मुंबईचे नाना; नानांची मुंबई - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, July 30, 2020

मुंबईचे नाना; नानांची मुंबई

मुंबईचे नाना; नानांची मुंबई

आधुनिक मुंबईचे शिल्पकार व द्रष्टे समाज सुधारक जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांचा आज १५५वा स्मृतिदिन. त्यांच्या समर्पित जीवन-कार्यास समस्त मुंबईकरांच्या वतीने श्रद्धांजली!

मुंबईच्या सार्वजनिक जीवनातील एकही क्षेत्र असे नव्हते, जिथे नानांनी आपल्या कल्पना चातुर्याचा व कार्याचा ठसा उमटवला नाही. मुंबईची रेल्वे, शिक्षण पद्धती, चाळी, स्मशाने,  वाटनालये, टाउन हाॅल, अशा सर्वच क्षेत्रांतील विकास कार्यांवर नानांचा प्रभाव होता.

 1803 ते 1865 हा नानांचा जीवनकाळ. पेशवाईतील शहाणपण मानले गेलेले नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर तीनच वर्षांत नवसमाजरचनेचे शहाणपण मानल्या जाणाऱ्या नानांचा जन्म झाला व 1857च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्यसमरानंतर आठ वर्षांनी नाना निर्वतले. 

पेशवाईचा भगवा कायमचा उतरून तिथे ईस्ट इंडिया कंपनीचा ध्वज फडकला, तेव्हा नाना जेमतेम 15 वर्षांचे होते. तेव्हापासून मुंबईच्या शहर म्हणून विकासाला सुरुवात झाली असे मानायचे, तर त्यांच्या हयातीतच त्यांनी मुंबई-ठाणे मार्गावर धावलेली पहिली रेल्वेगाडी पाहिली आणि ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य खालसा होऊन राणी व्हिक्टोरियाच्या जाहीरनाम्यामुळे ब्रिटिश सरकारची अधिकृत सत्ता स्थापन झाल्याचेही बघितले. म्हणजेच पेशवाई व ईस्ट इंडिया कंपनी या दोन सत्तांची अखेर नानांनी अनुभवली. 

नानांचे आयुष्य 62 वर्षांचे. त्यांची बहुविध क्षेत्रांतील भरीव व मौलिक कामगिरी पहाता इतक्या कमी वर्षांच्या हयातीत या एका व्यक्तीने शंभर संस्थांना झेपणार नाहीत, अशी आणि इतकी कामे करून दाखवावीत, हे वास्तव स्तीमित करणारे आहे.

 थोडक्यात सांगायचे तर नाना मुंबईचे होते आणि मुंबई नानांची होती, हे आजमितीला ध्यानात घेणे गरजेचे आहे.

 पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या आधीच्या कालखंडात लॉर्ड डलहौसी भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून आले आणि त्यांनी सुधारणांचा सपाटा लावला. भारतात तार आणि टपाल सेवा सुरू करण्यापासून रेल्वेची स्थापना करण्यापर्यंत अनेक नव्या योजना आल्या. ग्रंथ चळवळ सुरू झाली. यामुळे विकास झाला, तशीच ब्रिटिश राजसत्तेविरोधातील असंतोषाची बिजेही तेव्हाच पेरली गेली. या सर्वांशी नानांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध होता. 

नाना विचाराने, वृत्तीने व आचरणाने कमालीचे आधुनिक होते. केवळ गोऱ्या साहेबांबरोबरच नव्हे, तर अनेक जाती-धर्मांच्या विचारवंत, समाज सुधारक व तंत्रज्ञांबरोबर त्यांची नित्य ऊठबस होती. ते खऱ्या अर्थाने आधुनिक महानगराचे नेता होते. 

आज त्याच्या मृत्यूनंतर १५५ वर्षांनी ते सर्व मुंबईकरांचे असायला हवेत. प्रत्यक्षात ते केवळ त्यांना जन्माने लाभलेल्या जातीपुरतेच मानले जातात, असे दिसते. हे दुर्दैवी आहे. 

कै. नाना भारतीय संस्कृती व प्राच्यविद्या यांच्या अभ्यासाचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यामुळेच शालान्त परीक्षेत संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यास नाना शंकरशेट पुरस्कार देण्याची प्रथा १०० वर्षांपूर्वी सुरू झाली, ती आजही कायम आहे.

महापुरुषांना जात, धर्म नसतो. मानवधर्म हाच त्यांचा धर्म व माणुसकी हीच त्यांची जात. म्हणूनच लोकमान्य टिळक, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्यासारख्या विभूतींचा उल्लेख होताना त्यांच्या जातीचा, प्रांताचा संदर्भ दिला जातो, तेव्हा तो त्यांचा नव्हे, तर समस्त सुबुद्ध समाजाचा पराभव आहे, असे वाटू लागते.

नानांच्या १५०व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुनर्प्रकाशीत चरित्राचे प्रकाशन झाले. या ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्याचे भाग्य मला लाभले, हे माझे महत् भाग्य!

कै. नानांच्या तेजस्वी स्मृतींस या अस्सल मुंबईकराचे त्रिवार अभिवादन!

-@डॉ.भारतकुमार राऊत

No comments:

Post a Comment