Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आमदार सुमन पाटील यांचा राजीनामा घ्या!!आमदार सुमन पाटील यांचा राजीनामा घ्या!!


वंचित'ची मागणी : शरद पवार यांना पाठवले पत्र.


सुधीर पाटील-

महाराष्ट्र मिरर टीम सांगली       तासगाव तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. तालुक्यात 389 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 39 रुग्णांचा जीव गेला आहे. तालुक्याचा मृत्यूदर राज्यात सर्वाधिक आहेत. लोक किड्या - मुंग्यांसारखे मरत असताना राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील निष्क्रिय ठरत आहेत. कोरोनातून लोकांचा बचाव करण्यासाठी त्यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक गुरव यांच्यासह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबतचे पत्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवले आहे.


       पवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, जगात कोरोनाने उन्माद माजवला आहे. तासगाव तालुक्यातही कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. तासगाव शहराचा मृत्यूदर 19 टक्के तर तालुक्याचा मृत्यूदर 11 टक्के आहे. तालुक्यात आतापर्यंत 389 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 39 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.


      तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रसार चिंताजनक आहे. याकाळात आमदार सुमन पाटील निष्क्रिय ठरत आहेत. त्या केवळ बैठका घेऊन प्रशासनाकडे बोट दाखवण्यात धन्यता मानत आहेत. सक्षम आमदार म्हणून काम करण्याची त्यांच्याकडे क्षमता नाही. तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात लोकांनी भावनिकतेने त्यांना दोनवेळा निवडून दिले. पण, आज संकटकाळात त्या काम करण्यास असमर्थ ठरत आहेत. सामान्य जनतेला उपचार मिळत नाहीत. जनतेचं सोडा पण पक्षाच्या कार्यकर्त्यांना व त्यांच्या कुटुंबियांनादेखील पक्षाला कोरोनापासून वाचवता आले नाही. उपचाराअभावी पक्षाच्या पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांचे जीव जात आहेत.


       आमदारांनी कोरोना काळात प्रत्यक्ष कोणतीही उपाययोजना केली नाही. अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. परिणामी नागरिक किड्या - मुंग्यांसारखे मरत आहेत. तासगावात आजही हॉस्पिटल, अतिदक्षता विभाग नाही. रुग्णांना सांगलीला उपचारासाठी जावे लागत आहे. सांगलीतही उपचार मिळत नाहीत. रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नाही. परिणामी रुग्णांना पाय घासून आपला जीव सोडावा लागत आहे. खासगी रुग्णालयात 2 ते 5 लाख रुपयांपर्यंत बिले होत आहेत. खासगी सावकारांकडून कर्ज काढून लोकांना उपचार करून घ्यावे लागत आहेत. 


      तालुक्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात असताना आमदार कुठं आहेत तेच कळत नाही. संकटकाळात त्या पूर्णपणे निष्क्रिय ठरल्या आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांचा राजीनामा घ्यावा. शिवाय तासगाव - कवठेमहांकाळमध्ये तात्काळ 20 बेडचे अतिदक्षता हॉस्पिटल सुरू करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला द्यावेत, असे पवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.


      पत्रावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक गुरव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अमोल काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जोतिराम जाधव, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार, प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष सुधीर पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अर्जुन थोरात, उस्मान मुलाणी यांच्या सह्या आहेत:

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies