फक्त आपण जिवंत आहोत याचा अनुभव घेणं सुरु होतं. 

आजूबाजूला सगळेच तसे जीवनमंरणाच्या संघर्षात कृत्रिम ऑक्सिजनच्या आधारावर जगत असताना,  त्यातल्या त्यात मी स्वतःला त्यांच्यापेक्षा मला तेव्हढं काही जास्त काही झालं नसेल अशी उगाचच मनाशी अटकळ करून होतो, म्हणजे उसनं अवसान आणलेला होतो. सुरवातीचे दोन दिवस  माझा मोबाईल माझ्याकडे होता. चॅटिंग बघताना  एक फोटो दिसला तो माझा मित्र राजा पवारचा  आणि त्याखाली मेसेज होता भावपूर्ण श्रद्धांजली.  त्याच दरम्यान माझे परिचित गजानन कुलकर्णी वारले असा मेसेज पाहिला.  देशमाने नावाचा युवक गेला, हा गेला, तो गेला असे एकामागोमाग मनाचा निर्धार खच्ची करणारे  मेसेज येऊ लागले आणि म्हटलं आता आपलं काही खरं नाही. मनाची तशी अवस्था माझ्या मुलींच्या लक्षांत आली असावी आणि माझा फोन चार्जिंगच्या कारणाखाली माझ्याकडून काढून घेतला गेला.   

एक एक मिनिट, तास, रात्र, दिवस एवढ्याश्या बेडवर मृत्यूच्या भयाच्या दहशतीत तळमळत काढणं खूप कठीण होतं. नावाला भूक लागायची म्हणून जेवायचो, तहान लागली कि पाणी हजर असायच.त्याच सोबत अविश्रांत सुरु असायची ती सलाईनच्या थेंबांची मोजदाद, ऑस्किजन स्केल वर दिसणारी आपल्या श्वासांची क्षमता. वेगवेगळ्या उपकरणांचे आवाज, एक्सरे रिपोर्ट, ब्लड रिपोर्ट, शुगर चेकिंग, ब्लड प्रेशर, डॉक्टरांची वरचेवर तपासणी आणि या दरम्यान मी ७० ते ८० च्या दरम्यान ऑक्सिजन लेव्हलवर मी होतो  तर विठ्लानी काका कधी ३५ तर कधीं ४० आणि ओसवाल काका ५० च्या आसपास ऑक्सिजन लेव्हलवर असायचे.  या दोघांना कोरोनाची साधी भीती वाटत नव्हती कि ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याची खंत. त्यांचं जणू काही रुटीन चालल्यासारखं आयुष्य सुरु होतं.  त्यांच्या घरच्यांनी पाठवलेलं जेवण, नास्ता, चहा सगळं वेळेवर होत होतं आणि काही हवं असेल ते चक्क ते मागून  घ्यायचे. ओसवाल काका तर रात्री अपरात्री कधीही त्यांना हवे असेल ते नीरज शेठकडून मागवायचे. या दोघांनी  हॉस्पिटलमध्ये ठेवलेली आपली  लाईफ स्टाईल पाहिली आणि माझ्या मनाला जरा उभारी आली.  वाटलं कि यांच्यापेक्षा आपली शारिरीक क्षमता निश्चितच थोडी जास्त आणि इतर बाबीसुद्धा थोड्या पूरकच आहेत. 

म्हणता म्हणता ११ दिवस संपले, माझी शारीरिक क्षमता सुधारली,  मी कोरोनाच्या युद्धात डॉ मोहितेंच्या पार्वती हॉस्पिटलमधल्या प्रत्येक घटकांच्या साथीने पुरून उरलो आणि शेवटी  घरच्या वाटेने निघालो. जाताना विठ्लानी काकांच्या आणि ओसवाल काकांच्या पायाला हात लावला आणि आशीर्वाद घेतला. दोघेही हसतमुख चेहऱ्याने मला सांगत होते, स्वतःची काळजी घे म्हणून.  खरं तर ते दोघेही या दरम्यानच्या लढाईत माझी एनर्जी लेव्हल वाढवत होते.  ज्यांनी माझ्या मनातली कोरोनाची भीती जवळपास काढून टाकली होती. 

दुसऱ्या दिवशी रुटीन चेकअपला पुन्हा डॉ मोहितींच्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर सगळं काही कालच्यासारखं सुरु होतं. फक्त दोन बेड मोकळे होते एक विठ्लानी काकांचा आणि दुसरा ओसवाल काकांचा. मला  डिस्चार्ज भेटल्यानंतर  काही तासांच्या अंतरात हे दोन्ही महानुभव इहलोकांची यात्रा संपवून अगदी बिनधास्तपणे पुढे निघून गेल्याचं डॉ मोहितेनी पाणावलेल्या डोळ्यांनी आणि ओथंबलेल्या शब्दांत सांगितलं.  कालपरत्वे त्यांचं जाणं ठरलेलं असेलह, मात्र त्यांच्या जिद्दीच्या बळावर त्यानी मला जिवंत ठेवण्याची जबाबदारी पार पाडली होती. त्या दोन मृत्युंजयांच्या सेवेचा किंचितसा  योग मला आणि माझ्या मुलींना जास्त  मिळाला. त्यांचे उपकार कसे फेडणार. या जन्मी शक्यच नाही. 

डॉ रणजित मोहिते दांपत्याच्या  बाबतीत  बोलायला शब्द अपुरे आहेत.  त्यांनी मला तर दोनदा पुनर्जन्म दिलाय. 

माझ्या आयुष्यातल्या त्या दहा अकरा दिवसांच्या ऋणानुबंधाच्या शिदोरीवर खूप काहीसं करावं असं वाटतंय, फक्त संधी कशी मिळेल याची वाट पाहतोय.  आज कोरोनंटाईन पिरिएड संपला आणि भावनांना थोडी वाट मोकळी करून दिली.

@गुरुनाथ रामचंद्र साठेलकर 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies