Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महाराष्ट्र शारदेचा सुपुत्र! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख!

 महाराष्ट्र शारदेचा सुपुत्र!


कोणत्याही किंमती हिऱ्याला जितके पैलू असू शकतील, त्यापेक्षा किती तरी अधिक पैलू असलेले आचार्य प्रह्लाद केशव अत्रे यांचे व्यक्तिमत्व. या प्रत्येक पैलूबाबत स्वतंत्र ग्रंथरचना करता येईल, असे त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य. अशा आचार्य अत्रेंचा आज जन्मदिन. मात्र आज त्यांचे स्मरण करताना त्यांच्या केवळ साहित्य व सांस्कृतिक सेवेचाच धावता आढावा घ्यावा लागत आहे. गेल्या 13 जूनला आचार्यांचा स्मृतिदिन झाला, तेव्हा त्यांच्या विविधांगी व्यक्तिमत्वावर लिहिले आहेच.


आजच्या दिवशी 1898 साली जन्माला आलेल्या आचार्य अत्रेंनी कथा, लेख, कविता, विडंबन कविता, भक्तिगीते, नाटके, चित्रपटकथा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत साहित्य सेवा बजावली. मुख्य म्हणजे या प्रत्येक क्षेत्रावर त्यांनी आपला कायमचा ठसा उमटवला. सामाजिक चळवळ, राजकारण, आंदोलने, वृत्तपत्रीय संपादन अशी बहुविध कामे करत असतानाच इतकी मोठी साहित्य सेवा करणारा साहित्यिक क्वचितच आढळेल.


बरे, त्यातही गंमत अशी की, `श्यामची आई' या ह्रदयद्रावक कथेची पटकथा लिहिणाऱ्या अत्रे यांनी 'ब्रँडीची बाटली' हा विनोदी चित्रपट लिहिला व `मोरूची मावशी' लिहिल्यानंतर `संत सखूच्या जीवनावरील `प्रीती संगम' लिहिले. त्यांनी `मी मंत्री झालो', `तो मी नव्हेच', `बुवा तिथे बाया' यासारखी नाटके लिहिली व त्यांनीच `किेंग लियर'चे `सम्राट सिंह' हे रुपांतरही केले. `उद्याचा संसार' व `घराबाहेर' ही सामाजिक समस्यांवरील नाटके त्यांनी लिहिली व `लग्नाची बेडी' आणि `साष्ट्रांग नमस्कार' अशी हलकी फुलकी नाटकेही सादर केली.


अत्रेचे भाषेवरील प्रभुत्व थक्क करणारे होते. `मराठा'च्या अग्रलेखांतून अर्वाच्य भाषेत राजकीय विरोधकांवर तुटून पडणाऱ्या अत्रेंनी `आषाढस्य प्रथमदिवसे' या अग्रलेखात महाकवी कालिदासाच्या `मेघदूत'मधील कल्पनेचे इतके सुंदर विश्लेषण केले, की हा अग्रलेखही मेघदूतासारखाच अजरामर झाला. `समाधीवरील अश्रू' व `सूर्यास्त' या संग्रहांत अत्रेंनी विविध नेते व साहित्यिक यांना वाहिलेल्या श्रद्धांजली आहेत. त्यातील लोकमान्य टिळक व जवाहरलाल नेहरू यांच्यावरील लेख वाचताना डोळ्याच्या कडा आपोआप ओलावतात.


अत्रेंच्या काव्यलेखनावर राम गणेश गडकरी उर्फ कवी गोविंदाग्रज यांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी `केशव कुमार' या नावाने विडंबन कविता लिहिल्या. त्यात त्यांनी गोविंदाग्रजांच्या कवितांचेही विडंबन केलेच. `हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला' यावर त्यांनी केलेले, `हे कोण बोलले बोला, चिंचेवरुन चंदू पडला' हे विडंबन फार गाजले होते. `मी कवितेतील शब्दांचे नव्हे, अर्थाचे विडंबन करतो, असे ते म्हणत. त्यामुळे त्यांची विडंबनेही अर्थगर्भ होत राहिली. गोविंदाग्रजांनी मानवी आयुष्यावर `विरामचिन्हे' ही गंभीर कविता लिहिली. त्यावर केशव कुमारांनी `कवीची विरामचिन्हे' हे विडंबन रचले. ते वाचून वाचक मनमुराद हसले खरे, पण कवीचे दु:खही त्यांनी वाचकांसमोर आणले.


'कवीची विरामचिन्हे' हे विडंबन काव्य आजही तितकेच ताजे वाटते.


जेव्हा काव्य लिहावयास 

जगती प्रारंभ मी मांडिला,

जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला,

तारा, चंद्र, फुले, मुले 

किति तरी वस्तू लिहाया पुढे,

तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे !


झाले काव्य लिहून - 

यास कुठल्या धाडू परी मासिका?

याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका?

रद्दीमाजि पडेल का? 

परत वा साभार हे येईल?

सारे लेखन तेधवा करितसे मी 'प्रश्नचिन्हा' कुल!


अर्धांगी पुढती करून कविता

नावे तिच्या धाडिली,

अर्धे काम खलास होइल 

अशी साक्षी मनी वाटली !

कैसा हा फसणार डाव? 

कविता छापून तेव्हाच ये !

केला 'अर्धविराम' तेथ; 

गमले तेथून हालू नये !


झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,

केले मी मग काव्यगायन सुरू 

स्वच्छंद ज्या त्या स्थळी !

माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन !

त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन !


पुढील श्लोक 'कोरसा' दाखल असून तो वाचकांनी कवीला ऐकू न जाईल अशा हलक्या स्वरांत गुणगुणावयाचा आहे. बाकी ऐकू गेले तरी काय व्हायचे आहे म्हणा?


डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर 

तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी

ही एकेक समर्थ आज असती

न्याया स्मशानांतरी -

सर्वांचा परमोच्च संगम 

चिरं जेथे परी साधला,

देवा, 'पूर्णविराम', त्या कविस 

या देशी न का आजला?


असे प्रतिभेचे बहुविध कंगोरे व भाषेची तीक्ष्ण हत्यारे लाभलेले आचार्य अत्रे 1970 मध्ये 13 जूनला निघून गेले. मराठी शब्दशारदेने एक बहुमूल्य हिरा गमावला.


त्यांच्या साहित्यिक स्मृतींस अभिवादन!


डॉ.भारतकुमार राऊत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies