Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

शब्दप्रभू विंदा! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख

 शब्दप्रभू विंदा!


अर्धीच रात्र वेडी

अर्धी पुरी शहाणी

भोळ्या सदाफुलीची

ही रोजची कहाणी।।


फुलले पुन्हापुन्हा

हा केला गुन्हा जगाचा

ना जाहले कुणाची

पत्त्यामधील राणी।।


येता भरून आले,

जाता सरून गेले

नाही हिशेब केले,

येतील शाप कानीं।।


आता न सायंतारा

करणार रे पहारा

फुलणार नाही आता

श्वासांत गूढ गाणीं।।


शापू तरी कशाला

या बेगडी जगाला

मी कागदी फुलांनी

भरतेच फूलदाणी।।


अशा अर्थगर्भ गीतांसह रंजक कविता, बाल कविता यांच्याबरोबरीने गहन तत्वचिंतन करणारी काव्यनिर्मिती करून मराठी शब्द शारदेच्या दरबारात स्वत:चे अढळपद निर्माण करणारे कविवर्य  गोविंद विनायक करंदीकर  म्हणजेच विंदा करंदीकर यांचा आज जन्मदिन.एका बाजूला तरल भावनात्मक कविता लिहिणाऱ्या विंदांनी 'अष्टदर्शने' हा जगातील बिनीच्या आठ तत्ववेत्त्यांच्या तत्वज्ञानावरील ग्रंथ लिहिला. त्यासाठीच त्यांना 'ज्ञानपीठ' हा साहित्य क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला.


वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर यांच्यानंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे साहित्यिक. चार वर्षांपूर्वी भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार मिळाला.


गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर यांचा जन्म १९१८मध्ये आजच्या दिवशी झाला. विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. पण सरकारने देऊ केलेले स्वातंत्र्यसैनिकाचे पेन्शन मात्र त्यांनी कधी स्वीकारले नाही.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत.


अर्थार्जनासाठी त्यांनी महाविद्यालयांत अध्यापन केले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली.


कवी वसंत बापट, मंगेश पाडगावकर व विंदा यांनी कविता वचनाच्या कार्यक्रमांचा नवा उपक्रम मराठीत आणला. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. या तीन प्रतिभावंतांना एकत्र रंगमंचावर पाहण्यासाठी मराठी रसिक तुफान गर्दी करत असत.


याच कार्यक्रमात बापटांची  'सह्यकडा' व पाडगावकरांची 'सलाम' यांच्या बरोबरीने प्रतिसाद मिळवणारी विंदांची 'तेंच तें' ही अजरामर कविता स्मरते.


तेंच तें


सकाळपासून रात्रीपर्यंत

तेंच तें! तेंच तें!

माकडछाप दंतमंजन;

तोच चहा, तेच रंजन;

तीच गाणी, तेच तराणे;

तेच मूर्ख, तेच शहाणे;

सकाळपासून रात्रीपर्यंत

तेंच तें! तेंच तें!


खानावळीही बदलून पाहिल्या;

(जीभ बदलणे शक्य नव्हते!)

'काकू'पासून 'ताजमहाल'

सगळीकडे सारखेच हाल.


नरम मसाला, गरम मसाला;

तोच तोच भाजीपाला;

तीच तीच खवट चटणी;

तेंच तेंच आंबट सार;

सुख थोडे; दुःख फार!


संसाराच्या वडावर

स्वप्नांची वटवाघुळे!

या स्वप्नांचे शिल्पकार

कवी थोडे; कवडे फार.


पडद्यावरच्या भूतचेष्टा:

शिळा शोक, बुळा विनोद

भ्रष्ट कथा, नष्ट बोध;

नऊ धागे, एक रंग;

व्यभिचाराचे सारे ढंग!

पुन्हा पुन्हा तेच भोग;

आसक्तीचा तोच रोग.


तेच 'मंदिर', तीच 'मूर्ति';

तीच 'फुलें', तीच 'स्फूर्ती'

तेच ओठ, तेच डोळे;

तेच मुरके, तेच चाळे;

तोच 'पलंग', तीच 'नारी';

सतार नव्हे, एकतारी!


करीन म्हटले आत्महत्या;

रोमिओची आत्महत्या;

दधीचीची आत्महत्या!

आत्महत्याही तीच ती!

आत्माही तोच तो;

हत्याही तीच ती;


कारण जीवनही तेंच तें!

आणि मरणही तेंच तें!विंदांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हा 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे विंदांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजण्याचे भाग्य मला लाभले. या कार्यक्रमाक स्वत: विंदा सहकुटुंब उपस्थित राहिले व त्यांनी 'हे श्रेय तुझेच आहे' ही पत्नीला उद्देशून रचलेली कविता सादर केली. उपस्थित काव्यरसिकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना दाद दिली.


 तेव्हाचे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिल्लीत खास समारंभात विंदांना ज्ञानपीठ पुरस्कार बहाल करण्यात  आला. त्यावेळेस विंदांनी गायलेली 'यंत्रयुग' ही कविता आजही स्मरणात आहे.


डॉ.भारतकुमार राऊत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies